BLOG :  2018 मध्ये आमिर खानचा ठग्ज ऑफ हिंदुस्तान प्रदर्शित झाला होता. भव्य बजेटच्या या चित्रपटात इंग्रजांविरुद्धची लढाई दाखवण्यात आली होती. अमिताभ बच्चन यांचीही या चित्रपटात महत्वाची भूमिका होती. चित्रपटाचे प्रचंड प्रमोशन करण्यात आले होते. पण प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तेव्हा या चित्रपटाला कोणीही बायकॉट केले नव्हते. तरीही हा चित्रपट फ्लॉप झाला होता. याचे कारण होते चित्रपटाचे कथानक आणि सादरीकरण. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माउथ पब्लिसिटीमुळे जो प्रेक्षक चित्रपट पाहायला जाण्याचे ठरवत होता तोसुद्धा गेला नाही आणि निर्माते यशराज फिल्म्सला मोठे नुकसान सहन करावे लागले.


जवळपास चार वर्षानंतर आमिर खान लाल सिंह चड्ढा घेऊन आला. हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट फॉरेस्ट गम्पचा हा चित्रपट अधिकृत हिंदी रिमेक आहे. प्रख्यात अभिनेता अतुल कुलकर्णीने याचे हिंदी रुपांतर केले होते. आमिरने या चित्रपटाच्या रिमेकचे अधिकार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. जवळ जवळ आठ वर्ष त्याचे प्रयत्न सुरु होते, असे म्हटले जाते. ठग्ज ऑफ हिंदुस्तान प्रदर्शित झाल्यानंतर आमिरने लाल सिंह चड्ढाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. खरं तर 2020 मध्येच हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता. पण कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबले आणि तो आता प्रदर्शित झाला. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्पन्नाचे विक्रम करेल असे म्हटले जात होते. त्यातच आमिरची आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव यांचे वक्तव्य, करीना कपूरने प्रेक्षकांबाबत केलेले वक्तव्य यामुळे देशभरात सोशल मीडियावर लाल सिंह चड्ढा बॉयकॉट करण्याची मोहीम सुरु झाली. आणि चित्रपट प्रदर्शित होताच फ्लॉप ठरला.


पण खरंच सोशल मीडियावर चित्रपटाला बायकॉट केल्याने चित्रपट फ्लॉप झाला का? तर याचे उत्तर माझ्या मते तर नाही असेच आहे. याचे कारण म्हणजे, भारतीय प्रेक्षक हा खूप हुशार आहे. चित्रपटाचे केवळ पोस्टर पाहून तो चित्रपट कसा असेल याचा अंदाज घेतो आणि विशेष म्हणजे बहुतेक वेळा त्यांचा अंदाज हा खरा ठरतो. लाल सिंह चड्ढाची गोष्ट प्रेक्षकांना अगोदरच ठाऊक झाली होती. त्यामुळे चित्रपटाबाबत एक प्रकारची नकारात्मकता अगोदरच तयार झाली होती आणि त्याचा फटका चित्रपटाला बसला असे माझे स्पष्ट मत आहे. यात बायकॉट काहीही संबंध नाही. चित्रपट जरी बॉयकॉट केला तरी आमिरच्या प्रशंसकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तो नेहमी काहीतरी वेगळे करतो असा त्यांना ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच ते आमिरचे चित्रपट पाहतातच. सोशल मीडियावरील बायकॉटच्या मोहिमेनंतर आमिरने प्रेक्षकांना बायकॉट करू नका असे आवाहन केले होते. बायकॉटची मोहिम ही त्याच्या प्रचाराचाच एक भाग होती असेही बॉलिवूडमध्ये म्हटले जात आहे. बॅड पब्लिसिटी ऑल्वेज गेन मूव्ही असे म्हटले जाते. पैसे खर्च न करता संपूर्ण देशभरात फुकटची पब्लिसिटी होते आणि चित्रपटात काय आहे हे पाहायला प्रेक्षक येतातच असा बॉलिवूड निर्मात्यांना विश्वास आहे. मात्र प्रत्येक वेळेला हे खरे ठरतेच असे नाही.


आमिर खानचाच राजू हिरानी दिग्दर्शित पीकेही रिलीजपूर्वी वादात अडकला होता. धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आरोप चित्रपटावर झाला होता. चित्रपटाला प्रचंड विरोध झाला होता. तरीही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने  350 कोटींचा व्यवसाय केला होता.


आमिरचा दंगलही वादात सापडला होता. आणि त्यावेळी कारण ठरले होते त्याची तत्कालीन पत्नी किरण रावने केलेले वक्तव्य. भारत राहाण्यासाठी योग्य देश नसल्याचे तिने म्हटले होते. यावरून देशभरात गदारोळ माजला होता. आमिर खानला सारवासारव करावी लागली होती. चित्रपटावर बायकॉट करावे असेही म्हटले जात होते. पण याचा काहीही उपयोग न होता दंगल बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा व्यवसाय करण्यात यशस्वी ठरला होता.


संजय लीला भंसाळीचा पद्मावतही असाच वादात सापडला होता. चित्रपटाच्या नावाला राजपूत समाजाने विरोध केल्याने संजय लीला भंसाळीने चित्रपटाचे नाव पद्मावतीवरून पद्मावत असे केले. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आणि त्याने  300 कोटींचा गल्ला जमवला.


त्यामुळे बायकॉट मोहिमेमुळे चित्रपट फ्लॉप होतोच असे नाही. चित्रपटात दम असेल तर तो सर्व संकटांवर मात करीत यशाच्या घोड्यावर स्वार होतो. लाल सिंह चड्ढाला मोठा वीकेंड मिळून, 4 हजार पेक्षा जास्त चित्रपटगृहात शेकडो शो लावूनही, तिकीट दर 200 च्या वर असूनही 180 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत फक्त 40 कोटींचाच व्यवसाय केला आहे. आमिरचा हा आतापर्यंतचा कलेक्शनच्या बाबतीत अत्यंत सुमार चित्रपट म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि यामागे केवळ  बायकॉट हे कारण नाही तर चित्रपटाचा सुमार दर्जा, आमिरच्या अभिनयातील तोच तोचपणा हे आहे असे म्हटले तर चूक ठरणार नाही. स्वतः आमिरनेही एका मुलाखतीत म्हटले होते की, सोशल मीडियावर काय चालू आहे त्याची मला माहिती नाही. त्यामुळे  बायकॉटमुळे चित्रपट फ्लॉप झाला असे म्हणणे चूक आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवे.