BLOG : लोकसंगीतातून लाखो हृदयं जिंकलेली गायिका मैथिली ठाकूर आता नव्या रियाजात उतरली आहे. अलीकडेच तिनं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बिहारच्या अलीनगरमधून निवडणुकीसाठी तिला तिकीटही जाहीर करण्यात आलं. समाजकारण करायचं आहे, या साध्या पण ठाम वाक्यानं तिनं आपला नवा प्रवास सुरू केल्याचं जाहीर केलं.
मैथिलीला बालपणापासून संगीताची साथ मिळाली. घरचं वातावरण कलात्मक, आणि आवाजात पारंपरिक भारतीय संगीताची गोडी. सुरों की गंगा किंवा देव बाजाराचा भाजीपाला नाही रे म्हणून प्रसिद्ध झालेली ही तरुण गायिका सोशल मीडियावर लाखो चाहत्यांची आवडती आहे. लोकगीत, भजन, मैथिली भाषेतील गाणी आणि हिंदुस्थानी शास्त्रीय गायकीत तिचं वेगळं स्थान आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेली ही GEN-Z कलाकार लोकांच्या मनाचा सूर साधण्यासाठी तिनं राजकीय 'सरगम' सुरू केली आहे.
राजकारणात पाऊल टाकणं म्हणजे सुरांच्या सरगमेतून थेट मतांच्या रणधुमाळीत प्रवेश करणं हे करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असताना इतकं मोठं पाऊल उचलणं तिच्या आत्मविश्वासाचं आणि सामाजिक जाणिवेचं प्रतीक आहे. हा निर्णय आश्चर्याचा असला तरी, त्यात एक तरुण दृष्टिकोन दडलेला आहे.
केवळ गाण्यानेच समाज बदलत नाही, त्यासाठी धोरणनिर्मितीमध्ये सहभागी होणंही गरजेचं आहे असं मैथिलीनं म्हटलं. त्यामुळे तिच्या समर्थकांमध्ये उत्सुकता आणि आश्चर्य दोन्ही निर्माण झालं आहे.
भाजपमध्ये तिच्या प्रवेशाचं राजकीय गणितही स्पष्ट दिसतं. युवा चेहरा, संस्कृतीशी जोडलेली प्रतिमा आणि बिहारच्या मातीशी असलेली जवळीक. पक्षाला तरुण मतदारांना आकृष्ट करायचं आहे आणि मैथिली त्यासाठी योग्य चेहरा ठरतो आहे.
तिला यश किती मिळेल, राजकारणाच्या कच्च्या रियाजातून ती कितपत परफॉर्म करेल हे इतक्यात सांगता येणं कठीण आहे . पण एक गोष्ट नक्की, तिने राजकीय आलापाचा पहिला सूर घेतलाय आणि तो सूर बरोबर बसला, तर या तरुण गायिकेचं नाव आता केवळ गायनापुरतं न राहता समाजसेवा आणि राजकारणातही उमटू शकतं.
संगीतातून हृदयं जिंकणारी मैथिली, आता मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. तिचा हा राजकीय प्रवास सुरेल ठरेल की विसंगत, हे काळच ठरवेल. पण तिच्या या नव्या ‘राजकीय आलापा’ला सध्या तरी सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हा ब्लॉग वाचा: