BLOG : ज्याची शक्यता वाटत होती अगदी तसेच झाले. राहुल गांधींच्या कार्यशैलीवर नाराज गुलाम नबी आझाद यांनी अखेर आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आणि काँग्रेसचा हात सोडला. 2014 प्रमाणेच 2019 मध्येही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती. राहुल कंपू किंवा त्यांच्याभोवती असलेले कोंडाळे सोडले तर पक्षातील बहुतेक ज्येष्ठ नेते राहुल गांधींच्या कार्यशैलीवर नाराज होते. या नाराज नेत्यांच्या गटाला जी-23 असे संबोधले जाऊ लागले. गुलाम नबी आझाद ज्येष्ठ नेत्यांची नाराजी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कानावर घालत होते. पण त्यात काहीही होताना दिसत नव्हते. त्यामुळे अगोदर कपिल सिब्बल, राज बब्बर, जितिन प्रसाद, योगानंद शास्त्री, शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि नंतर अन्य काही नेतेही काँग्रेसचा हात सोडू लागले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षात आमूलाग्र बदल करावा असे काही नेत्यांना वाटत होते. राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधींकडे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले. राहुल गांधींकडे कोणतेही पद नसले तरी पक्षाचे सर्व निर्णय राहुल गांधीच घेत होते आणि निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात होते. डावलले जात असल्याचे या ज्येष्ठ नेत्यांना प्रचंड दुःख झाले होते. राहुल गांधी ज्याप्रकारे पक्ष चालवत होते ते अनेकांना पटत नव्हते आणि त्यामुळेच राहुल गांधींना विरोध होत होता. जिल्हा पातळीवर संघटनात्मक बदल व्हावा, घटनेनुसार अध्यक्षांची निवड व्हावी, पूर्ण वेळ कार्यरत असणारा आणि नेते, कार्यकर्त्यांना वेळ देणारा पूर्ण वेळ अध्यक्ष असावा अशी या नाराज नेत्यांची मागणी होती. या बंडखोर ज्येष्ठ नेत्यांच्या गटाला जी-23 म्हटले जाऊ लागले. बरोबर दोन वर्षांपूर्वी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये या गटाने सोनिया गांधी यांना सविस्तर पत्र पाठवून पक्षात कसे बदल करण्याची आवश्यकता आहे ते सांगितले होते.
जी-२३ गटात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, शशी थरूर, आनंद शर्मा, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, जितिन प्रसाद, भूपेंद्र सिंह हुड्डा, पृथ्वीराज चव्हाण, राज बब्बर आदि नेत्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ५ राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजीरवाणा पराभव झाला. त्यानंतर या जी-23 गटाने पुन्हा एक बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीला निष्ठावान काँग्रेस नेते मणिशंकर अय्यरही उपस्थित राहिले होते. या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी नाराज नेत्यांसोबत बैठक घेतली. गुलाम नबी आझाद यांनी सोनियांकडे पुन्हा एकदा सर्व गोष्टींचा पाढा वाचला. सोनिया गांधींनी यातून मार्ग काढू असे आश्वासन त्यांना दिले. मात्र याचवेळेस निष्ठावान विरुद्ध बंडखोर असा वाद सुरु झाला आणि बंडखोरांवर प्रचंड टीका करण्यात आली. या नेत्यांमध्ये निवडणुका जिंकण्याची ताकद नाही, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही असे राहुल गांधींचे निकटवर्तीय नेते म्हणू लागले होते. आणि त्याचाच परिणाम म्हणून सोनिया, राहुल, प्रियंका यांनी बंडखोरांकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही. आणि त्याचाच परिणाम आता दिसू लागलाय.
गुलाम नबी आझाद यांच्या पत्रातून तेच प्रतीत होतंय. या पत्रात गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींवर मोठे आरोप केलेत. राहुल गांधी 2013 मध्ये उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पक्षात असलेली सल्लागार यंत्रणा नष्ट केली. पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारून अननुभवी नेत्यांवर विश्वास ठेवत कामकाज सुरु केले. राहुल गांधी बैठकीत ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करतात. पक्षात रिमोट कंट्रोल मॉडेल अवलंबले जात आहे एवढंच नव्हे तर पक्षातील महत्वाचे निर्णय राहुल गांधी किंवा त्यांचे सुरक्षा रक्षक आणि खासगी सहाय्यक घेतात. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सरकारने जारी केलेला अध्यादेश फाडला त्यामुळे 2014 मध्ये पक्षाला लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. 2014 आणि 2019 मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. 49 पैकी 39 विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला. आज काँग्रेस फक्त दोनच राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेऐवजी देशभरातील काँग्रेसला जोडण्याची आवश्यकता आहे असे गुलाम नबी आझाद यांनी पत्रात म्हटलेय.
गुलाम नबी आझाद आता नव्या पक्षाची स्थापना करून जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेस विशेषतः राहुल गांधी आता तरी शहाणे होतील आणि पक्ष उभारण्यासाठी नव्याने प्रयत्न करतील, ज्येष्ठ नेत्यांना उचित मान देतील अशी अपेक्षा आहे. पण त्यांचे एकूण वागणे बघता ते गुलाम नबी आझाद यांच्या या राजीनाम्याकडेही गंभीरतेने पाहाणार नाहीत असे दिसते आणि गुलाम नबी आझादांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी जे घाबरले ते आझाद असे म्हटले. यावरूनच ते किती गंभीर आहेत ते स्पष्टपणे दिसतेय. मात्र गुलाम नबी आझाद यांचा हा राजीनाम्याचा लेटर बॉम्ब काँग्रेसमध्ये अनेक स्फोट घडवून आणेल असे सध्यातरी दिसतेय.