एक काळ मुस्लिम महिलांच्या बाबतीत असा होता की, त्यांना मोकळी हवा, सूर्यप्रकाश मिळणं देखील मुश्किल होतं. तिहेरी ‘तलाक’ पद्धतीमुळे त्यांच्या आयुष्याचा अक्षरशः पालापाचोळा झाला होता. कारण ' शरीयत कायद्या' प्रमाणे केवळ पुरुषांनाचं तलाक देण्याची सूट होती. त्यामुळे कित्येक मुस्लिम महिलांची कुटुंब उद्धवस्त झाली होती. अनेक पुरुषांच्या तर चार चार बायका होत्या. पुरुषांच्याच पूर्णपणे बाजूने असणाऱ्या या कायद्याला पुरुष मूठमाती द्यायला तयार नव्हते. मुळात असा काही विषय देखील त्यांच्या गावी नव्हता. अशा परिस्थितीत हमीद दलवाई नावाचे एक मुस्लिम समाज सुधारक मात्र एकटे एकाकी झुंज या प्रस्थापित व्यवस्थेला देत होते.
याबाबत काय करता येईल यासाठी त्यांची पुण्यात वेळोवेळ डॉ. बाबा आढाव, भाई वैद्य, डॉ. रामचंद्र शहा, अॅड. म. वि. अकोलकर, सय्यद भाई यांच्याशी चर्चा होतं होती. त्या चर्चेतून एक बाब समोर आली की, आपल्याकडचे इस्लामी कायदे पुरुषांची मर्जी राखणारे आहेत. किंबहूना सगळ्याच धर्मांनी स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली आहे. आपल्याकडचा तलाकचा प्रश्न असो, बहुपत्नित्वाचा प्रश्न असो. ह्या गोष्टी ताबडतोब थांबल्या पाहिजेत. आणि त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन संघटित प्रयत्न केले तर या प्रश्नाला वाचा फुटेल. आणि त्यातूनचं पुढं मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना 22 मार्च 1970 ला पुण्यात करण्यात आली. ज्यावेळी ही संघटना स्थापन करण्यात आली त्यावेळी मोठया प्रमाणात मुस्लिम समाजातून विरोध होऊ लागला. एवढंचं काय इस्लाम खतरेमें है असा प्रचार देखील झाला. परंतु मंडळाचं काम हमीद भाईच्या नेतृत्वात नेटानं सुरू होतं. या मंडळाचा पुरुषांना मोठया प्रमाणात त्रास वाटू लागला असला तरी महिलांना मात्र मोठा दिलासा मिळाला होता.
' जिहादे तलाक' या घोषणेखाली मंडळाचं काम जोरदार सुरू होतं. पुढे पुढे मंडळाकडे तलाक पीडित महिलांच्या तक्रारींचा आकडा वाढतच चालला होता. दरम्यानच्या काळात कलम 125 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयांनं 1974 साली ताहराबी या तलाकपीडित महिलेची पोटगी मंजूर केली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्यावेळी अक्षरशः पोटगी मागण्यासाठी तलाकपीडित महिलांची न्यायालयाकडं रीघ लागली होती. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, एकतर्फी तलाक देणारा दहा वेळा विचार करून तलाक देऊ लागला. कारण तलाक दिल्यानंतरही तलाक दिलेल्या पत्नीला पोटगी द्यावी लागणार होती. पोटगी अधिकाराचा निकाल म्हणजे एकतर्फी तीन तलाकला लगाम होता. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे तलाकपीडित पत्नीची पोटगी मंजूर होताच मी तिला तलाक दिलाच नाही. ' वकिलांनी काय लिहून पाठवलं हे मला माहीत नाही' असं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून नवरा तलाक दिलेल्या आपल्या पत्नीला घरी घेऊन जात असे.
मंडळी, हे सर्व होण्यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा यात मोठा हातभार होता. मंडळाचे सर्वच सदस्य आपल्या आया-बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र एक करत होते. यासाठी सभा, संमेलनं, अधिवेशनं, मोर्चे, उपोषणं देशभर घेतली जात होती. ' शाहबानो केस' तर संपूर्ण देशात गाजली होती. रस्त्यांवर लाखोंचे मोर्चे शाहबानो मुर्दाबादच्या घोषणा देत रस्त्यांवर येतं होते. तरीदेखील मुस्लिम सत्यशोधक मंडळानं शाहबानो यांना पुण्यात बोलावून त्यांचा जाहीर सत्कार केला होता. यावेळी देखील प्रचंड विरोध झाला परंतु तरीदेखील मंडळाचं काम मात्र जोरदार सुरू होतं. ते आजही सुरू आहे. हे सगळं आज आठवण्याचं कारण आज हमीद दलवाईंचा 44वा स्मृतीदिवस. पन्नास वर्षांपूर्वी हमीदभाईनी लावलेल्या रोपट्याचं आज विशाल वृक्षांत रूपांतर झालं आहे. नुकताचं शासनाने देखील तिहेरी तलाक कायदा बेकायदेशीर ठरवला आहे. हमीदभाईंनी पन्नास वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. यावरून सय्यद भाईंच्या शब्दात म्हणायचं झालं तर ' विषमतावादी समाजाचं एक एक अंग कळालेल्या हमीद दलवाईंना नेमकं समाजाचं सोशल चेकअप कसं करायचं हे समजलं होतं. त्यामुळे समाज परिवर्तनाच्या या एम.डी.नी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. त्यावेळी कदाचित हमीद दलवाईंच्या हेच डोक्यात असंल की आपण आपलं कार्य आहे त्या परिस्थितीत चालू ठेवायला हवं. कदाचित दीड-दोनशे वर्षांनी का होईना या दगडांवर विचारांची पेरणी होऊन काही तरी नक्कीच चांगलं उगवेल'.
निलेश बुधावले यांचे अन्य ब्लॉग