दावणीला 11 जरश्या गायी अन 4 म्हशी उभ्यायत्या. एकूण 18 एकर शेताय, त्यातलं नाही म्हणलं तरी 10 एकर खच्चून बागायतीय अन उरलेलं जीरायतीय.
टोटल 11 बोरयत शेतात. अन 2 विहिरी. म्हणजे 2017 पर्यंत टप्प्याटप्प्यानं घेतलेलं 7 बोअर होतं. तवा सुरुवातीला पाणी 200 फुटावर लागलं, मग हळूहळू प्रत्येक वर्षी ही खोली वाढत गेली. 300, 400, 600 अन शेवटचा 11 वा बोर तर 800 फुटावर गेलाय. 800 फुटाच्या आधी बोरिंग मशिन आता नुसता फुफाटा बाहीर फेकती.. जवळजवळ 6 ते 7 लाख रुपयांचं नुसतं बोअर घेतलं होतं. लोकांना कश्याकश्याचं व्यसन लागतं, मला बोअर घ्यायचं लागलेलं, पाणीच नाहीतर दुसरा पर्याय काय? शेत कसं जगवायचं? अन शेतावर अवलंबून असलेली घरातली माणसं कसं जगवायची?? मग कायनाय सापडलं की घ्यायचं बोर.
2017 साली पयलं 7 बोर हळूहळू कोरडं व्हायला लागलं. मग पाणी कमी पडायलं म्हणून एके दिवशी एक बोर घेतला, त्याला पाणी नाही लागलं. म्हणून त्याच दिवशी लगेचच दुसरीकडं सलग दुसरा बोअर घेतला. तर त्यालाबी पाणी नाही, मग तिसरा घेतला, शेवटी 4 था घेतला तर तोबी कोरडाच निघाला. बोर होस्तोर मशीन गावातनं हालुच दिली नाय. म्हणजे एका दिवसात मी 4 बोअर सलग घेतलं होतं अन ती चारिबी कोरडं निघालं होतं.
कारण,
"हिरीतच पाणी नव्हतं, तर पोहरयात कुठून येणार होतं."
आधी कसंबी पाणी वापरायचो कारण "जमिनीतलं पाणी कधी संपत असतंय काय?" असं वाटायचं. बोर घ्यायचा असा येडेपणा कधीच कुणी केला नसंल. पण माझा पाण्यासाठी जीव येडा झालता. सर्वात वाईट हे की बोर घायला पैशे नव्हते तर तर मी शेवटी 10 टक्के व्याजानं 4 लाखाचं कर्ज काढलं. जमिनीतनं पाणी काढायचंच म्हणून इरेला पेटलेलो. "दूध संपल्या म्हशीच्या कासेतनं कसं वडून-वडून शेवटचा थेंब पिळून घेतात" तसं करायला लागलो होतो मी जमिनीतनं पाणी काढायला. 10 टक्के महिना व्याज म्हणजे 4 लाख कर्जाला महिन्याला 40 हजार नुसतं व्याजच भरत होतो मी. हे बँकेचं कर्ज नव्हतं.
.. आधी जनवाराला चारा हुईना म्हणून वाशीम जिल्ह्यातल्या पावण्याकडं जनवारं सांभाळायला दिलती. देताना जीव तुटत होता पर पर्याय नव्हता. नाहीतर वैरणीविना दावणीला सगळी मेली असती ती. अन आता हे 40 हजार महिना नुसतं व्याज, पाणी थेंबभर नाही, 4 लाख मुद्दल अन शेतातनं एक रुपया उत्पन्न नाही, मग काय करणार हुतो-- शेवटी ती वाशीमला पाठवलेली जनवारं शरीरातलं एक-एक करून अवयवच विकावं तसं विकली अन कसं बसं अर्ध्याधीक कर्ज फेडलं. शरीरातली आता सगळी उर्जाच संपली. "आंबा पिकतो अन सगळं जुळून आलं की आपोआप खाली पडतो" तसं आत्महत्या करायला माझं सगळं जुळून आलतं. "आत्महत्या न करायलं खरंतर काहीच कारण उरलं नव्हतं"........ पर लेकराबाळाकडं बघून पुढचा श्वास कसाबसा घेत होतो. एक आशा हाती थोडी म्हणून ह्यावर्षी 3 एकर डाळींब अन 2 एकर शेवगा लावला. म्हणलं कायनाय तर कमीत कमी ह्यावर्षी घरातल्या खण्यापिण्याचं सामान विकत घ्यावं एवढा तरी पैसा निघल. पण त्यालाबी पाणी नाही. मग पाण्याविना डाळींब डोळ्यादेखत करपून गेलं. शेवगाबी आता जळायला लागला होता. परत पर्याय उरला नाही.
"....घरची नकु म्हणत असताना अजून एकदा पाणाड्याला आणलं, पॉईंट शोधून बोअर घ्यायचा होता."
पर मधीच ही कुणीतरी कायतरी वॉटर कप नावाचं झिंगाट आणलं. त्याला कायतरी ट्रेनिंगला 5 जण जायचं होतं पण गावातलं एक माणूस सोडलं तर कुणीच तयार नव्हतं. मग एका नातेवायकानं सांगीतलं अन , एक जण चालला होता त्याला सोबत, म्हणजे खरंतर ती माघारी यिऊ नि म्हणून गेलो त्याच्या सोबत ट्रेंनिंगला. 25 मार्चला आमी गेलो. खरंतर मी अतिशय कोरड्या मातीतनं, उन्हातनं अन नुसता रखरखीतपणा घेऊन तिथं गेलतो, पण तिथं जे घडलं ते कायतरी वेगळंच होतं. जिथं आजकाल गावात माणसं हातात-हात मिळवायला तयार नसतात तिथं ह्या ट्रेनिंगच्या गावात पोचल्या-पोचल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या पाण्यानं आमचं पाय धुतलं गेलं अन ते बघून माझं अवसणाच गळालं. काय किंमत होती खरंतर आमची? कुणी विचारात नाही आमासारख्याला. पण त्यांनी पाय धुवून आमच्या ह्रदयात माणुसकीचा पाया रचला होता. पुढचं चार दिवस तिथून पाण्याबद्दल जे काय खेळी-मेळीत शिकत होतो, पाण्याच्या निर्मितीपासून ते वाफ होण्यापर्यंत ते निव्वळ येड लावण्यासारखं होतं. चार दिवस मी नवनिर्मितीच्या धुंदीत अन नशेतच राह्यलो. 11 बोअर 2 विहिरी घेतलेला मी, तिथलं पाण्याचं शिक्षण बघून तोंडात हाणून घ्यायचा बाकी राह्यलो फक्त. "इतक्या चुका आपण केल्याच कशा" असं वाटायला लागलं. पश्चाताप होत होता नुसता. तशात तिसऱ्या दिवशी म्हणजे 27 मार्चला फोनवर 140 च्या वर मिस कॉल होतं. गावाकडं चुलती वारली होती. मी नाईलाजानं,, जायचो म्हणलं गावाकडं परत ,पर ज्याच्या सोबत आलतो तो म्हणला "तू गेलातर मिबी हिथ थांबणार नाही". मग थांबलो तसंच पाण्यासाठी अन गावासाठी.
तिथं कळून चुकलं होतं की पाणी अडवलं तरच पाणी मिळणाराय. बँकेतनं नुसतं वर्षानुवर्षे पैशे काढत राह्यलं तर ते एक दिवस संपणारच, मग कुणीच पैशे भरलं नाही तर काय?? म्हणलं आता आपण ह्या पाण्याच्या बँकेत, पाणी अडवून पाणी साठवायचं. थोडं का हुईना पाणी झालं तर एकतरी पीक घेता यील शेतात. तसाच ट्रेनिंग संपवून गावाकडं आलो.
...वाडी वस्तीवर राहतो तिथं टँकरनं पाणी येतं. पण ठरवलं की आपण ह्या जमिनीतलं पाणी उपसून हिच्यावर आजवर लय अन्याय केलाय तर आता शिक्षाबी आपुणच भोगायची. मग टँकरचं पाणीच घ्यायचं नाही असं ठरवून टाकलं. जवर स्वतः पाणी जिरवायला कायतरी करल तवाच हे टँकरचं पाणी हक्कानं घेईन. तवर अजिबात नाय.
गावाकडं आल्यापासनं अन स्पर्धा सुरू होईपर्यंत गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन "सगळी मिळून श्रमदानाला जाऊ, गाव पाणीदार करू" म्हणून सांगत होतो, सगळी होय होय म्हणली.
शेवटी शेवटी सगळे हुलकावणी द्यायला लागले, "आता आलो!
5 मिनिटात पोचतोय!
ह्या अन त्या कामात अडकलोय! हजार कारणं"
सकाळी 8, 9 पासनं रात्री 11-11 पर्यंत वाट बघायला लावायची लोकं.
शेवटी कळून चुकलं कोण सोबत येणार नाय अन आपली आपल्यालाच झक मारायचीय.. (ते एक समजून येणं गरजेचं असतं.) मग 7 एप्रिलच्या रात्रीपासनं जवळजवळ बाकीच्या महाराष्ट्रभरातल्या अनेक गावात मशाली घिउन जिथं हजार-हजार माणसं ओरडत , आनंदानं घोषणा देत श्रमदानाला जात हुती तवा हिकडं मात्र मी स्वतःच खंदायला कुदळबी, माती ओढायला खोरयाबी अन ती बाहेर फेकायला पाटीबी घिऊन एकटाच रात्री अंधारात एक बॅटरी लावून रातकिड्यांच्या सोबतीनं श्रमदान चालु केलं.
आता कामबी रोडच्या कडंला करतोय, सगळ्यांना दिवसा,रात्री येता-जाता सहज दिसतंय पर येत कुणी नाही. रोज सकाळी 8 ते दुपारी साडेबारा असं साडेचार तास काम करतोय. आता आता सोबत माझी बारकी पुरगी, बायकू येत्याती.
"पोराला चूक कळलीय अन ते एकटंच काम करतंय" म्हणून शुगर जास्त असूनबी आई बाप कामाच्या हिथ उन्हा-तान्हात येत्याती अन हळूच डोळं पुस्तयाती.
"आतापरतुर 84 मीटर CCT खंदल्यात , तुमचं ते पाणी फौंडेशनवालं म्हणलं की ह्यात कमीत कमी 20 पावसात मिळून 30 लाख लिटर पाणी साठल. एकट्यानंच वॉटर बजेटबी तयार केलंय, पाऊस किती पडला हे समजावं म्हणून रेनगेज बी तयार केलंय. शोषखडा बी घेतलाय. परिसबाग करून तिथं कर्दळी अन केळी बी लावलीय. थेंब न थेंब वाचवणाराय अन जमिनीतनं जेवढं उपसलंय तेवढं तिला सन्मानानं परत करणाराय. 45 दिवसातला एकबी दिवस कामावर खडा ठिवणार नाही."
आता तर कुणाला बोलवायला बी जात नाही, ती वेळ सरून गेली आता.. आपलं काम आपण चोख करायचं एवढंच ठरवलंय.
ट्रेनिंगला जायच्या आधी पाणाड्याला आणून बोर मारायचा पॉईंट फिक्स केलता,, आता तिथं जाऊन डोकं टिकवून शपथ घेऊन आलोय, हिथनं पुढं हे असं जमिनीला वेजं मनून पाडायची नाहीत.
ज्या गावात ट्रेनिंगला गेलतो तिथल्या विहिरीला 15-20 फुटावर पाणी लागल्याल मी माझ्या डोळ्यानं बघितलं. हिथ 100-200 फूट विहीर गेली तरी पाणी नाही. मग वाटतं की तिथं पाणी मुरू शकतं तर हिथ माझ्या गावात का नाही?? जमिनीला थोडी कळणाराय की एकट्यानं काम केलंय का एक हजार जणांनी मिळून काम केलंय.??
कारण आता एकच वाटतं की आधीच असं पाणी मुरवलं , साठवलं असतं तर मला हे 4 लाख कर्ज झाल नसतं, ना 40 हजार महिना व्याज द्यावं लागलं असतं, ना माझं 11 बोर अन 2 विहिरी कोरड्या पडल्या असत्या, ना माझी जिवाभावाची जनावरं विकावी लागली असती.
शेवटी कसंय आपण सुधारलो तर गाव, तालुका अन देश सुधरणाराय. "उगीच पोकळ गप्पा आयुष्यभर हाणण्यात अन हिथ मातीत मिसळून जमिनीत एक कुदळ भिरकावून हाणण्यात" लय फरक अस्तूय हे समजून चुकलंय आता......
आता हे डोळ्यातलं पाणी, शिवारात साठवंल..तवाच हा पेटलेला आत्मा शांत हुईल!!
--।
हा पठ्ठ्या आहे, संतोष तुकाराम जाधव,
गाव: जुनोनी
तालुका: मंगळवेढा
जिल्हा: सोलापूर...
---
सचिन अतकरे...
संबंधित ब्लॉग
BLOG : शेर से भिडा शेर
काळीज चिरणारी चिठ्ठी
धमन्या पेटलेले 40 सैनिक...
जगावेगळ्या रोपवाटिकेची कहाणी
श्रमदानासाठी परदेशातून मदत करणारे सादिकभाई
...हे वाचायला थोडीशी ताकद लागेल...!
दुष्काळाला एकटा हरवत असलेला जांबाज...!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Apr 2019 11:37 AM (IST)
तिथं कळून चुकलं होतं की पाणी अडवलं तरच पाणी मिळणाराय. बँकेतनं नुसतं वर्षानुवर्षे पैशे काढत राह्यलं तर ते एक दिवस संपणारच, मग कुणीच पैशे भरलं नाही तर काय?? म्हणलं आता आपण ह्या पाण्याच्या बँकेत, पाणी अडवून पाणी साठवायचं. थोडं का हुईना पाणी झालं तर एकतरी पीक घेता यील शेतात. तसाच ट्रेनिंग संपवून गावाकडं आलो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -