BLOG : कंप्युटर वापरणे किंवा त्याच्यावर काम करणं ही सध्याच्या युगातील सर्वाधिक महत्वाची बाब आहे. पण तुम्हाला जर असं सांगितलं की भारतातील 15 ते 29 वयोगटातील 70 टक्क्याहून अधिक मुलांना अटॅचमेंटसहित मेल पाठवता येत नाही किंवा जवळपास 60 टक्के मुलांना कंप्युटरमध्ये फोल्डर किंवा फाईल मूव्ह-कॉपी करता येत नाही. तर कदाचित हे खरं वाटणार नाही. पण ही आकडेवारी केंद्र सरकारच्याच एका अहवालातील आहे.
मागच्या महिन्यात केंद्र सरकारचा एक अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालातील आकडे पाहिल्यास मोठी धक्कादायक माहिती समोर येते. मार्च महिन्यात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा "मल्टीपल इंडिकेटर सर्व्हे इन इंडिया" अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यावरची देशभरातील काही आकडेवारी प्रकाशित केली आहे.
मूलभूत कौशल्यही नाहीत
मल्टीपल इंडिकेटर सर्व्हे इन इंडिया या अहवालात कंप्युटरच्या वापराविषयी काही मूलभूत कौशल्यावर 8 प्रश्न देशभरातील 15 ते 29 वयोगटातील मुलांना विचारण्यात आले आहेत. कंप्युटरवर फोल्डर कॉपी-पेस्ट करण्यापासून प्रेझेंटेशन तयार करता येतं का? अशा प्रश्नांचा यात सहभाग आहे.
यात विचारलेला पहिला प्रश्न असा आहे की किती तरुणांना कंप्युटरमध्ये फोल्डर किंवा फाईल मूव्ह किंवा कॉपी करता येते. मूव्ह किंवा कॉपी करता येण्याचं प्रमाण शहरी भागात 61 टक्के आहे पण हे ग्रामीण भागात फक्त 33 टक्के प्रमाण आहे.
अटॅचमेंटसहित मेल करता येण्याचं प्रमाण शहरी भागात 45 टक्के आहे. तर ग्रामीण भागात फक्त 19 टक्के तरुणांना अटेचमेंटसहित मेल करता येतो आहे. तर कंप्युटरवर इमेज, व्हिडीओ वापरून प्रेझेंटेशन तयार येण्याचं प्रमाण शहरी भागात 17 टक्के आहे तर ग्रामीण भागात हेच प्रमाण फक्त 5 टक्के आहे.
कौशल्याचा अभाव
गेल्या काही वर्षांपासून देशात ‘डिजिटल इंडिया’ या शब्दांचा मोठा गवगवा आहे. तर गेल्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. आयटी मध्ये काम करणाऱ्या तरुणांना लाखो रुपयांची पॅकेज मिळायला लागली. कोरोना काळात यात अजून भर पडली. ही पॅकेज बघून बाकी क्षेत्रातील देखील अनेक तरुण आयटी मध्ये जाण्यासाठी धडपडू लागले.
पण गेल्या काही महिन्यात आयटी मधून मोठ्या प्रमाणात कामगारांची कपात सुरु केली. यात त्या कंपन्यांची आर्थिक गणिते हा एक मुद्दा होता. पण त्यावेळी दुसरा एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे स्किल्सचा. कोरोना काळात अचानक ऑनलाईन कामांची संख्या वाढल्यामुळे आयटी मध्ये मोठ्या प्रमाणात नव्या जॉबच्या संधी निर्माण झाल्या. पण त्यासाठी आवश्यक असणारी स्किल आपल्या मुलांकडे होती का? असा प्रश्न उपस्थित केला गेला नाही.
बेरोजगारीचा प्रश्न वाढत राहणार?
इंडिया स्किल रिपोर्ट 2022 नुसार भारतातील एकूण तरुणांपैकी फक्त 48.7 टक्के तरुण हे रोजगारक्षम आहेत. याचा अर्थ असा की भारतातील जवळपास निम्म्या तरुणांकडे नोकरीसाठी आवश्यक असलेली कौशल्ये नाहीत आणि कौशल्ये नसतील तर नोकरीच्या संधी तर कशा मिळतील, याचा विचार करावा लागेल.
सरकारी पातळीवरून अनेक योजमधून, शाळा-कॉलेजच्या अभ्यासक्रमातून तरुण पिढीमध्ये कौशल्य आधारित शिक्षणासाठी गेल्या काही वर्षात प्रयत्न केले जात आहेत. पण तंत्रज्ञान बदलाच्या या वेगात मोठा बदल होत आहे. त्या कौशल्यामध्ये काळानुसार बदल व्हायला हवे आहेत. त्याचे नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
फोल्डर किंवा फाईल कॉपी किंवा मूव्ह करता येणं -
ग्रामीण - 33.8
शहरी - 61.1
एकत्रित - 41.7
डॉक्युमेंटमधील माहिती बदलले
ग्रामीण - 31.4
शहरी - 59.2
एकत्रित - 39.4
अटॅचमेंटसहित मेल करणे
ग्रामीण - 19.2
शहरी - 45.2
एकत्रित - 26.7
सॉफ्टवेअर शोधणे आणि इन्स्टाल करणे
ग्रामीण - 15.5
शहरी - 34.0
एकत्रित - 20.9
फाईन ट्रान्स्फर करणे
ग्रामीण - 13.7
शहरी - 35.3
एकत्रित - 19.1
नवीन डिव्हाईस सुरु करणे
ग्रामीण - 7.9
शहरी - 24.5
एकत्रित - 19.9
स्प्रेडशीट वापरता येणं
ग्रामीण - 5.7
शहरी - 20.3
एकत्रित - 10.0
प्रेझेंटेशन तयार करणे
ग्रामीण - 5.0
शहरी - 20.3
एकत्रित - 10.0
प्रोग्रॅम लँग्वेज वापरता येणं
ग्रामीण - 1.3
शहरी - 5.2
एकत्रित - 2.4