Mumbai INDIA Meeting : पुढचे दोन दिवस सगळ्या देशाचं लक्ष मुंबईकडे आहे. इथे होतेय मोदी विरोधी पक्षांची-इंडिया आघाडीची- बैठक. देशातील एकापेक्षा एक मोठे, दिग्गज नेते मुंबईत दाखल होणं सुरु झालं आहे. कुणी दोन-दोन, तीन-तीन वेळा राज्यात एकहाती सत्ता आणली. कुणाला विविध पक्षांना सोबत घेऊन काम करण्याचा अनुभव आहे तर कुणी विचारांशी तडजोड न करता मोदी आणि भाजपविरोधात लढत राहिलंय. यातील बहुतांश पक्षांना आणि नेत्यांना भाजपने गेल्या 10 वर्षांत कधी ना कधी दुखावलं आहे, काही पक्ष तर भाजपचे तीन-तीन दशकाचे मित्र पक्ष होते. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने हे पक्ष एकत्र आले आहेत. अंतर्विरोध, विरोधाभास ठासून भरला असला तरी यांचं ध्येय एक आहे ते म्हणजे काहीही करुन मोदींच्या भाजपला हरवणं. त्यासाठी कुणाच्या नेतृत्वात पुढची लढाई लढायची हे उद्या ठरणार आहे... आपल्या सर्वांनाही तीच उत्सुकता आहे.
इंडिया बैठकीच्या तयारीबद्दल आज मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये मविआच्या नेत्यांनी माहिती दिली. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, नाना पटोले, संजय राऊत आदी नेत्यांनी भाजपवर सडकून टिका केली. इंडिया आघाडीत आणखी दोन पक्षांची भर पडल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. विविध मुद्द्यांवर समन्वय राखण्यासाठी इंडिया आघाडीची एक सुकाणू समिती असेल असं शरद पवारांनी सांगितलं.
मोदींच्या विरोधात सर्व पक्षांना सोबत घेऊन जाऊ शकेल, जनतेचा विश्वास जिंकू शकेल अशा एका नेत्याची निवड मुंबईत होणार आहे. वेगवेगळ्या विचारधारेचे एवढे सगळे पक्ष एकत्र येतायत म्हणजे किमान समान कार्यक्रमावर सहमती होईल अशी शक्यता आहे तसंच जागा वाटपाच्या मुद्द्यावर प्राथमिक चर्चा होऊ शकते.
या आघाडीतील अनेक पक्ष एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत. अगदी गेल्या वर्षीच्या निवडणुकीपर्यंत एकमेकांविरोधात लढलेले आहेत. त्याचं प्रमुख उदाहरण म्हणजे काँग्रेस आणि आम आदमी पक्ष. महाराष्ट्रात 2019 पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध लढण्यात शिवसेनेतील अनेक नेत्यांची हयात गेली. पश्चिम बंगाल, केरळ आणि पंजाबमध्ये तिच स्थिती. याच विरोधाभासावर भाजपनेही बोट ठेवलंय. आमदार नितेश राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाहीय.
इंडिया आघाडीतील सर्वात मोठा वादाचा मुद्दा राहणार तो म्हणजे जागा वाटपांचा. प्रत्येक राज्यातील राजकीय समीकरणं वेगळी. राज्यागणिक त्या त्या पक्षांची ताकद वेगळी. त्यामुळे कुणासाठी कुणी आणि किती जागा सोडायच्या हा कळीचा मुद्दा राहणार आहे. आणि त्याकडेच भाजपचं बारीक लक्ष असणार आहे. या आघाडीत सध्या तरी दोन राष्ट्रीय पक्ष आणि 24 प्रादेशिक पक्ष आहेत. या सगळ्यांकडे मिळून लोकसभेतील 142 जागा आहेत. म्हणजे बहुमताच्या आकड्यापेक्षा तब्बल 130 जागा कमी. त्याची जुळणी करायची आणि आता 301 जागा जिंकलेला भाजप सुद्धा बहुमताच्या मॅजिक फिगर जवळ पोहचणार नाही याची काळजी घ्यायची असं दुहेरी आव्हान इंडिया आघाडीतील पक्षांना पेलायचं आहे. तिथेच खरा कस लागणार आहे. भाजपच्या सर्व डावपेचांना त्याच भाषेत उत्तर देऊ शकेल, विविध संस्थांच्या दबावाला बळी पडणार नाही आणि देशभरात त्याच्या चेहऱ्यावर मतं मागता येतील अशा व्यक्तीची निवड इंडिया आघाडीला करायची आहे. त्यानंतरचा टप्पा पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा असेल पण त्यावर ज्याचे जास्त खासदार त्याला जास्त संधी असा तोडगा निघू शकतो अर्थात मॅजिक फिगरच्या टप्प्यात जागा मिळाव्या तर...
निवडणुका झाल्यानंतर एकत्र येणं वेगळं आणि ते तुलनेनं थोडं सोपं काम. पण निवडणुकीआधी सर्वांना एकत्र आणणं, चर्चा करणं, रुसवे फुगवे काढणं आणि एकत्र ठेवणे पूर्ण पणे वेगळे आणि तुलनेनं अतिशय अवघड काम. हे काम करताना इंडिया आघाडीतील मोठ्या नेत्यांचा कस लागणार आहे. सत्तेत येण्यासाठी किंवा मोदींना हरवण्यासाठी तडजोड करायला सगळे तयार असले तरी तडजोड करायची किती हा प्रश्न आज ना उद्या समोर येणार आहेच.
नरेंद्र मोदींबाबत असं म्हंटलं जातं की ते कोणतीही निवडणूक, कोणताही विरोधक हलक्यात घेत नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीच्या या बैठकीकडे त्यांचं आणि भाजपचं लक्ष असणं साहजिक आहे. विरोधकांच्या एकजुटीला भाजप कसं उत्तर देणार? महाराष्ट्रातील मविआसारखा प्रयोगाने तोंड पोळाल्यानंतर देशपातळीवर त्याची पुनुरावृत्ती होणं डोकेदुखी ठरु शकतं याची जाणीव मोदी-शाहांना आहे. त्यामुळेच हा डाव मोडण्यासाठी साम दाम दंड भेद ते वापरतील यात कुणाच्याही मनात शंका नसेल.
याच लेखकाचा हा ब्लॉग वाचा: