व्हर्जिनिटीबाबत असा प्रश्न विचारल्यावर असंच उत्तर दिलं गेलं पाहिजे, असं माझं मत आहे. हा प्रश्न, हे उत्तर फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही लागू होतं. मुळात आर यू व्हर्जिन? हा प्रश्न विचारलाच का जावा? व्हर्जिनिटी म्हणजेच चारित्र्याचं सो कॉल्ड सर्टिफिकेट आहे का? जेव्हा माहित असतं की तथाकथित व्हर्जिनिटी ज्याच्यावरून ठरवली जाते तो पडदा कशामुळेही फाटू शकतो, तरीही व्हर्जिनिटीला इतकं महत्व मिळतं हे ऐकून, पाहूनच चीड येते.
हा प्रकार पाहिल्यावर डोळ्यासमोर उभा राहिला तो कांजारभाट समाज. या समाजात कौमार्य चाचणी घेतली जाते. याला या समाजातल्या तरुणांनीही विरोध केला. आंदोलनही झाली. काही तरुणांना मारहाण झाली, त्यांना वाळीत टाकल्याचाही प्रकार घडला. कायद्याच्या धाकामुळे हे प्रकार आता उघड होत नाहीयत. मात्र हे पूर्णपणे बंद झालेत का? तर उत्तर नाही असंच आहे. याला जबाबदार कोण? तरुणी, जो या प्रथेच्या नावाखाली होत असलेली पिळवणूक सहन करतायत आणि तरुणही जो ही प्रथा मान खाली घालून आजही पाळतायत. कौमार्य चाचणी देणाऱ्या आणि घेणाऱ्यांची मानसिकताही समजून घेतली गेली पाहिजे. मुली आपल्या आई वडिलांची लाज जावू नये म्हणून निमूटपणे सहन करतात. तर मुलं आपल्या नशिबी माल खोटा आला, याचा शिक्का बसू नये, समाजात अब्रू जाऊ नये, म्हणून हे सर्व काही भोगतात.
कौमार्य चाचणीबाबत तरुण वयातल्या मुला मुलींवर त्यावेळी असलेल्या मानसिक दडपणाचाही विचार केला पाहिजे. अबालवृद्ध, समाजातल्या वरिष्ठांनी अनेक पावसाळे पाहिलेले असतात. नक्कीच ते खूप अनुभवी असतात. मात्र बदलत्या वर्षासोबत त्यांची विचारसरणी काही बदलत नाही. समाजात राहायचंय, परंपरा पुढे चालवायचीच. या एकाच भावनेतून आणि कट्टरपणाचा आव आणत ही प्रथा ते जोपासतात आणि मुलांवरही त्याची बंधनं लादली जातात.
एकीकडे परंपरेच्या जोखडाखालील बुरसटलेपणा तर दुसरीकडे सध्या मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये बोकाळू लागलेली तथाकथित व्हर्जिनिटी परत मिळवण्याची आंधळी धडपड. सुशिक्षित स्रीयांची. मात्र, सारखीच बुरसटलेपणाची. एकीकडे परंपरेच्या नावाखाली. दुसरीकडे फॅशन फॅड म्हणून. पण बुरसटलेलीच.
किती विचित्र वाटतं, एकीकडे कांजारभाट समाजातले काही तरुण, तरुणी या प्रथेविरोधात लढतायत, तर मुंबई, पुण्यातल्या मुली कौमार्य परत मिळवण्यासाठी धडपडताययत. मुंबई पुण्यातल्या मुली लग्न ठरताना होणाऱ्या सासरच्या मंडळींच्या, कौमार्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अडचण येऊ नये, आई-वडिलांना शरमेनं मान खाली घालावी लागू नये, याकरिता कौमार्य शस्त्रक्रिया करुन घेतायत, अशी ही बातमी. तथाकथित कौमार्याला मुलींकडूनच इतकं महत्व दिलं जातंय, ही बातमी ऐकूनच धक्काच बसला.
