नमस्कार मंडळी, आज आम्हा दादर-प्रभादेवी-माहिमवासियांच्या दिवसाची सुरुवात मोठी गंमतीदार झाली. भल्या पहाटे उठून छत्रपती शिवाजी महाराज पार्कला चालत किंवा धावत राऊंड मारायचे हा आमच्या फिटनेसचा शिरस्ता. 


तसे आम्ही रोजच्या मोहिमेवर निघालो खरे, पण शिवाजी पार्कभर कुणा मर्फीसाहेबांच्या वाढदिवसाचे होर्डिंग्स पाहून दिवसाउजेडी आमच्यावर चकित होण्याची वेळ आली. कारण मर्फीसाहेब म्हणजे कुणी राजकीय साहेब किंवा त्यांचा बगलबच्चा नव्हता, अगदी गेला बाजार एखादा गल्लीबोळातला दादाभाईही नव्हता. 


मर्फीसाहेब म्हणजे कोणत्याही ब्रीडचा असला तरी एक सर्वसामान्य कुत्रा प्रजातीचाच प्राणी होता. अर्थात तो एका समर्थाघरचा श्वान असल्यानं त्याच्या वाट्याला मर्फीसाहेबांचा वाढदिवस असं होर्डिंग वगैरे लावून थाटामाटात साजरा होणारा वाढदिवस आला होता.


मंडळी, गंमत बघा आजचा जमाना हा खरं तर राजकीय भुंकाभुंकीचा आहे. रोजच्या दिवसाची सुरुवात ही कुणा एकाच्या, कुणावर तरी भुंकण्यानं होते. आणि मग दिवस मावळतीकडे जात असताना त्या बाजूनं किंवा त्याविरोधात भुंकण्याचे अनेक कर्कश स्वर आपल्या कानावर येऊन आदळतात. राजकीय भुंकाभुंकीच्या या जमान्यात आजचा दिवस दादर-प्रभादेवी-माहिमवासियांसाठी अनोखाच म्हणायला हवा ना! कारण ज्याचा जन्मच मुळात भुंकण्यासाठी झालाय, त्याचा चक्क होर्डिंग-बिर्डिंग लावून वाढदिवस साजरा होताना पाहायला मिळालं.


कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे असं आपण म्हणतो. आणि त्यात हौसेला तर मोल नसतं. त्यामुळं कुणा हौशी मंडळींनी आपल्या सर्वात इमानदार मित्राचा वाढदिवस साजरा केला, तर आपल्यापैकी कुणालाही खटकण्याचं काहीच कारण नाही. पण मला इथं दाखवून द्यायची आहे ती फक्त बदलत्या जमान्यातली फक्त विसंगती.


मंडळी, एक जमाना होता त्यावेळी वाढदिवसाची होर्डिंग्स ही फक्त राजकीय साहेबांची, त्यांच्या टिळेधारी बगलबच्चांची किंवा सोन्यानं मढलेल्या गल्लीबोळातल्या दादाभाईंची लागायची. राजकीय भुंकाभुंकीच्या जमान्यात त्याच वाढदिवसाच्या होर्डिंगवर आज चक्क एक कुत्रा विराजमान झाला, हा निव्वळ एक योगायोग मानायचा का? इतकंच नाही तर त्या मर्फीसाहेबांना आभाळभर शुभेच्छा देण्यासाठी त्याच बॅनरवर मर्फीसाहेबांच्या टोळीतल्या तेरा भाईबंदाचे फोटोही छापण्यात आलेयत, आता बोला!


मंडळी, एवढं सगळं थाटामाटातलं बर्थ डे सेलिब्रेशन पाहिल्यावर, हर कुत्ते का एक दिन होता है... हा हिंदीतला वाक्प्रचार तुम्हाआम्हाला मनोमन पटायलाच हवा. पण एका कुत्र्याच्याही वाढदिवसाचं लागणारं हे होर्डिंग पाहिल्यावर आपल्या राजकीय नेत्यांची, त्यांच्या बगलबच्चांची आणि गल्लीबोळातल्या दादाभाईंची काय प्रतिक्रिया आहे, ती मात्र कळू शकलेली नाही.