BLOG : परभणीत दुसऱ्या दिवसाची सुरुवात स्फोटक झाली. मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे रियाज चाचांना आवडीचं जेवण न मिळाल्याने त्यांना वाईट वाटलं होतं. त्यात आम्ही त्यांना न विचारता जेवण ऑर्डर केल्याने त्यांना इगोसुद्धा दुखावला होता. परभणीतून बीडच्या दिशेने निघताना त्यांनी येण्यास नकार दिला. ते म्हणाले मी मुंबईला निघणार. हे वाक्य ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली होती... आभाळ कोसळलं होतं. संध्याकाळी 5 वाजता पंकजा मुंडेंनी वेळ दिली होती आणि बाईक विना मुलाखत होणं शक्यच नाही. गोविंद सर... म्हणजे आमचे बीडचे प्रतिनिधी.. त्यांनी सगळं अरेंज करुन ठेवलं होतं.


आता आम्ही काही बोलणार इतक्यात  विनोद सर म्हणाले, "रियॅक्ट होऊ नका.. नॉर्मल वागा... हातापाया पडलो तर आणखी डोक्यावर बसणार... करु सॉर्ट..". हे बोलून विनोद सरांनी लगेच फोन काढला आणि मुंबईतील आमच्या ऑपरेशन्सच्या टीमला माहिती दिली. पुढे तासभर फोनाफोनी झाली आणि अखेर रियाज चाचांना त्यांच्या मालकाचा फोन आला. मनात नसतानाही चाचा आमच्यासोबत बीडच्या दिशेने निघाले. 


गंमत म्हणजे संपूर्ण दौऱ्यात कारपासून फक्त 8 ते 10 फूट अंतर ठेवून बाईक चालवणारे नाहीतर पळवणारे चाचा आज अचानक स्लो झाले होते. कारपासून मागे जवळपास फुटांवर चाचांची बाईक असायची. पहिलं 6 - 7 किमी अंतर पार केल्यानंतर तर चाचा दिसेनाशे झाले. आम्ही फोन ट्राय केला तर तो सुद्धा उचलेना. बरं, चाचांना  गुगल मॅप सुद्धा पाहायला जमत नव्हतं त्यामुळे सगळा गोंधळ सुरु होता. आम्ही पुन्हा अर्धातास थांबलो  पण चाचा काही दिसेना. मुळात आम्हाला थांबून चालणार नव्हतं..वेळ महत्वाची होती. विनोद सर म्हणाले, "एक वेळेस बाईक नसेल तरी चालेल पण आपण पंकजाताईंसमोर वेळेत पोहोचणं महत्वाचं आहे... पुढचं पुढे बघू.."


विनोद सर अगदी योग्य म्हणाले होते त्यामुळे पुढच्या क्षणी आम्ही गाडी काढली. त्यानंतरही चाचांना आम्ही अनेक फोन केले पण चाचा काही उचले ना. आम्ही अंबेजोगाई-अहमदपूर मार्गावरील पाटोडा या गावाजवळ असताना आम्हाला चाचांचा फोन आला. ते आमच्या पेक्षा बरेच लांब होते... किमान 60 ते 70 किमी.  आम्ही त्यांना म्हटलं की आता आम्हाला फार थांबता येणार नाही पण परळीपर्यंत या आधी. आम्ही परळीच्या अलीकडेच थांबून जेवणाचा विचार केला होता. खरं तर थांबण्याची इच्छा नव्हती कारण 2 वाजले होते आणि अजून अर्धे अंतर कापायचं होतं. पण सगळ्यांनाच भूक लागली होती त्यामुळे जेवायचं ठरलं. र


स्त्याला नुसते बार होते, त्यामुळे हॉटेल शोधत-शोधत आम्ही सहज 7-8 किमीचा टप्पा पार केला. अखेर एक छोटसं हॉटेल दिसलं आणि आम्ही गाडी वळवली. पाहतो तर हा सुद्धा बारच होता... भयंकर बार होता. हॉटेलला स्लॅब नव्हता, पत्रे होते आणि AC नसून पंखे होते त्यामुळे पत्र्यांमधून येणारी उष्णता पंख्यामुळे  जास्त जाणवत होतं. भर उन्हात  आम्ही पंखे बंद करायला लावले. दुसरं म्हणजे प्रत्येक टेबलला दरवाजा लावावा तसे पडदे लावले होते. मी मालकाला विचारलं पडदे कशाला... तर म्हणे प्राव्हसी.. म्हटलं..वाह!


