मन सुद्ध तुझं। भाग 5 : आज माणसाचे मन आधीच विक्षिप्त झालेले आहे. त्याला आणखी बावचळून टाकण्याचे काम टीव्ही आणि ओटीटीवरील बर्‍याच मालिका इमानदारीने करतात.  परंतु दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी जेव्हा एखादी टीव्ही मालिका घेऊन येतात तेव्हा तिला निश्चित दिशा आणि उद्देश असतो. सध्या 'एबीपी माझा' या बातम्यांच्या वाहिनीवर त्यांची मालिका सुरू आहे. नांदेड येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांच्या अनुभवांवर आधारित 'मन सुद्ध तुझं' ही मालिका दर रविवारी सकाळी साडेदहा वाजता दाखवली जाते. 


काही लोकांना सतत काही ना काही चिंता करण्याची सवय असते. टेन्शनचे एक कारण संपले की ते दुसरे कारण शोधून काढतात. अतिकाळजी करणे, सतत नशीबाला दोष देणे, निराशेचा सूर लावणे ही सगळी लक्षणे घेऊन 'शहाणे' नावाचे एक गृहस्थ मानसोपचारतज्ज्ञाकडे येतात. एबीपी माझा वाहिनीवरील 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा हा पाचवा भाग. 


आमच्या ओळखीचे एक गृहस्थ होते. ते सतत दोन वाक्ये बोलत. "काही खरे नाही" आणि "अवघड आहे". त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगावर या दोन वाक्यांचा उतारा ठरलेला असे. मग हळूहळू या दोन वाक्यांची लागण त्यांच्या आसपास झाली आणि ते घर त्यांनी नैराश्याच्या दरीत ढकलले. कुठल्याही नवीन माणसाला भेटणे किंवा आव्हानाला सामोरे जाण्याची क्षमता त्यांनी गमावली होती. हा त्यांचा स्वभाव नव्हता. मनाचा आजार होता.


माणसाचा स्वभाव आणि मनाला झालेला आजार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे एकदा स्पष्ट कळले की, आजारावर वेगळा उपाय करता येतो. स्वभावालाही औषध असते, पण ते घेण्याची इच्छा रुग्णातही असावी लागते.


हे शहाणे सतत बायकोच्या तक्रारी करतात. त्यांच्या लहान मुलीला झटके येतात म्हणून ते जेवढी काळजी करतात तेवढी काळजी बायकोच्या चेहर्‍यावर दिसत नाही असे म्हणतात. मात्र त्यांच्या बायकोचे म्हणणे असते की, "शहाणे सतत लोळत असतात. उत्साह नसतो. उन्हातच जाऊ नको, पावसातच जाऊ नको, अशा सतत सूचना करतात."


या सर्व निराश वातावरणाला कंटाळून श्रीमती शहाणे एका शाळेत नोकरी धरतात. त्यात त्यांचा काही वेळ आनंदात जातो खरा, पण घरी असलेल्या शहाणेंचा दुर्मुखलेला चेहरा आठवला की त्यांनाही अपराधी वाटते.
त्या वैतागून डाॅक्टरांना विचारतात की, "यांना झालंय तरी काय?" त्यावर डाॅक्टर सांगतात की, हा क्राॅनिक डायस्थेमिया नावाचा आजार आहे. आकाशात मळभ दाटून येते, पण पाऊस थोडाच पडतो आणि अंधार तसाच साचून राहतो तसा हा आजार आहे. हा स्वभाव नाही. या आजारावर उपचार करता येतात.


काही दिवसांनी शहाणेंची मुलगी बरी होते. मग शहाणे टेन्शनचे नवे कारण शोधून काढतात. त्यांच्या बायकोचे एक छोटेसे ऑपरेशन ठरते. तेव्हा संमतीपत्रावर सही करायची त्यांना भीती वाटू लागते. ऑपरेशन सुरू असताना बाहेर बसून राहण्याचेही दडपण येते, असे ते सांगतात.


शेवटी डाॅक्टर शहाणेंना खडसावतात की, या आजाराचा फार आनंद लुटताय का? सगळ्या घराने तुमच्या भोवती फिरावे यात तुम्हाला मजा वाटत असेल तर ते थांबवा आणि नियमित उपचार करून घ्या. खिडकीतून बाहेर बघत सुखाची प्रतीक्षा करत असाल तर जरा आत वळून पहा. ते सुख तुम्हाला घरातच सापडेल.


शहाणे खरोखर शहाण्यासारखे सर्व मान्य करतात आणि हा भाग येथे संपतो.


लाला मौजी राम नावाचा शायरही म्हणालाच आहे की,
दिल के आइने में है तस्वीरे यार।
जब जरा गर्दन झुका ली और देख ली।।