राजकारणात कोणीही कोणाचा कायम मित्र नसतो वा कायमचा शत्रू नसतो, असं एक वापरून वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे. पुन्हा एकदा या वाक्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे सध्या नाशिकमध्ये मनसे आणि राष्ट्रवादीचं गूळपीठ जमल्याचं चित्र दिसतंय. भुजबळांच्या मफलरचा उल्लेख करत ज्या राज ठाकरेंनी जाहीर सभेत ती आवळून “कायमचं बांधकाम” करण्याचा मनसुबा जाहीर केला होता. त्याच राज ठाकरेंच्या नवनिर्माणाचे पदाधिकारी त्याच नाशिकमध्ये भुजबळांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याच्या शपथांची देवाणघेवाण करताना दिसत आहेत.

आता शपथांचीच देवाणघेवाण झाली म्हटल्यावर एकमेकांकडे येणं-जाणंही वाढलं. मग मनसेच्या जिल्हाध्यक्षांच्या हॉटेलचे उद्घाटन भुजबळांनी करणं यातही कोणाला वावगं वाटेनासं झालं. केवळ भुजबळांशी संबंधित असलेल्या एका केबलचालकाशी व्यक्तिगत आणि व्यावसायिक संबंध आहे म्हणून आपल्या नगरसेवकाला पक्षातून बहिष्कृत करणाऱ्या मनसे नेत्यांची भुजबळ फार्मवरची लगबग नाशिककरांना कुठेतरी टोचून जाते.

वास्तविक 19 मार्चच्या सभेत राज ठाकरेंनी मोदी-शाहांच्या पराभवासाठी वाट्टेल ते करा, असा आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिला. मोदी-शाहांचा पराभव करा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या पखाल्या वहा असा त्याचा अर्थ नाही. पण सोयीस्कर अर्थ काढत मनसेचे बिनीचे शिलेदार फार्मवर नियमित हजेऱ्या लावताना दिसून येत आहेत. अर्थात बेरजेच्या राजकारणात भुजबळ किती तयार आहे, हेच यातून दिसून येते. 19 तारखेच्या राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेचेही स्थानिक येते प्रत्येक ठिकाणी आपल्याबरोबर असतील याची दक्षता आवर्जून घेतली गेल्याचं दिसून येतेय. पण या निमित्तानं दिसून येतेय तो सत्तेचा आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या डावपेचांचं गलिच्छ प्रदर्शन.


गेल्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळाले नाही. तीनही आमदारांचा पराभव झाला. महापालिकेतली नगरसेवकांची संख्या चाळीस वरुन थेट पाचवर आली. भाजपला यावेळी नाशिककरांनी भरभरून साथ दिली. पण भाजपाच्या तिन्ही आमदारांची तोंडे तीन दिशांना असल्याचं लगेचच दिसून आलं. एका आमदाराला महापालिका आंदण दिल्याने बाकी दोन आमदारांचा मुखभंग झाला. महापालिकेत लोकाभिमुख निर्णय घेण्याऐवजी बिल्डर आणि बड्या ठेकेदारांना धार्जिणे निर्णय होऊ लागले. त्यातच तुकाराम मुंढेंसारखा आयुक्त आल्याने नगरसेवक आणि आमदारच नाही तर नाशिककरांनाही काही निर्णयाचा फटका बसलाय. यामुळे नाशिककरांना काही प्रमाणात झालेल्या चुकीची जाणीव निश्चित झाली. “ यापेक्षा मनसे आणि राज ठाकरेंनी नाशिकसाठी खूप काही केले” अशा प्रतिक्रिया हळूहळू व्यक्त व्हायला लागल्या होत्या.

लाटेवर स्वार होऊन मतांचं भरभरुन दान देणाऱ्या नाशिककरांची ही मानसिकता राज ठाकरेंनाही माहित नसेल, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. अशा परिस्थितीत राजने जर नाशिकला मुक्काम ठोकून सूत्रं हातात घेतली असती आणि पूर्ण जोर लावला असता, तर नाशिकच काय, पण दिंडोरीच्या जागीही चमत्कार घडू शकला असता. भाजपाकडून भ्रमनिरास झालेल्या नाशिककरांची ही नाडी राज ठाकरेंऐवजी भुजबळांनी अचूक ओळखली, असंच म्हणावं लागेल. पण ज्या भुजबळांच्या विरोधात उभं राहिल्याने नाशिककरांनी तब्बल 40 नगरसेवक आणि तीन आमदार राज ठाकरेंच्या नव्या पक्षाला दिले. त्याच राज ठाकरेंचे माजी महापौर आणि इतर बिनीचे पदाधिकारी भुजबळांच्या विजयासाठी झटत आहेत, हे चित्र नाशिककरांना दुखावणारे आणि विचार करायला भाग पाडणारे आहे, हे निश्चित.

ता.क. – आता राज ठाकरेंच्या सभांच्यावेळी केबलचे लाईट जात नाहीत, वा केबलही कट होत नाहीत. त्यामुळे सर्वजण त्यांची भाषणं बिनदिक्कतपणे टीव्हीवर पाहू शकत आहेत.