आतला आणि बाहेरचा हा संघर्ष केव्हाचाच सुरू आहे.  ज्याँ पॉल सात्रे यांनी अस्तित्ववाद मांडला. ते उलगडून सांगण्याआधी बिईंग आणि नथिंगनेस हा दोन संकल्पनाची सांगड घातली. अस्तित्व असणं आणि त्याचवेळी ते नाकारणं अशा परस्पर विरोधी विचारांची मांडणी त्यांनी आपल्या पुस्तकात केली. नतेश हेगडेचा पेड्रो (2021) हा सिनेमा पाहताना वारंवार या बिईंग आणि नथिंगनेसची आठवण येत राहते. समाजाचा हिस्सा असलेल्याला अचानक बाहेरचा मानण्याच्या घटना वाढल्यात. त्यातून सामाजिक संघर्ष वाढला, टोकाला पोचला. हत्याकांड घडली. खून झाले. काही प्रकरणं बाहेर आली. काही ठिकाणी सोईस्कर पध्दतीनं प्रकरण दाबलं गेलं. हे सर्व घडत असताना झुंडशाहीला जे बळी पडले. अस्तित्वाची लढाई लढता लढता हरले अशा असंख्य लोकांची गोष्ट पेड्रो सांगतो. नतेश हेगडेचा हा सिनेमा आंतरराष्ट्रीय आणि देशपातळीवरच्या सर्व फिल्म फेस्टिवलमधला 'हॉट पिक' आहे. अगदी दक्षिण कोरियातल्या बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलपासून लंडनमधल्या स्क्रिनिंगपर्यंत आणि भारतातल्या केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलपर्यंत पेड्रोची चर्चा आहे. पेड्रोनं सामाजिक संघर्षासोबत व्यक्तीच्या वैयक्तिक संघर्षाची जी गोष्ट सांगितली आहे ती खऱ्या अर्थानं जागतिक आहे. 


कर्नाटकातल्या धारवाड इथं घडणारं पेड्रोचं कथानक जागतिक पातळीवर चर्चेला येण्यामागची अनेक कारणं आहे. जगभरात विस्थापितांचे लोंढे तयार होतायत. सामाजिक आणि राजकीय कारणांमुळं हे विस्थापित जगात जिथं जागा मिळेल तिथं स्थलांतरीत होतायत. ही प्रक्रिया अत्यंत क्लेशदायक आणि अनेकदा प्राणघातक आहे. ही असं घडत असताना भारतात मात्र जात, धर्म आणि पंरंपरेच्या नावाखाली एक वेगळाच संघर्ष टोकाला पोचला आहे. देशातली सामाजिक परिस्थिती त्याला जबाबदार असल्याचा मतप्रवाह आहे. पण हे सामाजिक मत बनवण्यासाठी राजकीय स्थिती कशी जबाबदार असते. यावर पेड्रो (2021) हा सिनेमा प्रकाश टाकतो. यामुळंच मग कर्नाटकातल्या एका छोट्या गावातली ही गोष्ट जागतिक पातळीवर सुरू असलेला अस्तित्वाचा संघर्ष दाखवते. समाजात आतले आणि बाहेरचे असे मतप्रवाह तयार झाले आहेत. ज्याने आतून बाहेरुन समाजाला पोखरुन टाकलंय. याचा कमी अधिक परिणाम सर्वसामान्यांच्या जगण्यावर झाला आहे. याची सतत जाणिव पेड्रो सिनेमातून होते हे विशेष. 


जगण्याचा संघर्ष भयंकर आहे. यातून अनेक गोष्टींचा जन्म होतो. यातली पहिली गोष्ट म्हणजे लाचारी. म्हणजेच फक्त जगता यावं, यासाठी काहीही करण्याची तयारी असणारे लोक आणि त्या लोकांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना नाडणारे लोक. समाज शोषित आणि शोषण करणारे अश्या दोन गटांमध्ये विभागला जातो. अशा थेट विभाजनात संघर्षाची शक्यता फार कमी असते. पण जेव्हा शोषित होणाऱ्या समाजाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली जाते. जेव्हा वारंवार तू बाहेरचा आहेस असं सांगतलं जातं. तेव्हा या संघर्षाची ठिगणी पेटते आणि त्यातून घटना किचकट होत जातात. स्थिती बिघडत जाते. मग शोषित समाजाकडून आपलं अस्तित्व दाखवण्याची तयारी सुरु होते. दुसरीकडे शोषण करणारा ही असाच पूर्ण तयारीनं उतरलेला असतो. तो जास्त संघटीत असल्यानं भारी पडतो. मग अनेकदा शोषितांचा बळी जातो. हे सामाजिक पातळीवरच होतं असं नाही. कुटुंब या संकल्पनेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा समाजात ही प्रवृत्ती वाढण्यापुर्वी त्याची सुरुवात या छोट्या कुटंबातल्या आतले आणि बाहेरच्या संघर्षातून होते. ज्याचे पडसाद समाजावर पडतात. 


पेड्रो सिनेमाचा हिरो अगदी पडेल ते काम करणारा मजूर आहे.  गावातल्या इलेक्ट्रिक खांबावर चढून लाईन ठीक करण्यापासून ते ताडाच्या झाडाची फवारणी करण्यापर्यंत जे हाताला मिळेल ते काम तो करतो. राकट पण मनानं हळवा असलेल्या पेड्रोला जेव्हा आपण बाहेरचा असल्याची जाणिव होते. तेव्हा त्याचा आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा संघर्ष सुरु होतो. या संघर्षातून पेड्रोच्या घरात आणि गावात जी काही वातावरण निर्मिती होते. त्यातून झुंडशाही, कौटुंबिक कहल, स्त्रीवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीही झालं तरी टिकून राहायचं आहे., जगायचं आहे या भावनेतून सुरु असलेली अस्तित्वाची एकतर्फी लढाई सुरु होते. त्यातून जे जे काही घडतं ते जगाच्या कुठल्याही भागात तिथं अशी परिस्थिती असेल तेव्हा कदाचित असंच घडेल असं याची अनुभूती देऊन जाते. 


या सिनेमातली स्त्री पात्रं ही भन्नाट बोल्ड आहेत. इथं बोल्डचा अर्थ कणखर, ताठर असा आहे. या प्रक्रियेत या स्त्री पात्रांकडे गमावण्यासारखं  खूप काही आहे. त्या दु:खातून पुन्हा उभं राहणाऱ्या ज्युलीचं पात्रं नतेशनं तयार केलंय. हे अलिकडच्या काळात सिनेमाच्या माध्यमातून आलेल्या स्ट्राँग स्त्री पात्रांपैकी एक आहे. 


नतेशवर अब्बास किओरोस्तमी सारख्या इराणीयन फिल्ममेकर्सचा प्रभाव आहे. हे अगदी सिनेमाच्या सुरुवातीच्या दृश्यांपासून  जाणवत. त्याला आपली गोष्ट सांगण्याची काहीही घाई नाही. लांबलेले सीन तो तसेच ठेवतो. त्यातून कथानकाची उंची सिनेमॅटिकली वर घेऊन जातो. हे सर्व करताना तो कथेचा पोत आणि त्यातले संदर्भ अधिक जास्त प्रकर्षाने जाणवतील याची काळजी घेतो. हीच पेड्रोची खासियत आहे. म्हणूनच पेड्रो जागतिक पातळीवर गाजतोय. तो लवकरच थिएटर्समध्ये पाहता येणार आहे.