Continues below advertisement

BLOG : नवरात्रीच्या या मालिकेत आपण दररोज एका महान स्त्रीच्या जीवन प्रवासाला वंदन करतो. आजची कथा आहे लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांची. त्यांचं आयुष्य साधं-सरळ असलं तरी त्यांच्या ओव्यांमध्ये दडलेलं तत्त्वज्ञान संपूर्ण समाजाला दिशा देणारं आहे.

बहिणाबाई चौधरी यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी कोरपावली, जळगाव येथे झाला. साधारण ग्रामीण स्त्रीप्रमाणे त्यांचं शिक्षण फारसं झालं नाही. पण आयुष्यभर शेतकरी कुटुंबातील संकटं, दैनंदिन जीवनातील अनुभव, कष्ट आणि संवेदना यांचा त्यांनी आपल्या मनावर खोल ठसा उमटवला.

Continues below advertisement

ओव्यांचं सामर्थ्य

बहिणाबाई वाचलेलं फारसं नसतानाही, त्यांची निरीक्षणशक्ती आणि संवेदनशीलता विलक्षण होती. त्यांनी रचलेल्या ओव्या ग्रामीण स्त्रियांच्या भावविश्वाचं, संघर्षाचं आणि तत्त्वज्ञानाचं अचूक चित्रण करतात. त्यांच्या ओव्यांतून आपण शिकतो की कष्टाशिवाय जीवनात काहीही मिळत नाही. “जगण्यासाठी थोडं, पण मनासाठी खूप” ही त्यांची जीवनदृष्टी होती. त्यांच्या कवितेत शेत, माती, पाऊस, पिकं यांचं जिवंत चित्र दिसतं

लोककवयित्रीचं महत्त्व

बहिणाबाईंच्या ओव्यांमध्ये कुठलेही अलंकारिक शब्द नाहीत, तर साध्या बोलीभाषेतला प्रामाणिक अनुभव आहे. म्हणूनच त्या ओव्या थेट मनाला भिडतात. उदा. नातेसंबंध, दारिद्र्य, आनंद, दु:ख यावर त्यांनी ज्या सहजतेने शब्द गुंफले, त्यात खरी जीवनशाळा दिसते.

अरे घरोटा घरोटा,

माझे दुखता रे हात,

तसं संसाराचं गानं

माझं बसते मी गात

इतकं सहज, साधं तितकंच मार्मिक लिखाण बहिणाबाईंकडून लिहिलं जायचं. आयुष्याचं तत्त्वज्ञान ते हेच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरं जाणं. शिक्षण कमी असलं तरी विचार मोठे असू शकतात आणि शेतमजुरी, पाणी भरणं, स्वयंपाक यातही त्यांनी काव्य शोधलं.

प्रेरणा

बहिणाबाईंच्या ओव्यांतून आपण शिकतो की साहित्य हे मोठं शिक्षण नसून जीवनाचा अनुभव आहे. त्यांचं तत्त्वज्ञान आजच्या काळातही तितकंच लागू पडतं. आजच्या नवरात्रीत बहिणाबाई चौधरींच्या साध्या पण महान जीवनाला आणि त्यांच्या अमूल्य ओव्यांना वंदन!

हा संबंधित ब्लॉग वाचा: