मुंबईमध्ये उभारलेला पूल जमीनदोस्त होतो... दोन फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात योगायोगाने एका खुनाचा फोटो कैद होतो. त्या फोटोच्या आधारे दोघेजण मारेकऱ्यांचा शोध घेतात. त्यातून पूल दुर्घटनेचा पर्दाफाश होतो... एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान महाभारत घडतं... आणि अधिकारी, राजकारणी, पोलीस यांच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश होतो... पण ज्या दोघांनी पूल दुर्घटनेचा पर्दाफाश केला... त्यांनाच पूल दुर्घटनेचा मास्टरमाईंड ठरवलं जातं...


80 च्या दशकातली जाने भी दो यारो ही ब्लॅक कॉमेडी मुंबईकरांच्या आजच्या अवस्थेचं तंतोतंत चित्रण करते.. म्हणजे जे चित्र 30 वर्षांपूर्वी होतं, तेच आजही आहे..... तेव्हाही भ्रष्ट राजकारणी होते, आजही आहेत... तेव्हाही मुजोर नोकरशाही होती, आजही आहे... तेव्हाही सुस्त यंत्रणा होती, आजही आहे.... तेव्हाही मुंबईकर म्हणायचे.... जाने भी दो यारो.... आजही...? ........


त्या वरच्या रिकाम्या जागांमध्ये काय भरायचं हे तुम्हाला नेमकं माहित आहे.... किंबहुना जाने भी दो यारों, हे मुंबईकरांचं ब्रिदवाक्य झालं आहे.... आजूबाजूला कितीही मोठं संकट असलं, तरी जोपर्यंत ते आपल्यावर येत नाही, तोपर्यंत मुंबईकर म्हणतच राहतो.... जाने भी दो यारों.... आणि बहुदा मुंबईकरांच्या जीवावर हेच वाक्य उठतंय....


मुंबईत दिवसाला इतक्या वावग्या गोष्टी होत असतात, पण कुणीही त्यावर ना व्यक्त होतो... ना हस्तक्षेप करतो... आपल्याला काय करायचंय? हा अॅटिट्यूडच मुंबईला मारक ठरतोय.... अर्थात अशा किती वावग्या गोष्टींमध्ये प्रत्येकाने हस्तक्षेप करायचा हा मुद्दा आहे... पण अशा दुर्घटना टाळायच्या असतील... तर ते आता प्रत्येक मुंबईकराला करावं लागेल...


आपण कोणत्याही स्टेशनच्या पुलावरून गेलो... आणि पुलाखालून गाडी गेली... की पूल धडधडतोच... पण लक्षात कोण घेतो... कुणी तक्रार करतं? कुणी ट्वीट करतं? कुणी फेसबुकवर लिहितं? नाही...


हे सगळ्यांना नेहमीचं झालंय... हे जे नेहमीचं होणं आहे ना? तेच जीवावर उठतंय... आणि मग बसतो आपण मृतांच्या नावाने मेणबत्त्या पेटवत... रस्त्यात सुरु असलेलं निकृष्ट काम उघड्या डोळ्याने बघतो... पण त्याची तक्रार करतो का? नाही... त्या भानगडीत आम्ही कशाला पडायचं?


बरोबर आहे... त्या खड्ड्यात बाईक जाऊन तुमचं कपाळ फुटल्याशिवाय तुम्हाला जाग येणार नाही... हातात फोन आहे... त्याचा वापर करा.... करा क्लिक... आणि टाका सोशल मीडियावर... करा रितरस तक्रार... एकाच्या जागी दहा जणांच्या तक्रारी गेल्या, तरी सिस्टिम हलेल...


आता जो पूल कोसळला... त्या पुलावरून रोजच्या रोज किती माणसं जात असतील... एकाने तरी पुलाच्या दुरवस्थेबद्दल विचार केला होता का? कुणीच नाही... कारण जन्माला आलेल्या प्रत्येकाला वाटत असतं... ती वाईट वेळ आपल्यावर येणार नाही... आणि हाच सर्वात मोठा भ्रम आहे...


सिस्टिम निगरगट्ट असते... तिला हलवावं लागतं हे खरंय... पण दुसरा कुणी तरी सिस्टिमला जागं करेल म्हणून मुंबईकर निवांत राहिला... आणि अशा अपघातांमध्ये रोजच्या रोज खपत राहिला... खरं तर कोणत्याही शहराने जितकं दिलं नसेल... तितकं भरभरुन ही मुंबई देशाला देते. पण त्या बदल्यात मुंबईला काय मिळतं? हा चाऊन चोथा झालेला विषय आहे...


माझ्या मित्राने ट्टिटरवर मांडलेल्या एका मताशी मी हजार टक्के सहमत आहे... देशात काहीही होऊ दे... पण मुंबईत शिवसेनाच हवी... या एका वाक्याने मुंबईची पार वाट लावली आहे... कोणताही सत्ता एकाच हातात अनंत काळ राहिली... तर त्या अनिर्बंध सत्तेमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये एक विशिष्ट कोडगेपणा येतो... मुंबईत सध्या तेच झालंय... सत्ताधारी असोत.... किंवा नोकरशाही.... त्यांनी मुंबईकरांना गृहित धरलंय...


मुंबईच्या मागून आलेली शहरं आज कुठल्या कुठे गेली आहेत... दिल्ली, हैदराबाद, चंदिगड, भोपाळ, बंगळुरु अशी किती नावे घ्यावीत... अर्थात या शहरांना पसरण्यास वाव आहे.... मुंबईला ती सोय नाही, हे मान्य... पण म्हणून मुंबईचा कोंडवाडा होण्यापासून रोखणं हे व्यवस्थेच्या हातात नव्हतं...?


परप्रांतीय म्हणा... किंवा आणखी काही... मुंबईत येणाऱ्यांचा रेटा कमी कधी झालाच नाही... झोपड्या वाढल्या... मतदारसंघ वाढले... मतांची गरज वाढली... झोपड्यांची पक्की घरे करुन देण्याची आश्वासने आली... बनावट ओळखपत्रे तयार झाली... त्यांचे मतदार झाले.... त्या मतदारांची लॉबी झाली... त्यांना खुश करण्यासाठी आश्वासने आली... मुंबई बोकाळत गेली... तिला दशदिशांनी फक्त ओरबाडलं जाऊ लागलं... आणि मग गरजेपेक्षा फुगलेल्या मुंबईने आपले अवतार दाखवायला सुरुवात केली.


2005 साली महाप्रलयाने सुरुवात केली... आज 14 वर्षांनीही आम्ही शिकलो नाही... पण आपल्या हातात काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडेल... गरज पडेल तिथे व्यक्त व्हा... गरज पडेल तिथे हस्तक्षेप करा.. फुटलेला कठडा दिसला तर तक्रार करा. तुटलेलं रेलिंग दिसलं तर यंत्रणेला कळवा. संशयास्पद हालचाल दिसली, तर पोलिसांना कळवा. सरकारी लेटलतिफी दिसली, तर तातडीने हस्तक्षेप करा...


वेळीच घातलेला एक टाका पुढचे दहा टाके वाचवतो असं म्हणतात. तुमची एक तक्रार कदाचित पुढचा अनर्थ टाळू शकते.... वाचून वाटलं अनुकरण करावं तर नक्की करा...


"जाने भी दो यारों"पासून मुंबईला मुक्त करा!