सायकल आणि बालपण यांच नात खूप घट्ट, सुंदर आणि हवहवसं वाटणार... माझं आणि या सायकलचं नातं सगळ्यांपेक्षा अगदी वेगळं आहे.  लहानपणी सायकलवरुन शाळेत जाणं असो, कधी वडिलांसोबत पुढे बसून त्या प्रवासाचा आनंद घेणं असो किंवा सायकलवरुन गावोगावात उनाडणं असो, यापैकी मी लहानपणी काहीही केलेलं नाही.. अजिबात नाही..  सायकल घ्यायची ही लहानपणापासूनची इच्छा असली तरी ती घेतल्यानंतर तिनं आनंद सोडाच नुसता त्रास दिला होता. सोसायटीतल्या मैत्रिणींकडे सायकल होती, पण कोणाची वस्तू वापरायची नाही हा स्वभाव.. म्हणून सायकल शिकायची आणि चालवायची तर स्वतःचीच हे ठरवलेलं.. त्याप्रमाणे घरी हट्ट झाला. तो हट्ट काही दिवसांनी पुरवला गेला आणि आमच्या घरी आली लेडी बर्डची लाल रंगाची सायकल.


नवी कोरी सायकल शिकवायची जबाबदारी बाबांवर आली. 2-3 दिवसांतून एकदा या सायकलची शिकवणी असायची. असे दिवसांमागून दिवस गेले पण शिकवणी काही संपेच ना. मग माझे प्रशिक्षक बदलून पाहिले. कधी दादा कधी घरी आलेले कोणी पाहुणे, कधी चुलत भावंड आली तरी ही प्रशिक्षकाची ड्युटी त्यांना लागायची. सायकल शिकवायला कोणी बाजूने धरलीच तर माझं आणि सायकल दोघींच वजन शिकवणाऱ्यावर. त्यामुळे एकदा शिकवायला आलेला व्यक्ती पुन्हा ‘चल तुला सायकल शिकवतो’ म्हणण्याच्या भानगडीतच पडायचा नाही.


असे अनेक दिवस, त्यापाठोपाठ महिने गेले. सायकल ती शिकण्याचा उत्साह सगळंच बारगळलं. सोसायटीच्या कोणत्यातरी अडगळीच्या कोपऱ्याची जागा तिची झाली. नवी कोरी त्यावरचं पुठ्ठा ही न काढलेली सायकल हळूहळू गंज धरू लागली. ‘काय मुलगी आहे, अजून सायकल शिकतेय’, ‘सायकल शिकली नाही, आता बाईक तरी कसली चालवायला शिकतेय?’ अशा आशयाचे अगणित टोमणे मी लहानपणापसून एकलेत. थोडे दिवस गेले नंतर ती सायकल त्या अडगळीतून ही दिसेनाशी झाली. मग तिचा शोध सुरु झाला. कुठे गेली, कोणी ठेवली, कुठे ठेवली अशा कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मिळेना. कारण माझी सायकल कोणीतरी उचलून(चोरुन) नेली होती. तिचा पत्ता लावण्याएवढं माझं तिच्यावर प्रेम ही नव्हत. ती गायब झाल्यानंतर तर मग ‘प्लॅस्टिकही न काढलेली सायकल उचलून नेली हिची, तरी हिला काही नाही’ अशा अजून एका टोमण्यात भर पडली.  कधी समवयाच्या मुलांमध्ये गेलं तर सायकलचा विषय अगदीच नको वाटायचा.


मी कॉलेजला गेल्यानंतर हळूहळू बाईक चालवायला शिकले. सायकल येत नाही म्हटल्यावर बाईक तरी येईल की नाही धाकधूक होती. पण जमली बाबा... काही वर्षांनंतर म्हणजे अगदी 3-4 वर्षांपूर्वी मी मैत्रिणींसोबत फिरायला गेले होते. तिथं बऱ्याच अॅक्टिव्हिटी होत्या. पण काय माहित नाही का सायकल चालवायची इच्छा झाली. येईल की नाही पूर्वीची भीती होतीच. पण बसले सायकलवर आणि मारलं पॅडल. आणि चक्क काय तर सायकलचा बॅलेन्स मला करता आला. सायकल न शिकल्याने आपण कोणत्या आनंदाला लहानपणापासून मुकलो याची प्रचिती आली. आता बाईक चालवण्यापेक्षा मला सायकल चालवता येते याचा आनंद जास्त आहे. माझी सायकल हरवल्याचं खरं दु:ख मला याच दिवशी झालं. लवकरच तशीच लाल सायकल घेण्याची इच्छा आहे... ती इच्छा मी पूर्ण करेनच....... Touch wood…