कधी मधी खूप एकटं वाटतं ना? असं वाटतं, भवताली किती भयंकर काय काय चालू आहे. आपल्यापर्यंत हे येऊ नये. आपल्याच काय.. आपलं कुटुंब.. आपले मित्र.. आपले पै-पाहुणे.. असं कुणीही सापडू नये यात. वाटतं ना? एकिकडे औषधं नाहीयेत. पर्यायी औषधांचे दर परवडत नाहीयेत. बेड नाहीयेत, ऑक्सिजन मिळेल की नाही याची शाश्वती नाही. तो मिळालाच तर तो शेवटपर्यंत योग्य प्रमाणात मिळेल की नाही असं वाटत राहतं. वाटतं ना असं?


एकीकडे नोकरी-धंदा बंद आहे. हे सगळं कधी नॉर्मल होईल याचा नेम नाही. जरा कुठं नव्यानं सुरू झालं होतं पुन्हा एकदा. पण काही महिन्यांतच पुन्हा थांबलं हे चक्र. कधी कधी वाटतं.. झाला तर होऊ दे कोरोना.. पण हाती पैसे नसणं आणि कुणाकडे उधार मागणं नको. वाटतं ना? खोल खोल अंधारात आपण कसाबसा सावरून असलेला तोल जातो आहे की काय असं वाटत राहतं. हळूहळू अंधाऱ्या गर्तेत आपण पडतो आहोत की काय असं वाटून जातं. वाटतं, की आता इथून पुढे सगळा अंधार आहे.. आता काही सावरेल की नाही हे लक्षात येत नाहीय. आता हातातून सगळं निसटून चालल्यागत वाटत राहतं. एकेक दिवस ढकलता ढकलता श्वास मध्येच संपेल की काय असं वाटून जातं. वाटतं ना? तरीही आपण जगत असतो. आलेला दिवस ढकलत असतो. 


शिडलर्स लिस्ट पाहिलाय का तुम्ही? त्यात अनेक ज्यू हिटलरने बनवलेल्या तुरूंगात सजा भोगत असतात. हिटलरचा एक सैनिक येतो. सहज म्हणून बंदूकीने नेम धरून एका ज्यूला टिपतो. तरीही बाकीचे कैदी.. आपण आत्ता वाचलो.. असं मानून काम चालू ठेवतात.  या कोरोनानं आपल्याला असं कैदी बनवलं आहे. आपलं जगणं जगता जगता भवतालची एकेक माणसं हे जग सोडून निघून जातायत. आता तर वाटतं, डोळ्यातली आसवं संपलीत आपल्या. आता डोळ्यातं पाणी येत नाही. विनामास्क वाटतं. हतबल वाटतं. वाटतं, आपण आपला पराजय मान्य केला आहे. एरवी, दुसऱ्याच्या दु:खात आपली कामं सोडून सहभागी होणारे आपण आता.. आपल्यापुरतेच उरलो आहोत की काय असं वाटून जातं.  वाटतं ना? खरं सांगू का.. असं वाटणं हेच माणूसपणाचं लक्षण आहे. पण माणूसपणाचं हे एकच लक्षण नाहीय. या सगळ्या मानसिकतेवर आपल्याला मात करायची आहे. मला वाटतं.. ही मात माझी मला करता येणारी नाही. 


रोज कुणीतरी कुठेतरी आतून कोसळून पडतं आहे. अनपेक्षित धक्क्याने कोलमडून जातं आहे. या सगळ्यांना आपण झेलायला हवं. झेलणारी माणसं व्हायला हवं. कुणीतरी कुठेतरी पडत असताना कुणीतरी येऊन त्याला झेलायला हवं. परिस्थिती बदलणारी आहे. परिस्थितीने माणूस मोडून पडतो आहे, पण त्याचा कणा नाही. हा कणा शाबूत ठेवायला हवा आपण. आपआपल्या परिने माणसांना झेलायला हवं आपण. पडणारा माणूस एकदा पकडलेला हात कधीच सोडणार नाहीय आणि झेलणाऱ्या माणसाला माणसांची उणीव कधीच जाणवणार नाहीय..पण ही आजचीच वेळ. माणसाला माणूस जोडण्याची. ही आजचीच वेळ स्वत: जाऊन दुसऱ्याला भिडण्याची. वेदना त्यालाही आहे. हळहळ मलाही आहे.  इथे प्रत्येकाच्या हातून गेल्या 14 महिन्यांत काहीतरी सुटलं आहे. प्रत्येकाने काहीतरी खूप जवळचं गमावलं आहे.  सगळा पेशन्सचा गेम आहे देवा. दीज आर व्हेरी पेनफुल पेशन्स. पण यातून पार पडायचं तर झेलणारी माणसं व्हायला हवं. थोडं एकमेकाचं जगणं सोपं करणारं काही करायला हवं. एक छोटं पाऊल खूप मोठा बदल घडवणारं असेल असं वाटतं... कण्हणारी माणसं पुरे झाली. कोलमडणाऱ्यांना झेलणारे होऊया. 
अजून थोडे दिवस.