यूएईत सुरु असलेल्या आयसीसी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियानं लागोपाठ दोन सामने गमावले. टीम इंडियाच्या याच अपयशामुळे उपांत्य फेरीची दारही जवळपास बंद झाली. पण आता या फ्लॉप शोसाठी बीसीसीआयची धोरणं आणि निवड समितीच्या निर्णयांवर बोट ठेवलं जातंय. या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआय आपल्या धोरणांमध्ये सुधारणा करणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे.


आधी पाकिस्तान आणि मग न्यूझीलंडकडून... ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियाच्या पदरी लागोपाठ दोन सामन्यांमध्ये दोन लाजिरवाणे पराभव आले. ही दुहेरी हार प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या जिव्हारी लागली. त्यामुळं तुम्ही आम्ही टीम इंडियावर सणकून टीका केली. पण बीसीसीआय आणि बीसीसीआयच्या निवड समितीचं काय?


खरं तर टीम इंडियाच्या खराब खेळाइतकंच बीसीसीआय आणि निवड समितीचं चुकीचं धोरण या पराभवांना जबाबदार आहे. आयपीएलवीरांच्या कामगिरीवर आणि फ्रँचाईझी ओनर्सना खूश करण्यासाठी झालेली सदोष संघनिवडही टीम इंडियाच्या फ्लॉप शोचं कारण आहे. दुखापतग्रस्त आणि फॉर्ममध्ये नसलेला हार्दिक पंड्या, अवघे तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला वरुण चक्रवर्ती, कसलेला सलामीवीर शिखर धवनऐवजी ईशान किशन आणि अनुभवी लेग स्पिनर युजवेंद्र चहलऐवजी राहुल चहरला मिळालेली संधी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली होती.


भारताच्या विश्वचषक संघात मुंबई इंडियन्स या एकाच फ्रँचाईझीचे सहा शिलेदार आहेत. त्यापैकी जसप्रीत बुमराची निवड - योग्य, रोहित शर्माची निवड - योग्य; पण हार्दिक पंड्या, राहुल चहर, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव  ही मंडळी भारतीय संघात फिट बसत होती का?


हार्दिक पंड्याचा फॉर्म गेल्या दोन्ही आयपीएल मोसमात हरवला होता. गेल्या मोसमात तर त्याच्या खात्यात फक्त 127 धावा होत्या. त्यात पाठीच्या दुखापतीमुळं त्यानं गोलंदाजी करणंही सोडून दिलं होतं. तरीही एक अष्टपैलू म्हणून हार्दिकला खेळवण्याचा अट्टाहास बीसीसीआयनं का केला?


हार्दिकनंतर प्रश्न पडतो तो ईशान किशनच्या निवडीबाबत. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या 68 आंतरराष्ट्रीय आणि 192 आयपीएल सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या धवनला डावलून अवघ्या तीन आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या ईशानला संधी देणं कितपत योग्य होतं?


भारतीय संघातलं आणखी एक धक्कादायक नाव म्हणजे सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारनं मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. पण विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर संधी देताना निवड समितीनं आंतरराष्ट्रीय अनुभवाचा विचार का केला नाही? त्यांच्याऐवजी श्रेयस अय्यरला निवडणं उजवं ठरलं असतं.


भारताच्या विश्वचषक संघातलं आणखी एक नाव खटकतं. आणि ते नाव आहे लेग स्पिनर राहुल चहरचं. कुलदीप यादवच्या फिरकीची धार बोथट झाली असली तरी, युजवेंद्र चहलचं काय? युजवेंद्र चहलनं आयपीएल गाजवूनही निवड समितीनं त्याच्याऐवजी मुंबई इंडियन्सच्या राहुल चहरची वर्णी लावली. 


कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्तीही निव्वळ गोलंदाज म्हणून भारतीय संघात कसा काय येऊ शकतो हा प्रश्नच आहे. वरुण चक्रवर्तीनं आयपीएलच्या दोन मोसमात समाधानकारक कामगिरी केली. पण यादरम्यान त्याच्या पाठीशी दुखापतींचा ससेमिरा कायम होता. चार षटकं टाकून तो अनेकवेळा मैदानाबाहेर गेला. आयपीएलपुरतं हे सगळं ठीक होतं, पण निवड समितीनं वरुण चक्रवर्तीला थेट विश्वचषकाचं तिकीट दिलं. त्यामुळं अनुभवी रवीचंद्रन अश्विनला ड्रेसिंग रुममध्येच बसून राहावं लागलंय. या सदोष संघनिवडीचा फटका अखेर टीम इंडियाला बसलाय. आणि त्यामुळंच ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातून टीम इंडियाचं रिटर्न फ्लाईट आता कन्फर्म झालंय.


युएईतल्या या निराशाजनक कामगिरीतून बीसीसीआय धडा घेणार आहे का? पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. युएईतल्या विश्वचषकाच्या निमित्तानं जे झालं, त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न बीसीसीआयची निवड समिती करणार का? की पुन्हा आयपीएलचं मार्केटिंग करण्याच्या हेतूनं आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचा संघ निवडला जाणार? बीसीसीआय आणि निवड समितीनं एक ठोस धोरण ठरवायलाच हवं.