BLOG : किशोरकुमार (Kishore Kumar) माहित नाही, त्याचं गाणं ऐकलं नाही, असा माणूस किमान भारतात तरी शोधून सापडणार नाही. त्याचं गाणं ऐकल्याशिवाय भारतीयांचा एकही दिवस जात नाही. असा सर्वांचा लाडका पार्श्वगायक-अभिनेता किशोरकुमारचा 4 ऑगस्ट हा जन्मदिन. किशोरकुमार आज आपल्यात असता तर आपण सर्वांनी त्याचा 94 वा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला असता. किशोरकुमार आज आपल्यात नसला तरीही गाण्यांमधून तो कायम आपल्यातच आहे आणि राहील, याहून अधिक काय हवं!


खरं तर किशोरकुमारचा वाढदिवस (Kishore Kumar Birth Anniversary) असं म्हणण्यात जो आपलेपणा आहे तो ‘यांना‘ म्हणण्यात नाही. किशोरकुमार म्हणजे भारतीय संगीतक्षेत्रातील एक अद्वितीय नाव. किशोरकुमार पार्श्वगायक होताच. शिवाय अभिनेता, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक, कथालेखक, गीतकार आणि खूप काही होता. याची झलक पाहायची असेल तर त्यांचा ‘दूर गगन की छाव में‘ हा चित्रपट पाहायला हवा. एरवी धम्माल करणाऱ्या किशोरचं यात संवेदनशील अभिनेत्याचं दर्शन घडलं होतं. दुर्दैवाने या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही.


किशोरकुमार खूप नटखट होता. कुठेही असला तरी तो अगदी लहान मुलासारखा खोड्या काढायचा. मग समोर लताबाई असो किंवा मोहम्मद रफी. किशोरकुमार फूल टू धम्माल करायचा. त्यामुळे त्याचं आगमन झालं की सेट किंवा स्टुडिओतील वातावरण एकदम हसमुख व्हायचं. आणि या माहौलचा आनंद अदी लताबाई, मोहम्मद रफी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी घेतलाय. 


किशोरकुमारच्या बाबतीत अनेक धमाल गोष्टी सांगितल्या जातात. त्यातील एक म्हणजे ‘पाच रुपय्या बारा आना’ हे गाणं. इंदूरमधील कॉलेजमध्ये असताना किशोरकुमारने कॅन्टिनवाल्याचे 5 रुपये 12 आणे थकवले होते. ही थकलेली रक्कम म्हणजेच ‘चलती का नाम गाडी‘मधील ‘पाच रुपय्या बारा आना‘ या गाण्याचा जन्म.


तुम्हाला माहीत आहे का, किशोरकुमारचं खरं नाव आहे आभासकुमार. होय आभासकुमार आणि त्यानं संगीताचं कुठलंही शिक्षण घेतलेलं नाही. जे काही त्याच्या गळ्यातून बाहेर पडलं ते गॉड गिफ्टेड़ म्हणजे दैवी देणगी म्हणावी लागेल. गाण्याचा कुठला प्रकार किशोरनं गायलेला नाही, हाच खरा प्रश्न आहे. किशोरकुमारची सर्वच गाणी आनंद देतात. त्याची सोलो गाणी असोत किंवा ड्युयेट. किशोरचं अस्तित्व गाण्यात हमखास जाणवतं. तरीही शास्त्रीय संगीतावरील अगदीच रागधारी गाणं असलं की किशोरकुमार फार सावध व्हायचा. ‘नमकहलाल‘ चित्रपटात ‘पग घुंगरू बांध मीरा नाचती थी‘ हे गाणं किशोरनं असं काही गायलंय की विचारता सोय नाही. पण याच गाण्यातील जो रागधारी भाग आहे तो गायलंय पी. सत्यनारायण मिश्रा यांनी. कारण याबाबत किशोरकुमारने अगदी प्रामाणिकपणे असमर्थता दर्शवली होती.


एक गाणं आहे जे किशोरकुमारनं पुरुष आणि महिला अशा दोन्ही आवाजात गायलं. 1946 मध्ये झळकलेल्या 'शिकारी' या चित्रपटात किशोरनं गायलेलं हे गाणं अगदी भन्नाट होतं. 'आके सीधी लगी दिल पे... ' हे गाणं प्रत्यक्षात लता मंगेशकार गाणार होत्या, असं सांगितलं जातं. पण किशोरकुमारनेच दोन्ही आवाजात ते गायलं. हे गाणं आजही ऐकलं की किशोरकुमारच्या आवाज किती तयारीचा होता, याचा पुरपूर अंदाज येतो. 


यॉडलिग ही किशोरकुमारची खासीयत. त्यासाठी त्यानं खूप सराव केला. परदेशी गायकांच्या गायकीचा त्यानं खूप अभ्यास केला. त्यानंतर किशोरकुमारने यॉडलिंगचा केलेला वापर म्हणजे गाण्याला चार चांद होते. हिंदी सिनेसृष्टीत यॉडलिंग आणण्याचं श्रेय किशोरकुमारला जातं.


पडद्यावर अत्यंत नटखट, धम्मालमस्ती करणारा किशोरकुमार प्रत्यक्षातही तसाच अवलिया होता.  स्टुडिओ, सेटवर तो अनेक गमतीजमती करायचा. चलती का नाम गाडी, बाप रे बाप, हाफ तिकीट, दिल्ली का ठग, आशा, नयी दिल्ली, मनमौजी, नॉटी बॉय, प्यार किये जा आदी किशोरकुमारने धम्माल केलेले सिनेमे आहेत. हे चित्रपट खूप गाजले. आणि या चित्रपटांतील गाणीही गाजली.


किशोरकुमारने अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. मराठीतील 'अश्विनी ये ना' आणि 'अगं हेमा, माझ्या प्रेमा' ही गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत. आणि ही दोन्ही गाणी अशोक सराफ यांच्यावर चित्रित आहेत.


मध्य प्रदेशमधील खांडवा ही किशोरकुमारची जन्मभूमी. खांडव्याबद्दल त्याला अपार प्रेम आणि आकर्षण होतं. त्याला खांडव्याला जाण्याची खूप ओढ होती. आयुष्यातील शेवटचे क्षण त्याला खांडव्यामध्ये शांतपणे जगायचं होतं. पण काळाला ते मंजूर नव्हतं. अखेर 13 ऑक्टोबर 1987 रोजी किशोरनं जगाचा निरोप घेतला. 


किशोरकुमारची सर्व गाणी श्रवणीय आहेत. तरीही 'आंधी'मधील संजीवकुमारवर चित्रित केलेली त्याची सर्व गाणी अगदी खास आहेत. 'मुसाफिर हु यारो' म्हणणारा किशोर पूर्ण वेगळा वाटतो. हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले, ये शाम मसतानी, माय नेम अँथनी गोन्सालवीस, मै शायर बदनाम, दिल ऐसा किसी ने मेरा तोडा, मेरे सपनो की रानी कब, जरुरत हैं जरुरत हैं, मैं हू झुम झुम झुम झुमरू, आज पहिली तारीख हैं, हमे तुमसे प्यार कितना ही आणि अशी अनेक गाणी ऐकली की किशोरकुमार नावाची चीज किती भन्नाट आहे, याची खात्री पटते. किशोरकुमार सर्व संगीतकारांसोबत गायलंय. तरीही किशोरची खरी जोडी जमली ती आरडीसोबत. किशोरकुमार आरडी आणि आशा भोसले हे त्रिकूट अफलातून होतं. 


4 ऑगस्ट 1929 रोजी जन्मलेल्या आभासकुमारने भारतीय संगीतविश्व समृद्ध केलं. 'रुक जाना नही तू कहीं हार कें' म्हणणारा किशोरकुमार गेला तो शरीरानेच. संगीतरुपाने तो कायमच आपल्यात आहे. किशोरकुमारला आपल्यातून जाऊन 36 वर्ष झालीत. पण खुद्द किशोरनंच गायलं होतं 'कभी अलविदा ना कहना'. त्यामुळे जोपर्यंत संगीत आहे तोपर्यंत किशोरकुमार कायम सर्वांच्या स्मरणात राहील, एवढं मात्र नक्की.