बीडमधील कालच्या सभेनंतर राष्ट्रवादीतील दरी वाढतेय का आणि त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपाामुळे शिंदेगटाला दिलासा मिळतोय का? असे काही प्रश्न निर्माण होतात. तसा या दोन्ही गोष्टींचा थेट संबंध नसताना हे प्रश्न पडायची अनेक कारणं आहेत. महत्वाचं कारण आहे कालच्या अजितदादांच्या भव्य सभेतील बदललेलं वातावरण. या सभेत अजितदादा गटाकडून पहिल्यांदा थेट शरद पवार यांना काही खुपणारे प्रश्न विचारण्यात आले. 


प्रश्न विचारण्यात आघाडीवर होते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ. 1991 साली शरद पवारांनी शिवसेना फोडून भुजबळांना काँग्रेसमध्ये आणलं तेव्हापासून सर्व सुखदु:खात भुजबळ पवारांच्या आणि राष्ट्रवादीच्या सोबत होते. मात्र या काळात पवारसाहेब सुखदु:खात भुजबळांसोबत होते का? की त्यांचा फक्त अत्यंत स्ट्रॅटेजिक वापर करुन घेतला गेलाय? असे प्रश्न भुजबळ समर्थकांना कायम सतावत होतेच. काल भुजबळांनी भावनांना मोकळी वाट करुन दिली आणि शरद पवार गट त्यांच्या विरोधात आक्रमक झाला. 


राष्ट्रवादीतील वादाचा फायदा शिंदेगटातील आमदारांना होतोय. वर्षभरानंतर पहिल्यांदाच गद्दार-खोके हा शब्द कानावर न पडता त्यांचा दिवस संपतोय.. वर्षभर अशाच काही शब्दांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांना हैराण करुन सोडलं होतं. सकाळ संध्याकाळ ठाकरे गट आणि शिंदे गटाचं एकमेकांची उणी दुणी काढणं सुरु होतं. मात्र दोन जुलैनंतर राज्यातलं वातावरण बदललं, अजितदादा सरकारमध्ये आले आणि अचानक गद्दार, खोके हे शब्द कानावर पडण्याचं प्रमाण कमी झालं. सध्या सगळा फोकस राष्ट्रवादीकडे शिफ्ट झाल्याचं चित्र आहे.


शिवसेना पक्ष फुटल्यानंतर जी कटुता, राग, चीड, दिसली ते सगळं राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर गायब आहे. एक दोन नेते सोडले तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आत्तापर्यंत संयम बाळगला होता. पक्षात खरंच फूट आहे की नाही अशी शंका यावी एवढा सौहार्द दिसत होता. मात्र त्यात हळूहळू बदल होतोय. कालच्या बीडच्या सभेत छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांनाच लक्ष्य केलं. पुण्यात भुजबळांविरोधात मोठं आंदोलन केलं गेलं. अजितदादा गटाच्या टिकेला शरद पवार, सुप्रिया सुळे कोड्यात उत्तर देत आहेत तर रोहित पवार, जितेंद्र आव्हाड थेट उत्तरं देत आहेत. रोहित पवार यांनी तर एजंट वगैरे शेलके शब्द वापरायला सुरुवातही केलीय. बीडमध्ये भुजबळांच्या भाषणावेळी लोकं निघून जात होती असा दावाही त्यांनी केला. 


राष्ट्रवादीत सुरु असलेल्या या सगळ्या गदारोळामुळे शिंदे गट वेगळ्याच कारणासाठी आनंदी आहे. वर्षभर जिथे जातील तिथे गद्दार खोके अशी टीका टोमणे शिंदे आणि 40 आमदार सहन करतायत. त्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्गही दिसत नव्हता, उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळतेय की काय असं वातावरण तयार केलं जात होतं.अशा वेळी राष्ट्रवादीतील फूट मदतीला धावून आलीय. शिवसेनेच्या 40 आमदारांना टीकाटोमण्यांच्या फैरींपासून थोडीशी उसंत मिळालीय. राष्ट्रवादीतील या फुटीतून उबाठा शिवसेनेनं बरंच काही शिकायला हवं असं आमदार संजय शिरसाट म्हणतात ते त्याचमुळे. एक गट वेगळा झाला म्हणजे त्याच्यावर खालच्या पातळीवर टीका करणे योग्य नसल्याचं सांगत, पवार लढतायत तर उद्धव ठाकरे भांडतायत अशी टिपण्णी करायला ते विसरले नाहीत.


सध्या राज्यातील सगळी राजकीय स्पेस राष्ट्रवादीने व्यापून टाकली आहे. त्यामुळे शिवसेनेतील फूट हा विषय सध्या तरी मागे पडलाय. या काळात आपल्यावरील रोष कमी व्हायला मदत होईल अशी आशा शिंदे गट करत असेल.
अगदी सुरुवातीच्या काळापासून गद्दार या शब्दाला शिवसेनेत अगदी वेगळं महत्व आहे. शिवसैनिकांसाठी, सेनेच्या मतदारांसाठी या शब्दाचा पूर्णपणे वेगळा अर्थ आहे. बंडखोरांना सेनेचा सामान्य मतदार सहसा माफ करत नाही असा इतिहास आहे. त्यामुळे गद्दार आणि खोके या शब्दांचे बाण कसे रोखायचे हा प्रश्न शिंदेसोबत गेलेल्या शिवसेना आमदारांसमोर होता.  त्यातच जळगाव असो की हिंगोली उद्धव ठाकरेंच्या सभेला होणारी प्रचंड गर्दी पाहून त्यांच्या चिंतेत भरच पडली असणार. 


त्यामुळेच पवारांनी सभा घ्याव्यात, अजितदादांनी उत्तरसभा घ्याव्यात, भव्य रोड शो करावेत, एकमेकां विरोधात आंदोलनं करावीत असं शिंदेगटातील अनेकांना वाटत असेल. शरद पवार जिथे सभा घेतील तिथे सभा घेऊन उत्तर देणार हे अजितदादांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार त्यांनी बारामतीत शक्तीप्रदर्शन केलं, बीडला भव्य सभा घेतली, त्याला उत्तरदायित्व सभा असं नावंही दिलं. आता ते शरद पवारांपाठोपाठ 10 सप्टेंबरला कोल्हापूरातही सभा घेणार आहेत. पवार विरुद्ध पवार, पवार विरुद्ध भुजबळ, पवार विरुद्ध मुंढे हा वाद काही काळ असाच सुरु राहावा आणि आपल्याकडे लोकांचं लक्ष जाऊ नये असं शिवसेनेच्या 40 आमदारांना वाटत असेल तर नवल वाटायला नको. राष्ट्रवादीतील फुटनाट्यामुळे आपला विषय थोडा विसराळी पडेल अशी आशा ते करत असतील. तसं होईल का हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे.