आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर कोरोनासारख्या आजारातून मुक्तता मिळवत बरेच रुग्ण उपचार घेऊन घरी जात आहेत. आजपर्यंत राज्यात एक हजार 282 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या परिस्थितीत एखादी तुरळक घटना वगळता महाराष्ट्रात तरी कोरोनाचे उपचार घेऊन रुग्ण घरी पोहोचल्यावर मित्र-मंडळी, शेजारी राहणारे लोक या कोरोनामुक्त नागरिकांचं जोरदार स्वागत करतानाचं चित्र सध्या सर्वच ठिकाणी दिसत आहे. या मानवी संस्कृतीचं कौतुक कितीही केलं तरी कमीच आहे, कारण घरी पोहोचणारे हे नागरिक कोरोनाने मुक्त झालेले असतात, मात्र मानसिक त्रासातून मुक्त होण्याकरिता काही काळ जावा लागतो. मात्र अशा घरी पोहोचल्यावर मिळणाऱ्या आदरातिथ्यामुळे ह्या नागरिकांना बळ मिळतं आणि लवकरच ते आपलं 'जगणं' सुरू करतात.
कोरोनाचा महाराष्ट्रात प्रवेश होऊन सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटला असून राज्याचा आरोग्य विभाग नित्यनियमाने रोज 'मेडिकल बुलेटिन' संध्याकाळी प्रसिद्ध करत आहे. या बुलेटिन मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील रुग्णांची संख्या, दिवसभरातील नवीन रुग्ण आणि मृतांचा आकडा जाहीर केला जातो, विशेष म्हणजे त्यामध्ये किती रुग्ण उपचार घेऊन घरी परतले याचा आकडाही दिला जातो. त्यामुळे नागरिकांना नेमके किती रुग्ण बरे होतात याची माहितीही रोज मिळत असते. 27 एप्रिलच्या मेडिकल बुलेटिननुसार राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8590 असून 1282 रुग्ण बरे झाले आहेत आणि 369 जण या आजारामुळे मृत पावले आहेत.,तर दाखल रुग्णांपैकी बहुतांश उपचार पूर्ण करून रुग्ण घरी जाण्याच्या वाटेवर आहेत. काही जण टेस्टिंगच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहे. बहुतांश रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी, डॉ. प्रदीप आवटे, सांगतात की, "रुग्ण बरे होऊन घरी जाण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही आनंददायी गोष्ट आहे. सध्या जे रूग्ण रुगालयात दाखल आहेत त्यांंपैकी बहुतांश रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. भारतीय वैदक संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांचा काही ठरावीक दिवसांचा रुग्णालयातील कोर्स पूर्ण झाल्यावर रुग्णांना घरी पाठवलं जातं. फारच कमी रुग्णांची लक्षणं गंभीर असून त्यांच्यावर डॉक्टर्स योग्य ते उपचार करत आहेत."
या सगळ्या प्रक्रियेत समाधानाची बाब अशी आहे की, वृत्तवाहिन्यांवर किंवा सामाजिक माध्यमांवर आपण पाहिलं तर लक्षात येतं की, कोरोनामुक्त नागरिक रुग्णालयातून जेव्हा आपल्या घरी जात आहे तेव्हा काही ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत तर काही ठिकाणी टाळ्या आणि थाळ्यां वाजवून स्वागत केलं जात आहे. या सगळ्या वातावरणातून कोरोना मुक्त नागरिक भारावून जात असून काही जणांच्या डोळ्यात आपसूकच अश्रू दाटून येत आहे. अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण देशात राहिलं तर कोरोनाबाधित रुग्ण या आजाराचा मुकाबला करून सहजपणे घरी जातील. ही प्रथा फक्त घरापुरतीच मर्यादित नसून अनेक रुग्ण जेव्हा रुग्णालयातून बरे होऊन जात असतात तेव्हा तेथील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी सुद्धा त्यांचं अभिनंदन करून घरी पाठवत आहे.
मात्र तरीही काही ठिकाणी अशा कोरोनामुक्त रुग्णांना टीकेचं धनी बनावं लागत असल्याच्या तुरळक घटना घडल्या आहेत, त्या सर्व नागरिकांनी मिळून टाळल्या पाहिजेत. बऱ्यापैकी अज्ञानातून किंवा गैरसमजातून अशा घटना घडत आहेत. कोरोनामुक्त लोकांवर टीका करणाऱ्या लोकांना मुळात कोरोनाविषयी अर्धवट माहिती असते.
आपण नागरिकांनी काही गोष्टी इथे समजून घेतल्या पाहिजे, कोरोनामुक्त रुग्ण जेव्हा रुग्णलयातून घरी येतो, तेव्हा त्याच्या सर्व चाचण्या करूनच त्याला डिस्चार्ज दिला जातो. रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्यावर त्यांना रुग्णालयातून किंवा अलगीकरण विभागातून डिस्चार्ज देतात. त्यामुळे त्या रुग्णांपासून संसर्ग होत नाही. मात्र अशा रुग्णांनी काही दिवस वैद्यकीय सल्ल्यानुसार स्वतःची काळजी घेणं गरजेचे असते.
याप्रकरणी 15 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जारी केलेल्या पत्रकात कोरोनाच्या या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा तशी शक्यता आहे असं जरी आढळलं तरी त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचं प्रकार समोर येत आहे असे म्हटलं होते . या अशा प्रकारामुळे नुकसान होऊ शकण्याची भीती व्यक्त करून यामुळे लोकांचा कल या आजराची लक्षणं लपवण्याकडे राहील आणि लॉकडाऊन सक्त केलेल्या सर्व उपाययोजना निष्प्रभ ठरतील. तसेच त्यांनी पत्रकात या आजारावर मात केलेल्या रुग्णांच्या आकडेवारीचा दर आठवड्याला एक न्युज बुलेटिन काढून राज्य आणि केंद्र सरकारने जारी करावा अशी इच्छा व्यक्त केली होती.
यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबियांना तुच्छतेची वागणूक देण्याची कोणतीही घटना घडणार नाही अशा पद्धतीचं सर्वच नागरिकांचं वर्तन अपेक्षित आहे, कारण कोरोना आज ना उद्या जाणारच आहे, मात्र माणसांमध्ये आपापसात यावरून द्वेषाची दरी वाढता कामा नये. त्यामुळे आतापर्यंत ज्या पद्धतीने कोरोनामुक्त रुग्णाचं आदरातिथ्य सगळ्यांनी मिळून केलं आहे ही संस्कृती कायम टिकली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कोरोनामुक्त नागरिक जेव्हा रुग्णालयाच्या बाहेर पडून घरी जाण्यास निघेल, तेव्हा त्याला अभिमानाने म्हणता आलं पाहिजे, अरे स्वागत नही करोगे क्या हमारा!