चिपको चळवळीचे प्रणेते, ज्यांनी आपल्या कामाने जगभरातील पर्यावरणवाद्यांना दखल घ्यायला लावली अशा सुंदरलाल बहुगुणांचं 21 मे रोजी निधन झालं. कोरोनाने आतापर्यंत ज्या काही प्रतिष्ठीत लोकांचा बळी घेतलाय त्यामध्ये सुंदरलाल बहुगुणांची गणना होऊ शकेल. सुंदरलाल बहुगुणा यांना 8 मे रोजी कोरोनाची लागण झाली आणि त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर दोन आठवड्यांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूमुळं भारतातील पर्यावरण चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे. देशात जे काही मोजके गांधीवादी कार्यकर्ते राहिले होते त्यांच्यापैकी एक असणाऱ्या सुंदरलाल बहुगुणांच्या निधनाने जे काही नुकसान झालंय त्याचं मूल्यमापन शब्दात करता येणार नाही.


मला आठवतं, 1986 सालच्या उन्हाळ्यात माझी त्यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली होती. ती नेमकी तारीख जरी मला आठवत नसली तर त्यांच्याशी झालेली भेट कधीही न विसरणारी होती. रामचंद्र गुहांच्या 1989 सालच्या 'द अनक्वाएट वूड्स : इकॉलॉजिकल चेंज अॅन्ड पिझंट रेसिस्टन्स इन हिमालया' या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीचा काही काळ होता तो. चिपको चळवळीला जवळपास एक दशक होऊन गेलं होतं आणि त्या संदर्भात मी बहुगुणांना एक पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर एक-दोन आठवड्यानंतर माझ्या पश्चिम दिल्लीतील घरी एक तपकिरी रंगाचं दहा पैशाचं स्टॅम्प असलेलं पत्र आलं. बहुगुणांनी त्यात लिहिलं होतं की, ते पुढच्या आठवड्यात काही कामानिमित्तानं दिल्लीला येणार आहेत. त्यानंतर ते इंटरस्टेट बस टर्मिनलमधून रात्रीची बस पकडून गडवाल भागातील त्यांच्या टेहरी या ठिकाणच्या आश्रमाला जाणार आहेत. आपल्यासोबत टेहरीला येऊन काही दिवस आश्रमात राहणार का असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. तो काळ इंटरनेटचा नव्हताच, पण त्या काळी टेलिफोनही त्यांच्या जीवनशैलीपासून दूर होता. त्यामुळे इंटरस्टेट बस टर्मिनलवर उपस्थित जरी राहिलं तर ते पुरेसं होतं. 


आम्ही मध्यरात्री बसमधून सिलियारा आश्रमकडे निघालो. कदाचित सात ते आठ तासांनी त्या बसने आम्हाला एका मुख्य रस्त्यावर सोडलं असेल. त्याच्या आश्रमाकडे जाणारी वाट होती. बहुगुणा त्यावेळी माझ्या वयाच्या दुप्पट होते, परंतु त्यांनी त्या पर्वातामध्ये चालताना मला खूपच मागं टाकलं. त्यांनी मला सांगितलं की, पर्वताची हवा त्यांच्या फुफ्फुसांना बळकट करते. त्या ठिकाणी काही रस्ते होते, गाणे गात त्यांनी ते पालथे घातले. आश्रमात आमचं स्वागत त्यांच्या पत्नी विमला यांनी केलं होतं. विमला यांनी बहुगुणांचा प्राण वाचवला होता आणि त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा सोडून सामाजिक कार्यकर्त्याच्या नात्याने त्या प्रदेशातील लोकांची सेवा करायची या अटीवर त्यांच्याशी लग्न केलं होतं. 


'स्पार्टन' हा शब्द कदाचित आश्रमातील सुंदर वातावरण आणि सुंदरलाल आणि विमला बहुगुणा यांनी साकारलेल्या जीवनशैलीला आकर्षित करतो. आंघोळीसाठी हात पंपाच्या पाण्याचा वापर केला जायचा. बर्फ वितळत होते परंतु अगदी उन्हाळ्यातही ते पाणी अतिशय थंड वाटत होतं. त्यांनी मला आंघोळीसाठी गरम पाणी ऑफर केलं परंतु एक सल्लाही दिला की खुल्या हवेत थंड पाण्याने आंघोळ केल्यानं ते आरोग्यासाठी तर चांगलं असतंच पण स्पष्ट विचारांसाठीही मदतशीर ठरतं. विमला यांनी साध्या प्रकारचं जेवण बनवलं, त्यामध्ये फक्त ज्वारी व बार्लीचा उपयोग रोटी बनवण्यासाठी केला गेला. आपण जेवणासाठी तांदूळ आणि गव्हाचा वापर बंद केल्याचं त्यांनी सांगितलं. ही धान्यं खूपच महाग होती आणि ज्या लोकांच्यामध्ये ते काम करतात त्या गावकऱ्यांना ते परवडत नाही. याचा विचार करुन तांदूळ आणि गहू सेवन करणं त्यांना योग्य वाटलं नाही. मला सांगण्यात आलं की बार्ली आणि बाजरी अधिक लवचिक पीकं आहेत, त्याच्या वाढीसाठी कमी प्रमाणात पाण्याची गरज असते आणि संसाधनं कमी होत असताना याचा वापर करता येतो. 


"जंगलं आपल्याला काय देतात? माती, पाणी आणि शुद्ध हवा", चंडी प्रसाद भट्ट यांनी स्थापन केलेल्या परंतु बहुगुणाच्या नावाशी संबंधित असलेल्या चिपको चळवळीतील महिलांनी ही घोषणा दिली. बहुगुणाच्या समाजसेवेचं काम काही चिपको चळवळीपासून सुरु झालं असं नाही. महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन बहुगुणा यांनी, कॉंग्रेस पक्षाचं राजकारण सोडल्यानंतर, आपल्या आयुष्यातील 20 वर्षे अस्पृश्यताविरोधी काम हाती घेतलं, या पर्वतीय भागात दारुविरोधी मोहीम राबवण्यासाठी त्यांनी ग्रामीण महिलांना जागरुक केलं. चिपको चळवळीतून तयार झालेली दुसरी घोषणा, 'पर्यावरणशास्त्र ही स्थायी अर्थव्यवस्था आहे', यामध्ये बहुगुणा यांचं स्वतःचं वेगळं योगदान होतं. 
पठारी भागातील ठेकेदार हे या पर्वतीय भागात आपल्या उद्योगांसाठी लागणारे लाकुड तोडण्यासाठी यायचे. त्यावेळी या भागातील खेडेगावातील महिला त्या झाडांना मिठी मारुन उभ्या रहायच्या, जेणेकरुन त्या ठेकेदारांना त्या झाडांवर कुऱ्हाड चालवता येणार नाही. त्यातूनच 'चिपको' म्हणजे 'मिठी मारा' हा शब्द तयार झाला. 


चिपको चळवळीचे प्रणेते असं जेव्हा बहुगुणांना कोणी म्हणायचं तेव्हा ते अत्यंत विनम्रतापूर्वक सांगायचे की, उत्तराखंडमधील या महिलांनी चिपको चळवळ सुरु केली आहे. सरकारचे ठेकेदार हे क्रिकेटच्या बॅट तयार करण्यासाठी ज्यावेळी या ठिकाणच्या झाडांच्या कत्तली करायला यायचे त्यावेळी या महिला त्या झाडांना मिठी मारुन रहायच्या. अशा पद्धतीने ही चळवळ जन्माला आली. भारतातील आणि जगभरातील ज्या काही पर्यावरणवादी चळवळी अहिंसेच्या मार्गाने झाल्या त्यांचं नेतृत्व नेहमी महिलांनी केल्याचं दिसून येतंय. मोठ्या प्रमाणातील जंगलतोडीमळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच पण त्यामुळे पुरासारख्या गंभीर समस्या उद्भवतात हे पर्वतीय भागातील लोकांना समजलं आहे. तसेच ग्रामीण जीवनावर याचा गंभीर परिणाम होताना दिसून येतोय. जळण आणि चारा तसेच पिण्याचे पाणी आणि शेतीसाठीचे पाणी या सर्व गोष्टींचा तुटवडा होतोय. बहुगुणांना समजलं होतं की, या प्रकारच्या जंगलाच्या राजकीय आर्थिक शोषणावर आधारित अर्थव्यवस्थेचा फायदा हा केवळ ठेकेदार, वन अधिकारी आणि शहरात राहणाऱ्या उच्चभ्रू लोकांना होतोय, ज्यांचा या पर्यावरणाशी केवळ परजीवी प्रकारचा संबंध आहे. 


सुदैवाने बहुगुणा अशा काळात विख्यात पर्यावरणवादी कार्यकर्ते बनले ज्यावेळी आजच्या प्रमाणे देशद्रोहाच्या आरोपाखाली पर्यावरणवाद्यांना तुरुंगात डांबलं जात नव्हतं. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देणं हे सरकारसाठी नेहमीच अवघडं होऊन बसतं. 1981 साली बहुगुणा यांनी 'पद्मश्री' पुरस्कार नाकारला पण 2009 साली 'पद्मभूषण' पुरस्कार स्वीकारला, जो 'भारतरत्न' नंतर दुसरा मोठा सन्मान आहे. 1980 साली जरी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या भागातील वृक्षतोडीवर 15 वर्षे बंदी घातली असली तरी त्या आदेशाची पायमल्ली वन खात्याकडून होत असल्याचं बहुगुणांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे जंगलतोडीचा हा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी आणि या भागातील लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी बहुगुणांनी हिमालयातील या भागात पदयात्रा सुरु केली. ती जवळपास 5000 किलोमीटरची होती. त्यामुळे तळागाळातील लोकांमध्ये जागरुकता निर्माण झालीच पण जंगलतोडीचा हा प्रश्नाही चव्हाट्यावर आला. त्याच काळात 261 मीटर उंच, 575 मीटर रुंद अशा विशाल धरणाची निर्मिती करण्याचं सरकारनं ठरवलं होतं. सरकारच्या मते, हे धरण भारतातील सर्वात मोठं मल्टीपर्पज डॅम असणार होतं. विकासाच्या नावाखाली या धरणाची निर्मिती करण्याचा घाट सरकारने घातला त्याला सुंदरलाल बहुगुणांनी विरोध करायचं ठरवलं. या धरणामुळे एक लाख लोकांचं विस्थापित तर होणारच होतं पण त्यामुळे हिमालयातील पर्यावरणाला मोठा धक्का बसणार होता. त्याला विरोध म्हणून बहुगुणांनी उपोषण सुरु केलं. 


बहुगुणा, बहुधा अलीकडील दशकांतील इतर बड्या पर्यावरणीय कार्यकर्त्यांपेक्षाही जास्त प्रमाणात गांधीजींचा संदेश आणि त्यांच्या विचारांच्या अत्यंत जवळ राहिले. हे केवळ त्याच्या अत्यंत संयमी जीवनशैलीवरुनच दिसून येत नाही, तर सर्व स्तरातील लोकांशी त्यांच्या सहज संवादातून दिसून येतंय. एका अहिंसावादी कार्यकर्त्याने व्यापक प्रमाणात लोकांशी संवाद साधावा आणि जनमताच्या आदर करावा असं त्यांचं मत होतं. त्याचवेळी, सामाजिक कार्यकर्त्यानं कोणत्याही दखलाची अपेक्षा न करता श्रम करणं चालू ठेवलं पाहिजे ही गांधींची शिकवणूक त्यांनी अंगिकारली होती.


बहुगुणा हे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत कार्य करत राहिले आणि अलीकडच्या काळात हवामान बदलाच्या मुद्द्यावर तरुण कार्यकर्त्यांच्या वतीनं स्पष्ट बोलणारे वकील बनले. असं असलं तरी दीर्घकाळ ते सार्वजनिक जीवनातून गायब झाल्यासारखे दिसत होते. पण त्यामुळे सामाजिक परिवर्तनाबद्दलची त्याची वचनबद्धता कमी झाली नाही. त्यांच्याकडून वारंवार करण्यात येणारं उपोषण हे त्यांचे गांधींच्या विचाराशी जवळीकता दर्शवते. आधुनिक भारतीय राजकारण आणि सामाजिक परिवर्तनातील त्यांचं स्थान समजून घेण्यासाठी बहुगुणांच्या स्वत:च्या उपवासाच्या पद्धतीचा सविस्तर अभ्यास करायला हवा. 
 
बहुगुणा हे प्रामुख्याने एक पहाडी व्यक्ती होते. ते तिथे जन्मले आणि वाढले आणि ज्यावेळी दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये काही चर्चा असायच्या, त्या झाल्यावर ते परत आपल्या या पर्वतीय प्रदेशात परत यायचे. महात्मा गांधींच्या प्रमाणेच त्यांनाही खेडेगावातील जीवनाबद्दल कोणताही भ्रम नव्हता. पर्वतीय प्रदेशातील कल्पित विकासाच्या नावाखाली विध्वंस घडला असता आणि उत्तराखंडमधील शेकडो गावं भूताटकीप्रमाणे ओस पडली असती, तरुणांनी शहरांकडे स्थलांतर केलं असतं. खेडेगावातील समस्यांचे निराकरण केल्याशिवाय भारतात सामाजिक समानता आणि न्याय प्रस्थापित होऊ शकणार नाही असं बहुगुणा यांचं मत होतं. 'भारताचा आत्मा हा त्याच्या खेडेगावांत आहे' असं ते म्हणायचे. गांधींचा काळ संपला आहे, त्यांची विचारसरणी संपली आहे असं अनेकजण म्हणतील. ग्रामीण भारताचा पुरस्कार करणारेही असं म्हणू शकतील कारण कारण इथले प्रश्न आणि फायद्यांबद्दल ते संवेदनशील आहेत. मी देखील असा विचार केला तर त्याला काय अर्थ आहे. याच कारणामुळे बहुगुणांनी मोठ्या धरणांना विरोध केला. त्यामुळे गांधीवादाच्या 'रोमॅन्टिसिझम'वर टीका करणारे हा साधा विचारदेखील करत नाहीत की बहुगुणांसारख्या लोकांनी कधी पृथ्वी, माती आणि हवेकडूनही स्वत:साठी काही घेतलं नाही. 


न्यूझिलंडच्या एका निकालाव्यतिरिक्त, उत्तराखंड उच्च न्यायालयाचा एका निर्णय जो महिला, नागरिक आणि आपल्या पृथ्वीसाठी मुक्तीदायी ठरला आहे. मला अशी शंका आहे की तो निर्णय बहुगुणांच्या विचारावर आधारित आहे. त्यामध्ये न्यायमूर्ती राजीव शर्मा आणि आलोक सिहं यांनी सांगितलं होतं की, गंगा आणि यमुना या दोन नद्या कायदेशीर आणि जीवंत संस्था आहेत, त्यांना मनुष्याचा दर्जा प्राप्त आहे. 


बहुगुणांना हा निर्णय लागू असता तर ते ऑक्सिजन निर्माण करणारे आणि वृक्ष तसेच स्वच्छ हवा निर्माण करणारे चॅम्पियन ठरले असते. ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठीही त्यांचा प्रयत्न सुरु होता. अशा व्यक्तीलाच त्याच्या आयुष्याच्या शेवटी ऑक्सिजन कमी पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला हे कटू सत्य आहे. 


ते काही महिन्यांपासून आजारी होते हे जरी सत्य असले तरी त्यांचे जीवन पर्वतावरील स्वच्छ हवा, श्रम प्रतिष्ठा, दीर्घ काळ सहजीवन, निसर्गाशी एकरुपता, स्पष्ट आणि योग्य विचार तसेच 94 वर्षाचे दीर्घ आयुमान लाभलं. आपल्या समाजाचं हे दुर्दैव आहे, समाजावर लागलेला कलंक आहे की ज्या व्यक्तीने आयुष्यभर ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या वृक्षांशी मैत्री केली, त्या व्यक्तीला आयुष्याच्या शेवटी सीपीएपी मशिनमधून येणाऱ्या ऑक्सिजनच्या श्वासासाठी धडपडावं लागलं. 


(टीप : लेखकाचे मत हे वैयक्तिक आहे)
अनुवाद : अभिजीत जाधव