BLOG : दक्षिण कोरियातल्या 30 व्या बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये फिप्रेस्की ज्युरी म्हणून निमंत्रण मिळालं. लागलीच मित्राला फोन लावला. माझ्यापेक्षा त्यालाच जास्त आनंद झाला. काही वेळानं त्याचा फोन आला. त्याची पुण्याला राहणारी भाची के-पॉपची मोठी फॅन आहे. आता तिकडे जातोय तर नक्की काय पाहायचं आणि तिच्यासाठी तिथून नक्की काय आणायचं याची यादीच त्याने पाठवली.
मित्राची भाची फक्त 13 वर्षांची आहे. तिला दक्षिण कोरियातल्या के पॉप स्टार्सची सर्व माहिती आहे. सोल शहरातला रस्ता ना रस्ता तिला व्हर्च्युअली माहित आहे. तिला ज्या के पॉपच्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळण्याची ठिकाणं, तिथं पोचायचा मॅप असा सर्व कार्यक्रम तिनं आखून दिला.
मला फार आश्चर्य वाटलं. भारतात पुण्यात राहणाऱ्या या 13 वर्षांच्या मुलीवर के-पॉपने नक्की कशी भुरळ घातली असेल याचा मी विचार करायला लागलो. अशी डायहार्ड फॅन असलेली ती एकटी नाहीय. भारतातले लाखो तरुण मुलं के पॉपचे सुपर फॅन आहेत. कोरियात जाऊन तिथले बीटीएस, स्ट्रे किड, अशा ट्रुप्सला भेटायचं आहे.
दक्षिण कोरियातल्या सिनेमांची जादू ओटीटीमुळं जरा जास्तच पसरली आहे. जणू काही गारुड घातलंय. दक्षिण पूर्व आशियातला एक छोटासा देश. तिथलं संगीत, सिनेमे जगभऱात इतके का गाजत असावेत या संदर्भातला माझा शोध सुरु झाला. काही गोष्टी आधीपासून माहित होत्या. बुसानमध्ये गेल्यावर काही गोष्टींचा उलगडा झाला. जे समजलं ते प्रचंड अचाट आहे.
के-पॉप नावाची सॉफ्ट पॉवर :
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियात 50 च्या दशकात मोठं युध्द झालं. 1950 ते 53 असं हे युद्ध चाललं. युद्धानंतर दक्षिण कोरियाला नव्यानं शुन्यातून उभं राहायचं होतं. या काळात वेस्टर्न म्युझिकचा बोलबाला होता. रॉक, पॉप, जॅझची चलती होती. 1980 च्या दशकात पॉप कल्चरनं थोडं बहोत आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. नव्वदीच्या सुरुवातीला सिओ ताजी बॉईजनं के-पॉप कल्चरची खरी सुरुवात केली. 1987 च्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेत काही खासगी कंपन्यांनी ही हवा ओळखली. त्यांनी के पॉपमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली.
के पॉपने जगाला गवसणी घालण्याच्या प्रक्रियेचा चार टप्प्यात विचार केला पाहिजे. त्याला हॅल्यू वेव्ह म्हणजे कोरियन व्हेव असंही म्हटलं जातं. कोरियाच्या सिनेमांनी पहिल्यांदा 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. चीन आणि जपान या दोन देशांमध्ये कोरियन ड्रामांना मोठी मागणी होती. ही मागणी दिवसें दिवस वाढत होती. या वेळी आशियात मोठी आर्थिक तंगी आली. या काळातही कोरियन सिनेमांची मागणी वाढत होती.
ही बाब कोरियन सरकारच्या लक्षात आली आणि त्याच काळात त्यांनी मिनिस्ट्री ऑफ कल्चर एन्ड स्पोर्स्टची स्थापना केली. याद्वारे आपल्या सांस्कृतिक उद्योगाला आर्थिक वाढीचा मार्ग बनवण्याची पहिली मुहूर्तमेठ रचण्यात आली. यासाठी कोरिया क्रिएटिव्ह कंटेंट एजन्सीमार्फत मीडिया आणि इंटरटेन्मेन्ट इंडस्ट्रीत मोठी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न झाला आणि तो यशस्वी झाला.
याचाच भाग म्हणून अनेक खासगी कंपन्यांनी आयडॉल सिस्टम तयार केली. आयडॉल सिस्टम म्हणजे स्टार तयार करायचे. यातून हॉट (H.O.T) आणि एसईसी (S.E.C.) सारखे पॉप ग्रुपला प्रमोट करण्यात आलं. देशांतर्गत मार्केटसोबत जपान आणि चीन पुरतीच त्याची व्याप्ती होती. पण हे ग्रुप धुमाकूळ घालत होते. हा होता हॅल्यू वेव्हचा पहिला टप्पा.
हॅल्यू वेव्हचा दुसरा टप्पा साल 2000 नंतर सुरु झाला. के पॉप कल्चर जपान-चीन व्यतिरिक्त इतर आशियाई देशांमध्ये पोचलं. त्या वेळच्या ली म्युन बक प्रशासनानं कोरियाला जागतिक सांस्कृतिक बॅँड करण्याची धुरा हाती घेतली. याचा प्रसार करण्यासाठी कोरिया कल्चर आणि इन्फॉर्मेशन सर्विसची सुरुवात झालीय.
