जपान म्हटले की डोळ्यासमोर सफेद आणि गुलाबी फुलांनी डवरलेली झाडे आणि तेथील सकुरा फेस्टिव्हलची आठवण येते. त्याबरोबर लगेचच बुलेट ट्रेनही आठवते. भारतात जी पहिली बुलेट ट्रेन तयार होतेय त्यासाठी जपानच आपल्याला मदत करीत आहे. जपानमधील टोकियो शहर जगातील एक महागडे शहर म्हणून ओळखले जाते. सतत भूकंपाचे धोके जाणवत असले तरी सर्व इमारती भूकंपरोधी असल्याने येथे त्याची कधी जाणीवही होत नाही. येथील जनता प्रत्येक क्षण समरसून जगते. अत्यंत स्वच्छ, टापटीप आणि समोरच्या मदत करण्यास नेहमी तयार असणारे नागरिक ही जपानची ओळख. सुभाषचंद्र बोस यांचे जपानमध्ये असलेले स्मृतीस्थळ, जपानी नागरिकांना सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत असलेली आपुलकीही येथे पाहायला मिळते. याच जपानची आणखी एक ओळख म्हणजे येथील जनतेचे चित्रपटांप्रती असलेले प्रेम. जगातील कोणत्याही भाषेतील चित्रपट चांगला असेल तर तो येथील प्रेक्षक डोक्यावर उचलतोच. अनेक भारतीय चित्रपट, कलाकार जपानमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामध्ये रजनीकांतचे नाव फार वरच्या क्रमांकावर आहे. आज हा सगळा इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे ऋतिक रोशनचा चित्रपट ‘सुपर 30’.


2019 मध्ये ऋतिक रोशन अभिनीत ‘सुपर 30’ नावाचा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला होता. गोरगरीब मुलांना आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देणारे आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित असा हा चित्रपट होता. भारतात या चित्रपटाने जवळ जवळ 200 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतला होता. आता आज पुन्हा या चित्रपटाविषयी लिहिण्याचे कारण म्हणजे चित्रपटाची जपान वारी. भारतात रिलीज झाल्यानंतर जवळ जवळ तीन वर्षांनी म्हणजे 23 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट जपानमध्ये जपानी सबटायटल्ससह रिलीज केला जाणार आहे. आतापर्यंत हिंदी चित्रपट युरोपच्या देशात मोठ्या प्रमाणावर रिलीज केले जात होते आणि ते चांगला व्यवसायही करीत असत. त्यानंतर भारतीय चित्रपटांनी चीनकडे मोहरा वळवला होता. त्यानंतर भारतीय चित्रपटांनी जपानकडे मोहरा वळवला होता.


1997 मध्ये शाहरुख खान अभिनीत ‘राजू बन गया जंटलमॅन’ हा जपानमध्ये रिलीज होणारा पहिला हिंदी चित्रपट. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1998  मध्ये रजनीकांत अभिनीत ‘मुथू’ चित्रपट जपानमध्ये रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट जपानमध्ये सुपरडुपर हिट ठरला होता. 100 दिवस हा चित्रपट जपानमधील चित्रपटगृहामध्ये सुरु होता. त्यानंतर जपानमध्ये रजनीकांतची क्रेज निर्माण झाली होती जी अजूनही आहे. काही वर्षांपूर्वी मी जपानचा दौरा केला होता. तेव्हा तेथील काही लोकांशी चित्रपटाविषयी बोलणे केले असता त्यांनी रजनीकांतचे नाव आवर्जून घेतले होते. 2002 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’जपानमधील 60 चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता. रजनीकांतचे तर जवळ जवळ सगळेच चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित केले जातात. आमिर खानचा ‘धूम 3’ संपूर्ण जपानमध्ये रिलीज करण्यात आला होता. तर आमिरच्याच ‘थ्री इडियट’ चित्रपटाची जपान अकेडमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीत निवड करण्यात आली होती.


 जपानमध्ये आतापर्यंत साधारणतः 100 च्या आसपास हिंदी आणि 25 च्या आसपास तामिळ, तेलुगु चित्रपट प्रदर्शित झाले असतील. यात श्रीदेवीचा ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘बजरंगी भाईजान’, ‘केसरी’, ‘संजू’, रजनीकांतचा ‘2.0’, ‘पॅडमॅन’, ‘हिंदी मीडियम’, ‘गली बॉय’, ‘अंधाधुन’, ‘ओम शांती ओम’ या चित्रपटांचा समावेश आहे. पण यापैकी फार कमी चित्रपट जपान बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यात यशस्वी ठरले होते.


जपान हा जगातला एक महागडा देश म्हणून ओळखला जातो. तेथील करन्सीला येन म्हटले जाते. येनची किंमत भारतीय रुपयापेक्षा फार कमी आहे. तेथे चित्रपटाचे शूटिंग करणे फार महाग असते. त्यामुळे हॉलिवूडवगळता अन्य दुसऱ्या कोणत्याही देशातील निर्माते तेथे शूटिंगसाठी जात नाहीत. काही हिंदी चित्रपटांचे शूटिंग जपानमध्ये करण्यात आले होते. यात जॉय मुखर्जी, आशा पारेखचा ‘लव्ह इन टोकियो’ सगळ्यांनाच आठवत असेल. यातील सायोनारा सायोनारा गाणे तर लगेचच ओठवर येते. राजेंद्रकुमार, सायरा बानूचा ‘अमन’. धर्मेंद्रचा सुपरहिट असलेल्या ‘आंखे’ चित्रपटातील ‘मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी’ या गाण्याचे आणि चित्रपटातील काही दृश्यांचे शूटिंगही जपानमध्ये करण्यात आले होते. त्यानंतर ‘रब ने बना दी जोडी’,‘यंगिस्तान’,'तमाशा' अशाही काही चित्रपटांचे शूटिंग जपानमध्ये झालेले आहे. जपान सरकारने बाहेरच्या देशातील चित्रपट निर्मात्यांना शूटिंगसाठी सवलती दिल्या तरीही तेथे शूटिंग करणे खूप महागडे असते.


जपान फिल्म इंडस्ट्रीची माहिती फार कमी लोकांना आहे. जपानची फिल्म इंडस्ट्री जगातील सगळ्यात जुनी आणि मोठी इंडस्ट्री आहे. जपानी फिल्म इंडस्ट्रीला 100 वर्षांपेक्षा जास्तीचा इतिहास आहे. जगात जपान फिल्म इंडस्ट्री चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर हॉलिवूड, दुसऱ्या क्रमांकावर बॉलिवूड आणि तिसऱ्या क्रमांकावर चीनी फिल्म इंडस्ट्री आहे. जपानमध्ये 3648  स्क्रीन्स असून येथील तिकिटाचे दरही भारतीय रुपयांमध्ये 1100 रुपयांच्या आसपास आहेत. असे असले तरी जपानमध्ये चित्रपट हाऊसफुल जातात. जपानही भारतीय चित्रपटांसाठी एक मोठे मार्केट झाला आहे. त्यामुळेच तेथे हिंदी चित्रपट रिलीज करण्याकडे भारतीय निर्मात्यांचा कल वाढलाय हे ‘सुपर 30’च्या निमित्ताने पुन्हा दिसून आले.