कौमार्य गमावणं म्हणजे फक्त शारीरिक संबंधातूनच हे घडतं, हे विचारच आता चुकीचे ठरलेयत. त्यामुळे तसं मानणंच बुरसटलेलं वाटतं. मुलीच्या कौमार्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाने याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आजच्या महागाईच्या जगात घरखर्च सुरळीत चालावा, २ पैशाची बचत व्हावी, यासाठी मुलीही धडपडतात. शहरी भागातला तासनतासचा प्रवास हा तर झाला अतिताणाचा भाग. मात्र खेळ विश्वात आपलं करियर करु इच्छिणाऱ्या किंबहुना खेळाची अतिआवड असणाऱ्या मुलींचा तो पडदा कधीही फाटू शकतो. फिटनेससाठी केला जाणारा व्यायाम हे ही महत्वाचं कारण असू शकतं. सध्याच्या काळात सायकलपासून बाइकपर्यंत बिनधास्त वेगानं पुढं चाललेल्या स्त्रीयांचं योनीमार्गातील ते नैसर्गिक पडदा तसाच राहील, अशी अपेक्षा बाळगणंच मूर्खपणाचं. तसंच ते केवळ शरीरसंबंधांमुळेच फाटलं असावं असं मानणं तर विकृतपणाचंच!
आपल्या डोळ्यावरचा पडदा सरकला, की सर्व गोष्टी स्पष्टपणे दिसतील. मात्र जाणूनबुजून हा पडदा हटवला जात नाहीय. विकृत मानसिकतेतून मुलीला माल म्हणाऱ्यांना.. माल खरा की खोटा? ही प्रथा, परंपरेच्या नावाखाली टॅगलाईनच देऊन टाकलीय. काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर stop the v ritual हे अभियान राबवलं गेलं, जी आजची गरज वाटते.
सध्याच्या काळात तरूण-तरुणींमध्ये शरीर संबंधांविषयीही मोकळेपण वाढलंय. पूर्वीसारखा तेवढं त्याबद्दल गैर मानलं जात नाही. असाही एक वर्ग आहे की ज्यांना त्यात काय विशेष...आलं मनात..पटलं आमचं...झाले संबंध. त्यासाठी आम्ही का कुणाला विचारायचं? अशी मानसिकताही वाढतेय. अर्थात याचं समर्थन नसलं तरी ज्याला-त्याला जर ते सुजाण असतील तर तेवढं स्वातंत्र्य दिलंच पाहिजे. मात्र, यातही एक भेदभाव स्पष्टपणे दिसतो. खुपतो. असे संबंध ठेवणाऱ्या जोडप्यांमधीलीही स्त्रीकडेच बोट दाखवलं जातं. तरुणीच्या चारित्र्यावर बोट ठेवताना चार बोटं आपल्याकडेही आहेत, उत्तर देण्यासाठी आपणही बांधिल आहोत, याचं शुद्ध भान तरुणाला आणि त्याच्या कुटुंबियांनाही असायला हवं. तरुणींनी कौमार्या शस्त्रक्रिया करायची गरज नाहीय तर आता बुरसटलेल्या सामाजिक मानसिकेची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आलीय.
स्त्रियांनाही एक सांगणं... स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत ठेवता.. समजा जर तुमचं आयुष्य तुम्ही कसंही जगलेला असाल.. आर यू व्हर्जिन? असा प्रश्न विचारणाऱ्यांना थेट विचारा...इफ नो… सो व्हॉट?
आर यू व्हर्जिन? इफ नो… सो व्हॉट?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 May 2019 06:18 PM (IST)
स्त्रियांनाही एक सांगणं... स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत ठेवता.. समजा जर तुमचं आयुष्य तुम्ही कसंही जगलेला असाल.. आर यू व्हर्जिन? असा प्रश्न विचारणाऱ्यांना थेट विचारा...इफ नो… सो व्हॉट?
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -