Pran Death Anniversary : एके काळी प्राण हे नाव घेतलं तरी मुली पदर सांभाळून घेत. हिंदी सिनेमातील व्हिलन प्राण म्हणजे खतरनाक माणूस अशी प्रतिमा निर्माण झाली होती. प्राण यांचे डोळे अत्यंत भेदक होते. प्रत्यक्षात मात्र प्राण खूप वेगळे होते. हा माणूस अगदी देवमाणूस होता. पडद्यावरच व्हिलन प्रत्यक्षात हिरो होता. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे प्राण आज आपल्यात असते तर ते 103 वर्षांचे असते. पण 12 जुलै 2013 रोजी त्यांचं निधन झालं.


प्राण यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1920 रोजी झाला. केवल किशनचंद सिकंद अहलुवालिया हे प्राण यांचे वडील. त्याकाळी ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते. घरची परिस्थिती अतिशय उत्तम होती. ज्या काळात सिनेमा, नाटकात काम करणे भीकेचे डोहाळे मानले जायचे त्याकाळात या श्रीमंत घरच्या पोरानं नट होण्याचं ठरवलं आणि भारतातला एक मोठा नट होऊनही दाखवलं. प्राण यांची चित्रपट कारकीर्द खरंच लक्षवेधी होती. या देखण्या कलाकाराने अभिनय केलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘जट जमला’. हा पंजाबी चित्रपट 1940 मध्ये झळकला.


तो काळ असा होता की प्राण यांचा समस्त मुली, महिलांनी धसका घेतला होता. हा माणूस कधी काय करेल, याचा भरोसा नाही. प्राण यांची ही इमेज बनण्याचं कारण म्हणजे त्यांचा पडद्यावरचा व्हिलन. प्राण यांनी व्हिलनच्या भूमिकेत अक्षरश: जान आणली होती. मात्र चित्रपटाबाहेर हा माणूस जंटलमन होता. पण विश्वास कोण ठेवणार, अशी परिस्थिती होती.


एकदा एक गंमत झाली. ‘जोहर मेहमूद इन हाँगकाँग’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. हा अनुभव अरुणा इराणी यांनी सांगितलेला आहे, आणि मी तो कुठतरी वाचलेला आहे म्हणून शेअर करतोय. प्राण यांच्या व्हिलनगिरीचे ते दिवस होते. त्यांच्या खलनायकी भूमिकेची जबरदस्त भीती आणि छाप समाजात होती.


या चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्राण आणि अरुणा इराणी कलकत्यात होते. शूटिंग संपल्यावर दोघांचा एका ह़ॉटेलमध्ये मुक्काम होता. अरुणा इराणी यांनी धसका घेतला. या डेंजर माणससोबत एकाच ह़ॉटेलमध्ये राहायचं आणि काही घडलं तर... त्या भीतीने पछाडल्या होता. प्रत्यक्षात शूटिंग संपल्यावर प्राण त्यांच्याशी अतिशय सभ्यतेने बोलले, वागले. त्यामुळे नंतर अरुणा इराणी यांनाही स्वतःच्या खुळेपणावर हसू आलं.


प्राण म्हणजे पडद्यावरील व्हिलनगिरीचा महामेरू होते. त्याच काळात राज कपूर यांचा ‘जिस देश में गंगा बहती हैं’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातील राका या प्राण यांच्या दरोडेखोराच्या भूमिकेने व्हिलनची व्याख्याच बदलली. कुठलाही आरडाओरड न करता हा दरोडखोर वावरायचा. यात प्राण सतत मानेवरून हात फिरवण्याची लकब अशी काही पेश केली विचारता सोय नाही. त्यांची ही हीच लकब सुपरहिट झाली.


प्राण यांचा अभिनय लाजबाब असायचा. त्यांच्या डोळ्यात आणि आवाजात जबरदस्त जरब होती. त्यांनी नजर भीती निर्माण करायची. त्यांची संवादफेकदेखील अप्रतिम होती. कुणाची टाप होती की त्यांच्यासमोर बोलायची. बरं व्हिलन साकारतानाही त्यात व्हरायटी असायची. कधी करारी व्हिलन, कधी लोचट व्हिलन, कधी टपोरेगिरीचा कळस, कधी छचोरीगिरी. दगाबाजी, नायिकेची छेडछाड, फायटिंग हे व्हिलनची नेहमीच कामे ते करायचे. मात्र, हे सर्व करताना त्यात ते ‘प्राण’ ओतायचे. त्यामुळे त्याकाळी पडद्यावरचा व्हिलन आणि प्रत्यक्षातील प्राण हे एकच आहेत का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडायचा.


अशा या खतरनाक व्हिलनची प्रतिमा बदलली ती मनोज कुमार यांच्यामुळे. मनोज कुमारनी ‘उपकार’ चित्रपटात प्राण यांना लंगड्या चाच्याची भूमिका दिली. या भूमिकेनंतर प्राण यांचं आयुष्य बदलून गेलं. त्यांची पडद्यावरची व्हिलनची प्रतिमा एकदम बदलून गेली. त्यांच्या वाट्याला सकारात्मक भूमिका येऊ लागल्या. ‘जंजिर’मधला शेरखान हा प्राण यांच्या अभिनय कारकिर्दीतला मैलाचा दगड म्हणावा लागेल.


याशिवाय अमर अकबर अँथनी, परिचय, मजबूर, डॉन, नसीब, कालिया, या आणि अशा सिनेमांतील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. ‘जुगनू’ चित्रपटात त्यांचा गेटअप बांगलादेशचे अध्यक्ष मुजीबूर रेहमान यांच्यासारखा होता. तर बी. सुभाष यांच्या एका चित्रपटात त्यांनी अब्राहम लिंकन यांच्यासारखी वेशभूषा केली होती. गेटअपकडे प्राण यांचं विशेष लक्ष असायचं. जंजिरमधील शेरखान आठवून पाहा म्हणजे प्राण ही काय चीज होती, हे लक्षात येतं. गंमत म्हणजे प्राण यांनी विनोदी भूमिकाही केल्या. ‘व्हिक्टोरिया 203’, ‘राजा और राणा’ मध्ये अशोक कुमार यांच्या सोबतीने त्यांनी धम्माल उडवून दिली होती.


प्राण यांचे अमिताभ बच्चन यांच्याशी अतिशय उत्तम संबंध होते. म्हणूनच एकदा अमिताभ बच्चन यांची त्यांच्या प्राणसोबतच्या सर्व चित्रपटांतील सीन एकत्र करून कॅसेट बनवली आणि ती भेट प्राण यांना दिली होती. प्राण यांना खेळात खूप रुची होती. क्रिकेट, फूटबॉल आणि हॉकीचे दर्दी होते. काही क्रीडा संघटनांशीही ते संबंधित होते. त्यांनी डायनामॉस या फूटबॉल क्लबची स्थापना केली होती. असा हा अभिनयाचा महामेरू आणि क्रीडादर्दी माणूस म्हणूनही खरोखरच ग्रेट होता.