या द्वारे परदेशात कार्यक्रम करण्यासाठी अनुदान आणि कर सवलतीची योजना आखण्यात आली. याचा परिणाम म्हणजे बीओए आणि टिव्हिएक्सक्यूनं जपानमध्ये जबरदस्त यश मिळवलं. आता कोरिया सरकारला या के पॉपच्या ताकदीचा चांगलाच अंदाज आला होता. त्यांनी नवे कलाकार किंवा पॉप स्टार करण्यास सुरुवात केली.
2005 ला कोरियात यूट्युब आलं. त्यानंतर तर के-पॉपचा जणू प्रसार झाला. नोबडी (2008) बिलबोर्ड हॉट 100 च्या यादीत पोहोचलं. जपान-चीनमध्ये पद्धतशीरपणे केलेला शिरकाव आणि बाकीच्या देशांमध्ये टाकलेली छोटी पावलं यामुळं के पॉप आता रसिकांच्या ओठांवर आले आणि पाय थरकायला लागले
हॅल्यू वेव्हचा तिसरा टप्पा सुरु झाला 2010 नंतर. पार्क ग्युह्यू यांच्या कारकिर्दीत. 2013 ते 2017 या कालावधीत कोरियातली क्रिएटिव्ह इकॉनॉमी तयार करण्याची योजना आखण्यात आली. जगभरात के पॉप अकादमी, सांस्कृतिक केंद्रं तयार करण्यात आली. 2012 ला पहिल्यांदा अमेरिकेत कोरियातल्या पॉप स्टारनी पहिल्यांदा कार्यक्रम केला.
त्याच काळात स्काय गन्गनम स्टाईल हे जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकाचं कारणं ठरलं. त्याच्या डान्स स्टेप्स आणि ठेका यानं लोकांना भुरळ घातली. बीटीएस (2013) आणि एक्सो, ब्लॅकपिंक, ट्वाईस सारखे ग्रुप जगभरात गाजायला लागले. आशिया खंडापलिकडे जाऊन अमेरिका आणि युरोपात लाखो-करोडो लोक त्यांच्या गाण्यावर थिरकायला लागले.
कोरिया सरकारनं त्या कालावधीत आलेल्या फेसबूक आणि ट्विटरचा वापर यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी केला. यातून ब्रँड कोरिया, व्हिजिट कोरिया सारखे कार्यक्रम हाती घेण्यात आले. जगभरातल्या पर्यटकांना कोरियानं साद दिली आणि पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे कोरियाकडे वळले.
ज्या बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये मी आलो होतो. त्या बुसान शहराच्या निर्मितीसाठी के-पॉपचा प्रभावी वापर करण्यात आला. मुद्दाम या शहरात बीटीएस आणि इतर पॉप ग्रुपचे कंसर्ट ठेवण्यात आले. यामुळं हे समुद्राला लागून असलेलं शहर जागतिक मॅपवर आलं. आज 30 वर्षामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बगलून गेला आहे. न्यूयॉर्क स्क्वेअरला टक्कर देइल असं इंफ्रास्ट्रक्टर इथं तयार करण्यात आलंय.
हॅल्यू वेव्हचा चौथा टप्पा हा 2020 नंतर आला. या काळात बीटीएस पाठोपाट स्ट्रे किड, एटीज आणि न्यूजीन्ससारखे ग्रुप झेनझीला आपल्याकडे ओढत होते. चक्क करोना काळात बीटीएसची मॅप ऑफ द सोल-वन ही हायब्रीड कंसर्ट झाली. त्यानंतर बीएटीएसनं कोल्ड प्ले, ब्लॅकपिंक यांच्यासोबत कोलॅबरेशन केलं.
आज के पॉपच्या माध्यमातून कोरियाला 10 दशलक्ष डॉलर्सची कमाई होतेय. यात 5 दशलक्ष डॉलर्स हे बीटीएसने कमावून दिलेले आहेत. हा संपूर्ण प्रवास हा धक्क करणारा आहे. आपल्या सास्कृतिक ओळखीचा वापर सॉफ्ट पॉवर म्हणून करण्यात कोरिया यशस्वी झाला आहे.
आयडॉल सिस्टम, त्यासाठी जागतिक आखणी आणि त्याद्वारे फॅनडम कल्चर या त्रिसुत्रीचा वापर करत दक्षिण कोरियानं जगभरात आपला कल्चरल दबदबा तयार केलाय. एखाद्या देशानं मनात आणलं तर आपल्या सांस्कृतिक पावरचा वापर करुन जगात आपलं स्थान तयार करु शकतं. हे कोरियानं करुन दाखवलं. याचा फायदा कोरियाचा अर्थव्यवस्थेला झाला.
आज जेनझी जनरेश कोरियासाठी वेडी आहे. त्याची कारणं या घडामोंडीवरुन स्पष्ट होतं. आपल्याकडे काय चांगलं आहे, त्याचं जगात काय स्थान आहे आणि त्यासाठी शिस्तबद्धपणे कशी आखणी केली जाऊ शकते याचं उदाहरण म्हणून दक्षिण कोरियाकडे पाहता येईल. आपण म्हणतो नवी पिढी बदलतेय, या नव्या पिढीला नक्की काय हवंय हे ओळखून आखणी केल्यास दक्षिण कोरियासारखं जगाच्या पटलावर नंबर वन होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतो.