कोंडलेल्या गॅसचा स्फोट झाला तर अख्खी इमारत पाडण्याची शक्ती त्यामध्ये असते. मात्र, बुद्धीचा वापर केला तर महिनाभर स्वयंपाकासाठी त्याच गॅसचा वापर करता येतो. वयात येणार्‍या मुलांचे मनही असे अत्यंत ज्वलनशील सिलिंडर असते. अशाच एका नववीतल्या मुलीची गोष्ट 'मन सुद्ध तुझं' या मालिकेच्या तिसर्‍या भागात येते.


परी नावाची ही मुलगी स्मार्ट असते, पण अक्कल नावाची गोष्ट अजून आलेली नसते. ती अचानक खड्ड्यात पडावी तशी प्रेमात पडते. तिचे आईवडील नेहमीप्रमाणे आकांडतांडव करून बघतात. त्यावर ती आत्महत्येची धमकी देते. आणि मग हे प्रकरण मनाच्या डॉक्टरकडे येते. 


डॉक्टर त्यांच्या टेबलवर ठेवलेले मेंदूचे मॉडेल परीला दाखवतात आणि तिला सांगतात की, सध्या तिला जे प्रेम वगैरे वाटते आहे ती मेंदूच्या मधल्या भागातून रक्तात मिसळणारी रसायने आहेत. त्यावर बुद्धीचा ताबा ठेवणारा भाग अजून वाढतो आहे. माणूस आणि प्राण्यांमध्येही हा मधला भाग सारखेच काम करतो. त्यामुळे वयाच्या 18व्या वर्षांपर्यंत आपल्याला गाडी चालवण्याचा परवाना मिळत नाही, मतदानाचा हक्क मिळत नाही. स्वतःची बुद्धी वाढत नाही तोवर आई-वडिलांच्या बुद्धीचा वापर करावा लागेल हे स्मार्ट परीच्या लक्षात येते. हा भाग येथे संपतो. पण तो अनेक कुटुंबांना मार्गदर्शक ठरतो.


'दिल है के मानता नहीं' असे म्हणून ज्या दिलाचे स्तोम चित्रपटांमधून माजवले जाते ते 'दिल' वगैरे नसून मेंदूचा मधला भाग आहे. उचंबळून येणार्‍या भावना, उत्कट प्रेम, उफाळून येणारा राग इत्यादी सर्व काही या भागातून येते. बुद्धीचे लगाम नसतील या भावनांचे भरधाव घोडे मुलांच्या आयुष्याला फरफटत घेऊन जातात.


अनेक मुले-मुली कमी वयात घर सोडून पळून जातात. पुढे आत्महत्या करतात, एकमेकांचे खून करतात किंवा आणखी कुणासोबत पळून जातात. काही भामटे तरुण वयात येणार्‍या मुलींना नादाला लावून पुढे विकून टाकतात. किंवा धोका दिलेल्या मुली एक-दोन अपत्ये पदरात घेऊन कायमच्या माहेरी येतात.


मुलांच्या ज्वलंत भावनांवर पोळी भाजणारे गल्लाभरू लोक कधीच यावर उपाय सांगणार नाहीत. म्हणून 'मन सुद्ध तुझं' मालिकेचा हा तिसरा भाग सर्व पालकांनी व त्यांच्या मुलांनी अवश्य पहावा. ज्यांच्या घरात अशी समस्या आहे त्यांनी मुलांना मारझोड न करता मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. मुलांचे आयुष्य उभारण्यासाठी एवढे केलेच पाहिजे.

BLOG | 'सुद्ध' मनाची मालिका

BLOG | सवाल उतने नहीं हैं...