आमच्या राज्यात सूर्य मावळत नाही कारण आम्ही जगावर राज्य करतो असं ब्रिटिश म्हणत असत. पण याच ब्रिटनमधल्या एका कार कंपनीला भारतीयानं त्याच्या श्रीमंतीचं पाणी पाजलं असं म्हणटलं जातं, एक किस्सा सांगितला जातो. परंतु हा किस्सा आपल्या देशातल्या किमान दोन ते तीन राजांबद्दल तरी सांगितला जातो. संशोधनाचा विषय आहे.
किस्सा असा...
ही गोष्ट आहे 1920 सालादरम्यानची...अलवारचे राजे महाराजा जयसिंह प्रभाकर लंडनमध्ये राहात असताना एकदा फिरायला बाहेर पडले, रस्त्यावरून आपला लवाजम्यासह न जाता एकटेच जात असताना रोल्स रॉयस या नामवंत गाडी उत्पादक असलेल्या कंपनीच्या अलिशान शोरुममध्ये जातात. अतिशय साधी वेशभूषा केलेले महाराजा प्रभाकर यांच्याकडे बघून एक कोणीतरी सामान्य भारतीय गाडी पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी आत आला आहे असं शोरुममधल्या नोकराला वाटतं.
महाराजा प्रभाकर शोरुममधल्या नोकराला म्हणतात, की, "मला गाडीबद्दल माहिती द्या मला गाडी खरेदी करायची आहे" त्या शोरुममधल्या माणसानं त्यांच्या साधेपणामुळे ही गाडी तुमच्यासारख्या माणसांसाठी नाही असं म्हणत त्यांना तेथून हाकलवून लावलं. त्यावेळी रोल्स रॉयसही घरंदाज आणि अति प्रतिष्ठित लोकांनाच दिली जात असे.
अपमानीत होऊन बाहेर पडलेले महाराजा जयसिंह प्रभाकर आपल्या हॉटेलवर गेले आपल्याबरोबरच्या लोकांना त्यांना रोल्स रॉयस कंपनीच्या शोरुमला फोन करुन महाराजांना गाडी पाहायची आहे असं सांगायला सांगितलं, तसं सांगितलंही गेलं. इकडे शोरुममध्ये महाराजा येणार म्हणटल्यावर रेड कार्पेट टाकलं गेलं. महाराजा प्रभाकर मग शोरुमकडे गेले आपल्या राजेशाही थाटात. आता मात्र त्याचं जंगी स्वागत केलं गेलं.
गाड्या दाखवून झाल्यानंतर मग त्यांनी एकदम सहा गाड्या खरेदी केल्या, भारतात पोहोचविण्याचे पैसेही भरले. महाराजांनी भारतात आल्यावर त्या सहाही गाड्या नगरपालिकेच्या हवाली केल्या आणि शहराच्या कचरा उचलण्यासाठी लावल्या. हळूहळू ही बातमी देशभर पसरली, ब्रिटिशांपर्यंत गेली आणि युरोप अमेरिकेत पोहोचली.
अमेरिकेत, युरोपमध्ये प्रचंड क्रेझ असलेली गाडी भारतात कचरा उचलते असं म्हटल्यावर गोऱ्या लोकांनी ही गाडी घेणंच बंद केलं. साहाजिकच कंपनीच्या नावाला, ब्रॅन्ड व्हॅल्यूलाच त्यामुळे धक्का बसला, लोक ही गाडी खरेदी करेनासे झाले. कंपनीचा खप कमी झाला, कंपनीचे शेअर पडले, कंपनीसमोर एक अर्थिक आव्हान उभं राहिलं.
कंपनीचे संचालक चिंतेत पडले अखेर त्यांनी महाराजांना भेटून माफी मागून सुरु असलेला प्रकार बंद करण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराजांना विनंती करण्यासाठी एक शिष्ठमंडळ अलवारमध्ये दाखल झालं. महाराजा जयसिंह प्रभाकर यांची भेट घेऊन विनंती आणि अक्षरश: याचना केली गेली. बरोबरच असं म्हणतात महाराजांना कंपनीकडून सहा गाड्या भेट दिल्या गेल्या. अखेर महाराजांनी कंपनीची विनंती मान्य करुन रोल्स रॉयस गाडीमधून कचरा उचलण्याचं काम बंद करण्याचे आदेश दिले. अशा रितीनं महाराजा जयसिंह प्रभाकर यांनी नामवंत, जगविख्यात असलेल्या ब्रिटीश कंपनीला एक प्रकारे धडाच शिकवला.
पण हाच किस्सा अलवारचे महाराजा जयसिंह प्रभाकर यांच्यासह हैद्राबादचा निजाम मुकर्रम जाह यांच्या बाबतीतही सांगितला जातो. असंही म्हणतात की पटीयालाच्या राजाच्या बाबतीही स्टोरी सांगितली जाते. त्याचबरोबर भरतपूरच्या महाराजासंदर्भात तर पाकिस्तानमधल्या भवालपूरच्या नवाबाच्याबाबतीतही सांगितल्याचं समजतं. आता हे खरंच घडलं का...?? आणि घडलं तर कोणाच्या बाबतीत घडलं हे संशोधनासाठीचं भांडवल आहे.
आता जसं एखादा अग्रलेख, बातमी, कथा, किस्से फॉरवर्ड केले जातात काही वेळा नावं बदलून तसं पूर्वीही होत होतं याचा हा पुरावा म्हणावा का...?? त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीचं डॉक्युमेंन्टेशन करण्यात आपण कमी तर पडत नाही ना हा ही एक प्रश्न निर्माण होतो अशा घटनांमधून. असो.
अर्थात ही स्टोरी खरी असो वा नसो, आपल्याला 'एखाद्या ठिकाणी अपमान झाला तरी त्याचा राग कशा प्रकारे आणि कधी व्यक्त करायचा त्याची पध्दत कशी असावी याचा सोदाहरण बोध देऊन जाते'.