जेवण यायला उशीर होत होता आणि माझा BP वाढत होता. आम्ही जेवणासाठी थांबलो होतो पण घड्याळाचा  काटा काही आमच्यासाठी थांबणार होता का? जेवण करुन बाहेर पडायला तीन वाजले. आम्हाला पोहोचायला उशीर होणार हे गोविंद सरांना सांगायचं ठरलं आणि मी फोन काढला. बघतो तर काय? त्यांचेच दोन मिस कॉल्स होते. त्यांना रिटर्न फोन केला तर त्यांनी सुखद धक्का दिला. गोविंद सर म्हणाले, "पंकजाताई अजून दौऱ्यातच आहेत.. बीडपासून 40-50 किमी लांब आहेत त्या.. आज होईल की नाही मुलाखत सांगू शकत नाही... उद्याची वेळ घेऊ का?". माझं सगळं टेन्शन एका फटक्यात दूर झालं... मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना म्हणालो..."चालेल...एकदम बेस्ट". मुळात आम्हालाच उशीर झाला होता हे त्यांना आजवर आम्ही सांगितलं नाही...याच बलॉगमधून त्यांना सर्व समजणारे.


असो, आता आम्ही निवांत झालो होतो... आता फक्त एकच टेन्शन होत 'रियाज चाचा..' हॉटेलमधून त्यांना पुन्हा फोन केला तर ते अजूनही 50 किमी मागे होते त्यामुळे थांबण्यात काही अर्थ नव्हता. आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही होतो पुढे काही लागलं तर कळवा. आम्ही गुगल मॅप लावला आणि पुढे निघालो. 


परभणी ते बीड हे अंतर 200 किमी असावं आणि ते पार करायला 4 तास पुरे आहेत पण आम्हाला मात्र फारच उशीर झाला. जेवणानंतर आम्ही परळी मार्गे बीडला निघालो आणि तिथेच आमचा गेम झाला. मुख्य रस्त्याचं काम सुरु होतं त्यामुळे 15 ते 20 किमीपर्यंत रस्त्यावर फक्त खडी  टाकेलेली होती. आमची भली मोठी टर्बो इंजिनची इन्होवा आता 30 च्या स्पीडने पुढे सरकत होती. कारमध्ये कॅमेरे होते, टपावर बॅग्स होत्या त्यामुळे आम्हाला स्पीड स्लो करावाच लागला. 


कसंबसं हा 20 किमीचा टप्पा पार केला आणि चांगल्या रस्त्याला लागलो. सर्वांचीच पाठ कामातून गेली असल्याने 10 मिनिटांचा ब्रेक घेऊन खाली उतरायचं ठरलं. संपूर्ण दौऱ्यात आम्ही फार असं फोटोशूट केलं नाही..पण आज तो दिवस होता. त्या दिवशी खरच खूप हलकं वाटत होतं. परभणी ते बीड हा आमचा शेवटचा प्रवास होता... बीड ते मुंबई मी मोजणार नाही. त्यामुळे सगळेच भावूक झाले होते. सगळ्यांनी मनभरून फोटो काढले. समोर सूर्य अस्ताला जात होता त्यामुळे साऱ्यांनाच चहाची तलप लागली. 


पुढे आम्ही मांजलेगाव या ठिकाणी चहासाठी थांबलो. दुकानाचं नावं होतं 'मातोश्री'. विनोद सरांना दुकानात जाताना पाहून मी मजेत म्हटलं, "आताच्या घडीची ब्रेकींग न्यूज..विनोद घाटगे मातोश्रीवर दाखलं..." हे इतारांच्या कानावर पडताच सगळ्यांनी मला अक्षरशः घाणेरडा लूक दिला. असो, दुकानात शिरताना एक कढई दिसली त्यात दूध तापत होतं आणि त्यावर भरपूर मलई होती. त्या पदार्थाचं नाव होतं "मलाई दुध". चहाला जय महाराष्ट्र करत आम्ही सगळे मलाई दुधाकडे वळलो. पहिला घोट घेतला आणि सर्वांचेच डोळे फिरले. त्या दुधाची चव किती भन्नाट होती हे चार शब्दांमध्ये मला अजिबात सांगता येणार नाही. आम्ही अजून एक एक ग्लास प्यायलो... मन तृप्त झालं.


संध्याकाळी 4.30 वाजता बीडला पोहोचणारे आम्ही  संध्याकाळी 7.30  च्या दरम्यान बीडमध्ये दाखल झालो. गोविंद सरांनी सजेस्ट केलेलं हॉटेल आम्ही बूक केलं होतं. संपूर्ण दौऱ्यात नांदेड ते बीड हा प्रवास सर्वाधिक वेळेचा ठरला पण इतकी मजा करत आलो की कुणाच्याही चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता. रियाज चाचांना पुन्हा फोन केला तर त्यांनी पुन्हा धक्का दिला. ते परळीतच थांबतो म्हणाले. आम्ही जास्त फोर्स केला नाही कारण सकाळी परळीहून बीडला येणं काही फार कठिण नाही. 


आम्ही  निवांत पडलो असताना एन्ट्री झाली द ग्रेट गोविंद शेळकेंची... गोविंद सरांनी आधीच फोनवर विचारलं होतं... व्हेज की नॉन-व्हेज? आम्ही तर सारे कट्टर मांसाहारी होतो. थोडावेळ रुममध्ये बसलो गप्पा मारल्या आणि पुन्हा बाहेर पडलो. गोविंद सरांना एका टिपीकल ढाब्यावर आमच्या जेवणाची सोय केली होती. परभणीत जसं होतं थोड्याफार प्रमाणात तसं पण फक्त हे शहरात होतं. आमचं जेवण येईपर्यंत आमच्या गप्पा सुरु होत्या. गोविंद सरांनी त्यांच्या फोनमधली त्यांची अनेक भाषणं मला ऐकवली. मला त्याआधी माहीत नव्हतं, किंबहुना अनेकांना अजूनही माहीत नसेल की गोविंद सर एक खूप छान वक्ते आहेत. मी त्यांना मस्करीत म्हटलं, नेते झालात तर दादा...ठाकरे... मुंडे सगळ्यांना मागे टाकाल. बोलता-बोलता आमचं जेवण आलं...गावरान चिकन, भाकऱ्या आणि भात. परभणीसारखंच इथे सुद्धा दाबून जेवलो जणू हे शेवटचंच जेवतोय. पण मजा आली!


जेवून आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो आणि झोपी गेलो. सकाळी 11 वाजता पंकजा मुंडे यांनी वेळ दिली होती. आम्ही सगळे सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास उठलो आणि पहिला फोन रियाज चाचांना केला कारण बाईक शिवाय मुलाखत करणे अशक्य होतं. रियाज चाचांनी कधी नव्हे ते पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला... मी विचारलं, "चाचा निकले ना बीड की तरफ?" चाचांनी बॉम्बच टाकला..ते म्हणाले, "मैं जा रहाँ हुँ मुंबई..बीड नहीं आऊंगा.." एक तीव्र सनक माझ्या मस्तकात गेली, पण काहीच बोलू शकत नव्हतो. नॉनव्हजे नाही दिलं म्हणून कोण इतकं फुगून बसतं?


मी ओके म्हणून फोन ठेवला आणि विनोद सरांना मॅटर सांगितला. आम्ही पुन्हा मुंबई ऑफिसला फोन करुन कळवलं आणि चाचांच्या मालकाला देखील फोन करुन परिस्थिती सांगितली. आम्ही कुठेच चुकलो नव्हतो त्यामुळे तो मालक देखील शांतपणे ऐकत होता. त्या फोनवर आम्हाला कळलं, की चाचा फक्त आमच्यावरच नाही तर त्या मालकावरही नाराज होते. असो, खूप फोनाफोनी झाली आणि चाचा बीडला यायला तयार झाले. आमचा जीव सुद्धा भांड्यात पडला. 


सकाळी 9.30 नंतर मी सतत खिडकीतून खाली रियाज चाचा आले की नाही ते पाहायचो. 10 वाजून गेले तरी त्यांचा पत्ता नव्हता. इतकं सगळं चांगलं झालं असताना शेवटच्या शूटमध्ये विघ्न येतंय की काय असं वाटतच होतं इतक्यात पुन्हा खिडकीतून खाली आणि विघ्न नाही... चाचाच अवतरले! मी होतो तसा गेलो आणि सगळ्यांना कळवलं. ही बातमी सगळ्यांना देईपर्यंत गोविंद सर सुद्धा आले.आम्हाला पंकजाताईंकडून नाशत्याचं निमंत्रण होतं. आम्ही ऑलरेडी  नाश्ता केला होता. पण आता पुन्हा करावा लागणार होता. 


आम्ही 11 च्या आधीच पंकजाताई जिथे थांबल्या होत्या तिथे दाखल झालो. आदित्य सारडा यांच्या निवासस्थानी त्या थांबल्या होत्या. आदित्य सारडांचं कुटुंब आम्हाला भारी वाटलं. शिस्त, प्रेम, आपुलकी हे सगळं आम्हाला एका छता खाली मिळालं. आदित्य सारडांचे वडील काँग्रेस नेते, पण आदित्यने मात्र भाजपची वाट धरली... महत्वाचं म्हणजे घर तुटलं नाही. सगळेत एकाच छताखाली राहतात. आम्ही जाताच सारडा कुटुंबियाने आमचं स्वागत केलं. 15 मिनिटांमध्ये पंकजाताई बाहेर आल्या आणि आम्हाला ब्रेकफास्ट टेबलकडे घेऊन गेल्या. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं काम करताना मी उद्धव ठाकरेंजवळ बसून अनेकदा नाश्ता केला आहे. त्यामुळे नवं काही नव्हतं. पण पंकजाताईंचा एक दरारा वाटला.. त्यांचा एक ऑरा होता. त्यामुळे धाकधूक वाढली होती. टेन्शनमध्ये माझ्याकडून कोल्डकॉफी प्यायची राहूनच गेली.


ब्रेकफस्ट होताच आम्ही बाहेर पडलो. 12 वाजल्यात जमा होते पण पंकजा मुंडे एक शब्दही न बोलता भर उन्हात आमच्या बाईकच्या साईडकारमध्ये बसल्या.  त्यांची मुलाखत खुप छान झाली...एका पॉईंटला त्या भावुक सुद्धा झाल्या.. अनेक किस्से त्यांनी सांगितले आणि अखेर गावच्या मंदिराजवळ मुलाखत संपन्न झाली. आम्ही पटापट फोटो काढले आणि पुढच्या शूटला निघालो. शहरातील शॉट्स आणि लोकांचे बाईट्स बाकी होते. सर्वात आधी शहरातले शॉट्स घेतले आणि सरळ एका हॉटेलमध्ये गेलो. ऊन वाढलं असल्याने तहान लागली होती... ग्लासभर ताक प्यायलो आणि जीवात जीव आला. आता लोकांचे बाईट्स करायचे होते आणि त्यासाठी मार्केटमध्ये जायचं होतं. आम्ही बाईक काढली आणि थोडं पुढे जाताच एक विचित्र आवाज आला... पाहिलं तर बेअरिंग तुटल्याने टायर लूस झाला होता. लक्ष गेलं नसतं तर अनर्थ झाला असता. तरी आम्ही देवाचे आभार मानले की पंकजा मुंडेंच्या मुलाखती दरम्यान काही घडलं नाही. 


आम्ही बाईक रिपेअरींगला पाठवली आणि बाईट्स घेण्यासाठी आम्ही कारमधून गेलो. गोविंद सरांनी कुठे आणि कसे बाईट्स घ्यायचे हे सांगितलं होतं त्यामुळे अर्ध्यातासात सगळं उरकलं. शेवटचा बाईट घेतला आणि विनोद सर अखेरचं बोलले... "मित्रांनो...पॅकअप करा!" आम्हाला दिलेली मोहिम आता संपली होती... हा आमचा शेवटचा एपिसोड होता.


मार्केटमधून सरळ हॉटेलवर आलो, कपडे बदलले, लगेज कारमध्ये टाकलं आणि परतीच्या प्रवासासाठी सज्ज झालो. मार्केटमधून सरळ हॉटेलवर आलो, कपडे बदलले, लगेज कारमध्ये टाकलं आणि परतीच्या प्रवासासाठी सज्ज झालो. रिजाय चाचा बाईक घेऊन पुढे निघणार होते त्यामुळे शेवटच्या काही आठवणी म्हणून बाईकसोबत काही फोटो आणि व्हिडीओ काढले. अतिशय भावनिक क्षण होता तो. 


असो, गोविंद सर म्हणाले होते बीडची बिर्याणी खाऊन जा पण शक्य झालं नाही. सरांचा निरोप घेतला आणि मुंबईच्या दिशेने रवाना झालो. निघेपर्यंत तीन वाजले होते...4 वाजता आम्ही एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. मी सिद्धेशला म्हटलं, "25 दिवसात पहिल्यांदा इतकं शांत बसून रिलॅक्स करत जेवतोय..". जेवण होताच पुन्हा मार्गस्थ झालो.


समोर मस्त सुर्यास्त होत होता...ड्राईव्हर काकांना सांगितलं गाडी थांबवायला आणि आम्हा सर्वांचे शेवटचे फोटो काढून घेतले. संध्याकाळी 7 वाजता आम्ही नगरमध्ये दाखल झालो. सर्वांनी चहा घेतला आणि त्याचवेळी आम्ही सरिता कौशिक मॅमना फोन करुन दौरा संपवून मुंबईला निघाल्याचं सांगितलं. 


परतीचा प्रवास सर्वांनाच जड झाला होता पण पर्याय नव्हता. 25 दिवस आम्ही एकत्र होतो, एकत्र काम गेलं, जेवलो, मजा केली आणि आता उद्यापासून हे सगळे सोबत नसणार याचं दुःख होत होतं. महत्वाचं म्हणजे अजित सर, अनिल सर आणि दिपेशला मी पहिल्यांदा भेटलो पण तरी देखील 25 दिवसात त्यांच्याशी माझं मस्त जमलं. 25 दिवसांसाठी आले पण आता कायमचे राहिले असंच म्हणावं लागेल. 


अहमदनगरहून निघालो ते थेट पुण्यात थांबलो. परतीच्या प्रवासाचा पहिला स्टॉप आला होता. सिद्धेश पुण्याचा असल्याने तो पुण्यातच उतरला. तिथेच आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं आणि सिद्धेशचा  निरोप घेतला. पुण्यात आमचे ड्रायव्हरकाका ही बदलणार होते त्यामुळे त्यांची सुद्धा शेवटची भेट घेतली.


पुण्यातून निघताना लगेच लागलेली झोप अचानक उकडायला होऊ लागल्याने उडाली. बाहेर पाहतो तर जुईनगरला पोहोचलो होतो... मुंबई जशी जवळ येत होती...शरीराला घाम सुटत होता. काही वेळाने ठाण्यात पोहोचलो. आमच्या टीमचे मुख्यमंत्री विनोद घाटगे उतरणार होते. विनोद सरांचा निरोप घेताना सगळेच भावुक झाले होते..त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. विनोद सर या दौऱ्यानंतर एबीपी माझा सोडणार होते, त्यामुळे विनोद सरांचा निरोप घेणं साऱ्यांना जड गेलं. विनोद घाटगे म्हणजे खूप भला माणूस...माझ्या आयुष्यात विनोद सरांचा रोल देव सुद्धा नाकारू शकत नाही. माझं ठाम मत आहे की माझ्या आयुष्यात विनोद घाटगे 'फरिश्ता' बनून आले. मी आयुष्यभर या माणसाचे पाय धुवायला तयार आहे इतका विश्वास या माणसाने माझ्यावर टाकला.टीव्हीवर सर्वांना झळकायचं असतं.. पण स्वःत पडद्यामागे राहून इतरांना झळकावणारा माणूस म्हणजे द विनोद घाटगे!


विनोद सरांचा निरोप घेतल्यावर ठाण्यातच अनिल सरांना टाटा-बायबाय केलं आणि मी दिपेशसह ऑफिसला आलो. घेऊन गेलेलो ढिगभर सामान ऑपरेशन्स टिमकडे सुपूर्द केलं आणि पुन्हा बाहेर पडलो. आता मी आणि दिपेश उरलो होतो. ड्रायव्हरने आधी मला सोडलं.. नंतर तीच गाडी दिपेशला घेऊन रवाना झाली... आणि दौरा संपन्न झाला!


हा दौरा आयुष्यात लक्षात राहणारा असेल..अनेक जिल्हे फिरलो, शेकडो लोकांना भेटलो, वेगवेगळ्या पद्धतीचं जेवलो, प्रथापरंपरा पाहिल्या आणि बरंच काही घडलं. नेहमी फोनवर बोलणारे अनेक स्थानिक प्रतिनिधी आम्हाला तिथे भेटले आणि कायमचे आमचे झाले. आज या सर्व जिल्ह्यांमध्ये एक का होईना आपल्या हक्काचा माणूस आहे. खरं तर हा संपूर्ण अनुभव मांडताना अनेक किस्से टाळावे लागले तर काही सांगायचे राहुन ही गेले..जितकं लिहिता आलं तेवढं लिहीण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला...काही चुकलं असेल तर माफ करा!


लवकरच भेटू!


ही बातमी वाचा: