BLOG : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आयुष्यात जी घटना सर्वांत गूढ, थक्क करणारी आणि अगदी अद्वितीय मानली जाते, ती म्हणजे त्यांची संजीवन समाधी. आळंदीच्या पवित्र भूमीवर घडलेली ही घटना फक्त धार्मिक परंपरा नाही; हा तर योगाची पराकाष्ठा आहे, जिथपर्यंत कुणीच पोहोचलेलं नाही.
माऊलींच्या समाधीबद्दल अनेक किस्से, भावना, श्रद्धा यांतून फिरतात. पण या सगळ्यांपेक्षा सर्वात ठोस, वजनदार आणि विश्वासार्ह पुरावा आपल्याला संत नामदेव महाराजांनी दिला आहे. त्यांनी एकच ओळ लिहिली— अष्टोत्तरशे वेळा समाधी निश्चळ. याचा साधा अर्थ माऊलींनी 109 वेळा समाधी घेतली.
108 नव्हे… 109!
भारतीय अध्यात्मात 108 ही संख्या पूर्णत्वाची मानली जाते. म्हणजे साधकाने 108 स्तर पार केले, तर तो ‘पूर्ण’ समजला जातो. पण माऊलींकडे 109 संख्या का आली? याचा अर्थ असा की त्यांनी पूर्णत्वाच्या पलीकडे पाऊल टाकलं. ज्या अवस्थेला शब्द नाहीत, जिथे योग संपतो आणि चैतन्याचा थेट विश्वाशी संवाद सुरू होतोत्या पातळीवर माऊली गेले होते.
“निश्चळ” म्हणजे काय?
नामदेवांनी वापरलेला “निश्चळ” हा शब्द खूप मोठा अर्थ सांगतो. देहाचा एकही भाग न हलणे, प्राण संपूर्ण स्थिर, मन पूर्ण शांत, चित्त विश्वाशी एकरूप, साधकाची पूर्ण जिवंतावस्थेत अनुभूती... ही साधी समाधी नाही. ही संजीवन समाधीची सर्वोच्च अवस्था आहे. संजीवन समाधी म्हणजे मृत्यू नाही.ती म्हणजे जिवंतपणी पंचमहाभूतांच्या पलीकडे जाण्याची सिद्धी.
ज्ञानेश्वरांचा देह ‘दिव्य देह’ का म्हणतात?
समाधीच्या संदर्भात संतपरंपरा सांगते की माऊलींचा देह हा सामान्य मानवी देह नव्हता. योगसाधनेतून त्यांनी तो ‘दिव्य देह’ केला होता. हा देह थकत नाही, मृत्यूच्या अधीन नसतो, श्वासावर अवलंबून नसतो. म्हणूनच त्यांच्यासाठी 109 वेळा संजीवन समाधी घेणे शक्य झालं. संप्रदायातील एक महत्त्वाची मान्यता अशी की संजीवन समाधीची ही अखंड, परिपूर्ण प्रक्रिया जगात एकमेव केवळ ज्ञानेश्वर माऊलींनीच केलेली आहे. त्यांच्या आधी कुणी केली नाही आणि त्यांच्या नंतर कुणी करणार नाही. संतांना योगसिद्धी असली तरीही ही उच्चतम संजीवन प्रक्रिया माऊलींसाठी राखून ठेवलेली आहे, अशी मान्यता आहे.
ज्ञानेश्वर माऊलींची समाधी – आजही जिवंत उर्जा
अळंदीच्या समाधीस्थानी गेलेला प्रत्येक भक्त हे जाणतो ते स्थान शांत नाही; ते अगदी तेजोमय, ऊर्जायुक्त, प्राणमय आहे.कारण तिथे फक्त एक समाधी नाही,तर माऊलींच्या109व्या दिव्य प्रयोगाचं अमर तेज आहे . अखेरचं सार जर एक वाक्यात सर्व काही सांगायचं झालं तर “अष्टोत्तरशे वेळा समाधी निश्चळ”
या एका वाक्यात माऊलींचं अनंतत्व, सिद्धी, आणि चैतन्यभरलेलं अमर अस्तित्व सगळं सामावलेलं आहे. माऊलींनी समाधी “घेतली” नाही. ते विश्वात विलीन झाले आणि म्हणूनच त्यांचं अस्तित्व विठ्ठलाच्या मंदिरात, वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगात, आणि प्रत्येक ओवाळणीच्या ज्योतीत आजही जिवंत आहे.