BLOG : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये (2020),विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनातून, विद्यार्थांची वर्षातून दोनदा परीक्षा घेतली पाहिजे,जेणेकरून  विद्यार्थ्यांवर  परीक्षेचा ताण कमी होईल,व अधिक लवचिकता मिळेल आणि त्यामुळे आनंददायी शिक्षण वातावरण निर्माण होईल,अशी शिफारस करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई), सन २०२६ पासून,एका शैक्षणिक सत्रात  दहावीच्या बोर्ड परीक्षा दोनदा घेण्याच्या नियमांना नुकतीच मान्यता दिली. पहिली परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येईल व ती सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य असेल. मे महिन्यात दुसऱ्यांदा परीक्षा घेण्यात येईल व ही फक्त कामगिरी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच पर्यायी असेल. जर एखाद्या विद्यार्थ्याने दोन्ही परीक्षा दिल्या तर दोन्हीपैकी चांगले गुण राखले जातील. विद्यार्थी विज्ञान, गणित सामाजिक विज्ञान आणि भाषा यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये कामगिरी सुधारण्याचा पर्याय निवडू शकतात. पण अंतर्गत मूल्यांकन शैक्षणिक वर्षात फक्त एकदाच होईल. आता असे दुहेरी परीक्षेचे स्वरूप विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल?काय हे करणे व्यावहारिक असेल? परीक्षेच्या मुल्यमापनाचा दर्जा कमी होईल?

Continues below advertisement

या दुहेरी परीक्षेच्या स्वरूपामुळे विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध असतील, त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी होईल,असे सांगितले जात आहे. उदाहरणार्थ,विद्यार्थी पहिल्या परीक्षेत गणित, इंग्रजी आणि विज्ञान व पुढच्या परीक्षेत इतर विषयांवर लक्ष केंद्रित करू शकतो. यामुळे विद्यार्थ्यांना विषयांची परीक्षा देताना लवचिकता प्रदान करता येईल व त्यांचा परीक्षा संबंधित ताण व चिंता कमी होऊ शकते.

परीक्षा शैक्षणिक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मोजमाप करणारे साधन म्हणून काम करतात. परीक्षा हे विद्यार्थ्यांचे ज्ञान,समज आणि कौशल्य यांचे मूल्यांकन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप करून त्यांना सुधारणा करण्याचे क्षेत्र ओळखून देण्यात मदतगार ठरतात. परीक्षेतील कामगिरीचा आढावा घेऊन विद्यार्थी त्यांच्या ताकद व कमकुवतपणाबद्दल अंतर्दृष्टी मिळवू शकतात.परीक्षा वेळ व्यवस्थापन आणि समीक्षात्मक विचारसरणी यासारखी आवश्यक कौशल्य विकसित करण्यास मदत करतात. परीक्षामुळे विद्यार्थ्यांना आव्हानांना तोंड देण्यासाठी व दबावाखाली कामगिरी करण्यासाठी तयार करतात, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढू शकतो. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना शिस्त व चिकाटीची भावना विकसित होते. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करण्यास आणि चांगले गुण मिळवण्यासाठी प्रोत्साहित करते. ध्येये व  बेंच मार्क सेट करून विद्यार्थी स्वतःला आव्हान देऊ शकतात.एकंदरीत, विद्यार्थ्यांना शिकण्यास आणि ज्ञान टिकवून ठेवण्यास मदत करण्यात परीक्षा महत्त्वाची भूमिका बजावतात.

Continues below advertisement

पण काहीजण परीक्षा हे  तणाव आणि चिंतेचे स्रोत आहे,असे मानणारे आहेत. त्या अनुषंगाने, विद्यार्थ्यांवरील तणाव कमी करण्यासाठी एका शैक्षणिक सत्रात दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला,असे सांगितले जात आहे. परंतू, दहावीची परीक्षा देणारा विद्यार्थी हा कमीतकमी 15 वर्षाचा झालेला असतो आणि तेव्हा तो  पौगंडावस्थेत असतो.दहावीची परीक्षा ही त्याच्या जीवनातला पहिला महत्त्वाचा टप्पा असतो. त्या पहिल्याच टप्प्यात, त्याला कामगिरीत सुधारणा करण्यासाठी दोन संधी देणे कितपत योग्य ठरेल?. एका शैक्षणिक सत्रात दोनदा परीक्षा घेतल्यास, विद्यार्थी परीक्षेसाठी पूर्ण तयारीनिशी न जाता, तो टप्प्याटप्प्याने अभ्यास करेल. पहिल्या परीक्षेत चांगली कामगिरी न झाल्यास पुन्हा दुसऱ्या वेळेस परीक्षेत बसण्याची संधी आहे असे मानून विद्यार्थी परीक्षा गंभीरपणे किंवा प्रामाणिकपणे घेणार नाही, याची शक्यता नाकारता येत नाही व  हीच प्रवृत्ती त्यात विकसित होईल. पण पुढील जीवनात येणाऱ्या विविध परीक्षेत त्याला नेहमीच कामगिरी सुधारण्यासाठी दुसरी संधी मिळेल,ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे जीवनातील पहिल्या महत्त्वाच्या परीक्षेतच विद्यार्थ्यांना अशी सवलत मिळणे कितपत योग्य ठरेल? 

यंदाच्या वर्षी,सन 2025 मध्ये सीबीएसईच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेला जवळजवळ 23.72 लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 93.66टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी बघता, एकादाच परीक्षा घेऊनही विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण आलेला दिसत नाही,कारण परीक्षेचा निकाल हा 93.66 टक्के एवढा लागला. एका शैक्षणिक सत्रात दोनदा परीक्षा विद्यार्थ्यांचा ताण कमी जरी कमी करणार असेल तरी  शिक्षकांवरील कामाचा ताण त्यामुळे वाढू शकतो.लवचिकता स्वागतार्ह असली तरी, फेब्रुवारी ते जून या कालावधीत दोनदा परीक्षा आयोजित करण्यासाठी शाळांना त्या काळात अध्यापन आणि मूल्यांकन या दोन्ही गोष्टीत सांगड घालणे जड जाऊ शकते. तसेच इयत्ता 11 वीच्या प्रवेश आणि एकूण शैक्षणिक वेळापत्रकाशी ते कसे जुळेल याबद्दल अधिक स्पष्टता करणे जरुरीचे आहे.

जरी दुहेरी परीक्षेची कल्पना विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्याची दुसरी संधी देते, जी बाब उत्साहवर्धक वाटते, तरी विद्यार्थ्यांचा ताण दुप्पट होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही,कारण विद्यार्थी गुणांत सुधारणा करण्यासाठी दोनदा परीक्षा देऊ शकतो.

 तसेच,त्याची वास्तविक अंमलबजावणी चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करू शकते.  शिक्षकांवर दीर्घकाळ मूल्यमापन कर्तव्यांचा ताण येऊ शकतो आणि परीक्षा वेळापत्रकांमध्ये ओव्हरलॅपिंगमुळे अर्थपूर्ण अध्यापनाचे दिवस कमी होऊ शकतात.एकंदरीत बोर्डाच्या दुहेरी परीक्षा पद्धतीमुळे शाळांच्या सुरळीत कामकाजावर गंभीर परिणाम होतील,असे काही शिक्षणतज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

सध्या एक बोर्ड परीक्षा असूनही, शिक्षक जवळजवळ चार महिने अशैक्षणिक कर्तव्यांमध्ये व्यस्त राहतात. जानेवारी ते एप्रिल पर्यंत, ते बाह्य परीक्षक, केंद्र अधीक्षक, प्रश्नपत्रिका विश्लेषक, गुणांकन योजना तयार करणारे आणि शेवटी मूल्यांकन करणारे म्हणून काम करतात. आता  वर्षातून दोनदा परीक्षा घेतल्यास,शाळेतील शिकविण्याचे/शिकण्याचे  दिवस मोठ्या प्रमाणात धोक्यात येतील. म्हणून,कोणत्याही शैक्षणिक सुधारणांमध्ये विद्यार्थ्यांचे कल्याण आणि दर्जेदार शिक्षण केंद्रस्थानी असले पाहिजे, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत पण कानावर पडत आहे.

शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि मूल्यांकन कर्तव्ये हाताळत असल्याने बोर्डाच्या एकाच शैक्षणिक सत्रात दोन परीक्षा अतिरिक्त ताण, चिंता निर्माण करणाऱ्या असतील व त्याचा परिणाम शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. त्याच बरोबर शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांचे काय?

यशस्वी अंमलबजावणीसाठी काळजीपूर्वक नियोजन, मजबूत पायाभूत सुविधा आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक असतात. हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे की धोरणामुळे विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर अनवधानाने ओझे तर वाढणार नाही आणि सर्व शाळा - शहरी आणि ग्रामीण दोन्ही - या संक्रमणाला पाठिंबा देण्यासाठी समानरित्या सुसज्ज आहेत की नाही?  फक्त परीक्षेचे पावित्र्य व दर्जा कमकुवत होऊ नये, हीच अपेक्षा.