>> मंजिरी पोखरकर


आज 15 जून... कोरोनापर्वाआधी या दिवसाची मज्जा काही निराळीच होती. या दिवसासाठीची तयारी साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होत असे. जून महिना आला की मला आठवतात त्या जून महिन्यातल्या खरेद्या. नवीन दप्तर, त्या दप्तरात ठेवण्यासाठी नव्या इयत्तेची पाठ्यपुस्तकं, वह्या, कंपास बॉक्स, जुना रेनकोट असताना नवीन घेतलेली छत्री, जुनी पावसाळी सँडल चांगली असतानाही बाबाकडून हट्टाने मागितलेली नवीन सँडल, नवा गणवेश ते नवीन टिफिन बॉक्स असं सर्व काही नवीनच असायचं. आणि या सगळ्या नवीन गोष्टींसह जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्याची ओढ असायची. 


शालेय दिवसांतला शाळेचा पहिला दिवस मला खूपच आवडायचा. कित्येक दिवसांनी भेटलेले ते मित्र-मैत्रिणी, नवीन वर्गशिक्षक, नवीन वर्गशिक्षकांसमोर मीच कसा चांगला आहे हे पटवणारे विद्यार्थी. प्रत्येक तास हा अभ्यासाचा तास नसून गप्पांचा तास असायचा. एखाद्या तासाला सुट्टी कोणी कशी घालवली याची विचारपूस व्हायची, एखादे सर मुलांना मैदानात सोडायचे. तर एखाद्या बाई गाण्यांच्या भेंड्या रंगवायच्या. मधल्या सुट्टीत आईने बनवून दिलेली भाजी-पोळी मिळून मिसळून फस्त केली जायची. आणि दुसऱ्या दिवसापासून वर्षभर अभ्यास करावा लागणार याचा विचार करत शाळेतून निरोप घ्यायचा.


या शाळेच्या पहिल्या दिवसाची गंमत ऑनलाईन शाळेच्या पहिल्या दिवसाने मात्र पूर्णपणे घालवली. गणवेश घालून बसची वाट पाहत किंचित कंटाळलेल्या चेहऱ्यांनी शाळेत जाणारी मुलं आज लॅपटॉप, आयपॅड, स्मार्टफोन घेऊन अमुक एखाद्या ॲपवर लॉगीन होत होती, स्वत:ची ऑनलाईन ओळख करून ऑनलाईनच वर्गमित्रांना भेटत होती. तर मागच्या वर्षात जो काही थोडाफार अभ्यास केला होता त्याची उजळणी सुरू होती. 


ऑनलाईन तासांत तासातासाच्या गजराची मात्र नक्कीच आठवण येत असेल. याच तासातासाचा गजर देणाऱ्या शाळेच्या त्या 'घंटे'ची आज मला प्रकर्षाने आठवण झाली. खरंच ही शाळेची घंटा बोलू लागली तर काय बोलेल बरं... या एकाकीपणाचा मला खरंच खूप कंटाळा आला आहे. किती दिवस झाले मुलं मला भेटली नाहीत. माझा हा परिसर नेहमी किती गजबजलेला असायचा. शाळेत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची मी पूर्वी साक्षीदार असायचे. मी विद्यार्थ्यांना शिस्त लावते. त्यांची आवडती मधली सुट्टी झाली हे त्यांना कळवते. अशी विद्यार्थ्यांची लाडकी घंटा मात्र ऑनलाईन शिक्षणाच्या चौकटीतून बादच झाली. 


मॉनिटर, प्रतिनिधींची निवडदेखील शाळेच्या पहिल्याच दिवशी व्हायची. माझ्या एकंदरीत शालेय प्रवासात मी कधी मॉनिटर तर कधी प्रतिनिधी असायचेच. पण, हे प्रकरण काहीतरी भन्नाटच होतं. एखाद्या तासाला बाई न आल्यास समोर उभं राहून बोलणाऱ्यांची नावं लिहायची. एकदा नाव लिहिल्यानंतर परत बोलल्यास नावासमोर फुल्ली मारायची. जास्तच कल्ला सुरू असेल तर बाजूच्या वर्गातल्या बाई ओरडून जायच्या. 


शाळा म्हटली की आल्या गृहपाठाच्या वह्या, गृहपाठ काय आहे ते लिहिण्यासाठीची ती दैनंदिनी. हातावर पडलेली छडी, राष्ट्रगीताआधी वर्गात पोहोचण्याची सक्की. मी शाळेत असताना बऱ्यापैकी हुशार असल्याने गृहपाठाची वही वेळेआधी पूर्ण असायची. माझा आणि गाण्याचा दूरदूर संबंध नसला तरी शाळा भरण्यापूर्वी माईकवर राष्ट्रगीत बोलणाऱ्या मुलींमध्ये मी असायचे. माझी शाळा ठाण्यातील सध्याच्या नामांकित शाळांमध्ये मोडत नसली तरी मला माझी शाळा खूप आवडते. शाळेने आजपर्यंत विविध क्षेत्रांतील नामवंत घडवले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा बाबा, आत्या, काकादेखील याच शाळेचे माजी विद्यार्थी. आता मीदेखील त्याच शाळेची माजी विद्यार्थी झालेली आहे. माझा शालेय जीवनातील काळ खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार देणारा ठरला. 


शाळेतील निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा-स्पर्धा, सहली अशा शाळेतील अनेक गोष्टींमुळे व्यक्तिमत्त्व समृद्ध होत गेलं. आज मला सुदर्शन सांबसकरच्या कवितेतील काही ओळींची आठवण झाली...


कसं जगावं कसं बोलावं हे सारं शिकत गेलो
तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टींतून बाई मी घडत गेलो.
ना कुठला आकार, ना कुठला उकार, 
मग चार भिंतींच्या आतमध्ये होतात आयुष्याभराचे संस्कार.
भूगोल, नागरिकशास्त्र नि इतिहास हे सारे विषय उमजत गेले,
अर्धवट राहिलेले आयुष्याचे गणित तुमच्यामुळे सुटत गेले.
काळ बदलत जातो पण आठवणी काही जात नाही
आजही शाळा बघितली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
ज्ञानाची तहान, बाई आमुच्या महान, पुन्हा तेच दिवस जगण्यासाठी मन होऊ लागतं लहान नि लहान!