2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी कंबर कसलीय. देशातील सर्व मोदी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुरु केलाय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांचा रथ रोखल्यानं विरोधी पक्षांना एक प्रकारे बळ मिळालंय. नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं पण त्यात काँग्रेसचा सदस्य उपस्थित नव्हता. प्रादेशिक पक्ष त्या त्या राज्यात भक्कम आहेत पण देशपातळीवर अजूनही भाजपनंतर काँग्रेसच मोठा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची एकी होऊच शकत नाही. 20 ऑगस्टला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधकांची एक बैठक आयोजित केलीय. एकूणच काँग्रेसनं 2024 ची तयारी मोठया प्रमाणावर सुरु केली आहे.
पण आज देशभरात काँग्रेसची स्थिती फार चांगली नाही. लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला प्रचंड पराभव स्वीकाराला लागला आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत राहुल गांधी यांनाही त्यांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत स्मृती इराणींकडून पराभव पत्करावा लागला होता. वायनाडमध्ये ते जिंकले म्हणून निदान संसदेत तरी पोहोचले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती चांगली नसल्याने त्यांनी राहुल गांधींकडे अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय घेतला होता. राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारले पण 2019 ला लोकसभेत झालेल्या पराभवामुळे त्यांनी अध्यक्षपद सोडले. आता तर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीच राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यास विरोध केला आहे. अध्यक्षपदासाठी निवडणुका व्हाव्यात अशी मागणी या नेत्यांनी केली आहे आणि याला कारण ठरलंय देशभरात असलेली राहुल गांधींची इमेज.
राहुल गांधी यांनी आज या सगळ्यातून बाहेर येऊन, कात टाकून पुन्हा आजी इंदिरा गांधीप्रमाणे उभे राहण्याची गरज आहे. तसं झालं तरच काँग्रेसची स्थिती सुधारू शकते. आज काँग्रेसची देशात जी अवस्था आहे त्यापेक्षा अत्यंत वाईट अवस्था 1977 मध्ये इंदिरा गांधींची होती. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली आणि त्या देशातील जनतेच्या मनातून उतरल्या होत्या. 1971 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 352 जागा जिंकून सत्तेवर आली होती. पण इंदिरा गांधी यांनी निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप झाला. यामुळे इंदिरा गांधी यांची खासदारकीही अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द केली होती. विरोधी पक्षांनी हंगामा केल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशात 1975 मध्ये आणीबाणी लागू केली. जी दोन वर्ष म्हणजे 1977 पर्यंत लागू होती. त्यामुळे देशभरात इंदिरा गांधी यांच्याविरोधात वातावरण तयार झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त 153 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत इंदिरा गांधी, संजय गांधी यांचाही पराभव झाला होता. जनता पार्टी सत्तेवर आली पण त्याना सत्ता राबवता आली नाही. रुपयाची किंमतच कमी होत होती. संप होत होते, पगारवाढीची मागणी केली जात होती. अर्थव्यवस्था बिघडली होती. 1980 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. इंदिरा गांधी यांनी याच गोष्टीवर भर दिला आणि ‘आधी रोटी खाएंगे, इंदिरा को बुलाएंगे’ आणि ‘चुनिए उन्हें, जो सरकार चला सकते हैं’ घोषणा तयार केल्या. या घोषणांचा निवडणुकीत सकारात्मक परिणाम झाला. यासोबतच इंदिरा गांधी यांनी जातीय व्होट बँक तयार करण्याचाही प्रयत्न केला. ‘इंदिरा तेरे अभाव में हरिजन मारे जाते हैं’ घोषणा यासाठीच देण्यात आल्या. मुसलमानांना एकत्र करण्यासाठी संजय गांधी यांनी नस बंदीबाबतच्या भूमिकेबाबत जाहीर माफी मागितली. या गोष्टींमुळे जनतेच्या मनातून उतरलेल्या इंदिरा गांधी यांची प्रतिमा पुन्हा एकदा सुधारली आणि 1980 च्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी 353 जागा जिंकल्या. आणि पुन्हा एकदा सत्ता प्राप्त करून कणखर महिला म्हणून इंदिरा गांधी राजकीय पटलावर आल्या.
हे यश प्राप्त करण्यापूर्वी इंदिरा गांधी यांनी अत्यंत कठोर निर्णय घेऊन काम न करणाऱ्या काँग्रेसच्या 100 पेक्षा जास्त खासदारांना बाहेरचा रस्ता दाखवला. केवळ 54 खासदार सोबत घेऊन इंदिरा गांधींनी देश पिंजून काढला आणि पुन्हा सत्ता हस्तगत केली. आज राहुल गांधी यांनाही हेच करण्याची आवश्यकता आहे. जे नेते काँग्रेसला जड जात आहेत त्यांची हाजी हाजी करण्यापेक्षा कणखरपणा दाखवून त्यांनी काँग्रेसला पुन्हा जुने वैभव प्राप्त करून दिले पाहिजे. पण यात सगळ्यात मोठी अडचण आहे राहुल गांधी यांची इमेज. इंदिरा गांधींच्या करिश्म्याप्रमाणे राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या. अन्य कोणत्याही नेत्यामध्ये तो करिश्मा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकेल असा नेता आज काँग्रेसमध्येच काय देशभरातील कुठल्याही पक्षात नाही. सर्व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडू लागले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत ज्या शरद पवारांना गुरु मानतात त्यांच्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे नेतृत्व करावे असे त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्यासह चंद्राबाबू नायडूसह अनेक नेत्यांनाही पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत.
काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेते कॉंग्रेस नेतृत्वावर नाराज आहेत. राहुल गांधी यांचे अनेक विश्वासू त्यांना सोडून गेलेत. विशेष म्हणजे राहुल गांधींबाबत जनतेला जराही सहानुभूती नाही. त्यांच्याकडे इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे इच्छाशक्तीही नाही. तेव्हा इंदिरा गांधींकडे 54 खासदार होते .आज राहुल गांधींकडे 50 च्या आसपास खासदार आहेत. मात्र प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागलेली असल्याने राहुल गांधींना त्यांचाही सामना करावा लागणार आहे. राहुल गांधी आज विविध विषयांवर देश पिंजून काढत आहेत. जर त्यांनी आजी इंदिरा गांधीप्रमाणे कठोर निर्णय घेतले तर काँग्रेसला यश मिळू शकेल असे म्हटले तर चूक ठरणार नाही.