हिंदुस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशाच्या पूर्वेकडचा देश म्हणजे बांगलादेश. ज्याची मुस्लिम बहुल ही ओळख. याच बांगलादेशात नुकतीच हिंदूची 65 हून अधिक घरं जाळण्यात आली. जमात-ए-इस्लामीच्या लोकांनी ही घरं जाळली होती, अशी माहिती आहे. रंगपूरमध्ये ही घटना घडली.
यानंतर हिंदूंवरच्या अत्याचाराचा जगभरात निषेध नोंदवला गेला. भारताने याबाबत अधिकृतपणे भूमिका मांडावी अशी मागणी जोर धरु लागली. जगभरात कदाचित पहिल्यांदाच हिंदूवर झालेल्या हल्ल्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला गेला. यामध्ये मुख्य मुद्दा असा उपस्थित होतोय, तो म्हणजे भारताच्या शेजारी असलेल्या राष्ट्रांमध्ये अल्पसंख्याक असलेले हिंदू हे खरंच सुरक्षित आहेत का? याची कारणमीमांसा करायची झाल्यास, काही आकडेवारी देखील समोर ठेवता येऊ शकते.
गेल्या नऊ वर्षांत बांगलादेशात हिंदूंवर थोडेथोडके नव्हे तर तब्बल 3 हजार 600 हल्ले झाले. शिवाय 1990, 1995, 1999, 2002 या वर्षांत मोठ्या दंगली झाल्या होत्या. ज्यात हिंदूंना लक्ष्य करण्यात आलं होतं बांगलादेशाच्या इतिहासात 1971 मध्ये हिंदूंवर सर्वाधिक अत्याचार झाले. बांगलादेश मुक्ती संग्रामादरम्यान पाकिस्तानी लष्कराने हिंदूंची गावच्यागावं उद्ध्वस्त केली गेली. एका अहवालानुसार त्यावेळी 30 लाखांहून अधिक हिंदूंचा नरसंहार झाला होता. बांगलादेश ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक नुसार हिंदूच्या संख्येत कशी घट झालीय हे कळू शकत.
वर्ष हिंदूंच्या संख्येतील घट
1974 13.5 टक्के
1981 12.1 टक्के
1991 10.5 टक्के
2001 9.3 टक्के
2011 8.5 टक्के
2021 6.5 टक्केच
सध्याच्या मितीला बांगलादेशात केवळ 6.5 टक्के इतकाच हिंदूंचा टक्का आहे. ढाका विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अबुल बरकत यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीवर लिहिलेलं एक पुस्तक 2016 मध्ये प्रसिद्ध झालं होतं. अबुल यांनी संशोधन करून हे पुस्तक लिहिलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार दररोज सरासरी 632 हिंदू बांगलादेश सोडून दुसऱ्या देशांत आसरा घेण्यासाठी जात आहेत. त्यामुळे येत्या तीन दशकांमध्ये म्हणजे 2050 पर्यंत बांगलादेशात हिंदू नसतील. बांगलादेशात एवढी भीषण परिस्थिती निर्माण होण्यामागे तिथे कट्टर मुस्लिमांचं वर्चस्व वाढणं हे कारण आहे. कट्टर मुस्लीम एकत्रितपणे अल्पसंख्य हिंदूवर हल्ले करतायेत असं त्याचं म्हणणं आहे.
पाकिस्तानात याहून परिस्थिती गंभीर आहे. कारण पाकिस्तानात तर हिंदू 1 ते 2 टक्काच उरला आहे. भारत-पाकिस्तान फाळणी आधी पाकिस्तानात हिंदूचा टक्का 24 इतका होता. पण 1998 च्या जनगणनेनुसार ही संख्या केवळ 1.6 टक्के इतकीच आहे. बाकीचे 15 टक्के कुठे गेले याबाबत स्पष्टता नाही ही गंभीर बाब. विश्लेषकांच्या मते फाळणीनंतर हिंदूना तिथे जीवन जगणं फारच कठीण झालं, जोर जबरदस्तीने धर्मांतरण हे आजही आहे सुरू आहे. अशा अनेक बातम्या समोर आल्या आहे. लेकी-सुनांवर अनन्वित अत्याचार अजूनही सुरु आहेच. सहज गुगल सर्च केलं तर हा सगळा डेटा समोर येतो.
पाकिस्तानात तर दिवसाढवळ्या मंदिरं, समाधींची उघड उघड तोडफोड, धर्मांतरणाची वाढती प्रकरणं यामुळे तिथला हिंदू समाज हा दहशतीत जगतो आहे. पाकिस्तानमध्ये 365 मंदिरे आहेत. यापैकी केवळ 13 मंदिरांची देखभाल केली जाते. तर 65 धार्मिकस्थळांचा हक्क हिंदू समाजाकडे आहे. उर्वरित 287 धार्मिक स्थळं जमीन माफियांकडे आहेत. अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांचे संवर्धन करण्यात इक्विटी ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड अयशस्वी ठरलं असून, अल्पसंख्याकांची संपत्ती हडपण्याकडे त्याचं लक्ष असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या अहवालात ही बाब उघडकीस आली आहे.
दरम्यान एकीकडे या सगळ्या गोष्टी होत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर धर्माच्या नावाखाली याचं राजकारणही होतंय. अत्याचाराला कंटाळून आजही मोठ्या प्रमाणात हिंदू आणि शीख सीमा रेखा ओलांडून भारतात येत आहेत. यातूनच कुठेतरी स्थलांतरित भारतात बनावट कागदपत्रांद्वारे प्रवेश करतात आणि इथेच सीएए कायद्याचं महत्त्वं अधोरेखित होतं. पण मुद्दा असा आहे की अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर शीखांना धोका निर्माण झाला, तर इथे भारतात काश्मीरमधल्या हिंदूचं पलायन सोबतच चीन आणि पाकिस्तान यांनी हिंदुस्थान विरोधात सतत हायब्रीड पद्धतीने पुकारलेलं युद्ध हे सगळं थांबणार तरी कधी? आणि थांबवणार तरी कोण?
कारण पाकिस्तान असो वा बांगलादेश हिंदूंवर होणारे अत्याचार हे तिथली हिंदू लोकसंख्या घटण्यामागचं प्रमुख कारण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणून बांगलादेश आणि पाकिस्तान सरकारवर कठोर पावले उचलायला लावणं गरजेचं आहे !