Blog : (पावसाची रिपरिप सुरूच, झेंडावंदनाच्या आदल्या दिवशी, काही मंडळी समाज मंदिरात बसलेली)


तुळश्या : लगा दाम्या, पाऊस काय थांबायचं नाव घिना बघ...टमाट्याची लागवड झाली असती का नै! 


दाम्या  :  व्हय तर, अर पर भातालाबी पाऊस लागतुया नव्ह... 
तुळश्या : ते बी हाय म्हणा...त्या खालच्या आळीच्या राम्याची गोठ कळली का? 
दाम्या : न्हाय, बा...
तुळश्या : तेचन काय दुसरं!
दाम्या : काय पण सांगशीन का? 


तुळश्या : अर, पोर पोटूशी, दिस भरेल व्हतं का न्हाय, त्या दिसी पोट दुखाया लागलं, पाऊस बी सुरूच व्हता, मग फाट्यापतूर डोली करून नेली...
दाम्या : आपलं आयुष्य ह्यातच जाणार, तेचायला...मग पुढं


तुळश्या : मग काय फाट्यापासून कवाच्या कव्हा दवाखान्याची गाडी आली, पर त्याच्यातय दवाखान्यात जायच्या आधी पोर बाळंतीण झाली...
दाम्या : लय अवघडे ...
तुळश्या : मग त काय, कव्हाय आपलच मराणं हाय... 


(तेवढ्यात ग्रामपंचायत शिपाई दवंडी देताना, सगळ्यांनी हाफीसजवळ या)


धन्या : दाम्या, चला बघून काय तं
संत्या : भग्या, चाल...
(सगळेजण हाफीसपाशी जमा होतात)
शिपाई : हे बघा उद्या आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन हाये, त्यामुळं समद्या ला झेंडे वाटप व्हनार आहे, तालुक्यावरून साहेब आलेत ते माहिती देतील.


संत्या : काय आता नवीनच
तान्या : अरे समद्या ला झेंडे वाटणारेत फेरी काढायला...
भग्या : आपण का लाने का? प्रभात फेरी काढायला...


(तेवढ्यात बोलायला लागतात)
साहेब : ऐका ऐका, यंदा आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार घरोघरी तिरंगा फडकविण्यात येणार आहे. प्रत्येकाने हा झेंडा घेऊन जायचा आहे. 


(अख्खा गाव जमा झाला असल्याने मला द्या मला द्या अशी गर्दी करतात) 


शिपाई : थांबा थांबा, गर्दी करू नका, एकएकाने या पहिल्यांदा पैसे जमा करा, मग झेंडा घेऊन जा...


(शिपायाने अस सांगताच सगळी गर्दी कमी होऊन जाते, अनेकजण घेतात, तर काहीजण घरी निघून जातात)


दाम्या : तुळश्या, चल, जाऊदे, नसला तर नसला झेंडा 
तुळश्या : हा, चल.. 
संत्या : चल अपुनबी


(तेवढ्यात तुका पाटलाचा आवाज) 
तुका पाटील : अहो, साहेब, तालुक्यावरून आलात ना! गाडीनं आला की कस! 
साहेब : हो गाडीनचं आलो, त्या फाट्यापासून पायी आलो, रस्ता नव्हता न गाडीला! 
तुका पाटील : मग आम्हीतर गेली 75 वर्ष असच करतुया! अन तुम्हाला आज बर सुचलं
साहेब : ह आता शासनाचा आदेश म्हंटल्यावर यावं लागतंय
तुका पाटील : का या आधी येत नव्हता व्हय, शासनाचा आदेश?
साहेब : अहो, आमचं काम हाय, शासन आदेश पाळण!


तुका पाटील : मग याआधी शासन येतच नव्हता व्हय...आजय आम्ही नदी उतरून तालुका गाठतोय, आजारी माणसाला डोली करून नेतोय, आम्ही कव्हा स्वातंत्र्य व्हनार, ओ साहेब...
संत्या : व्हय तर, चॅनल वाल्यानी पुराच्या पाण्याचा विडिओ टाकला, तर म्हण ही लोकच अस करत्यात, अन शासनाला तरास देत्यात, खरं म्हंजी हे तुम्हीच कराया भाग पाडल आम्हाला, नैतर तुम्ही येत नसत्यात आमच्या पातूर...


तुका पाटील : व्हय तर, आता झेंडा तर मग घरबी द्या म्हणावं... 
साहेब : हे बघा काका, तुमचं अगदी बरोबर, आमचे हात बांधलेले असतात...
तुका पाटील  : अहो साहेब, समदं खरंय, हा आमचा बी स्वातंत्र्य दिन हाय, पण शासनानं आम्हाला गिणतीत धराव, एवढीच अपेक्षा, बाकी काय... न्हायतर आमच्या पिढ्यान पिढ्या असच जगत आलोया....आता यापुढ 'आम्ही भारताचे लोक' म्हणून जगत राहू.... घ्यारं समद्यानी झेंडे घ्या...स्वातंत्र्य दिन जोरात साजरा करू....


(सगळे गावकरी तिरंगा हातात घेऊन अभिमानानं मिरवत घराकडं जातात....).