नमस्कार,


महाराष्ट्र शासनाने स्व. लता दीदींना दिलेल्या झेड+ सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग म्हणून सुमारे एक वर्षापेक्षा जास्त काळ माझी नेमणूक प्रभू कुंजवर झाली. लता दीदींचा विषेश सुरक्षा अधीकारी म्हणून जरी मी कर्तव्यावर असलो तरी तो संपूर्ण काळ कर्तव्या पलीकडील स्वार्थाने पूर्ण केला. त्याही कालावधीत दीदींच्या सानिध्यात अधीकाधीक काळ कसा घालवता येईल याच्या प्रयत्नात मी असायचो. दीदींशी झालेले संभाषण म्हणजे प्रत्यक्ष सरस्वतीशी संवाद वाटायचा कारण आपण कधी सरस्स्वतीला पाहिलेले नाही. दीदी बरोबर अनेक गाण्याच्या ध्वनी मुद्रणाच्या साठी एकत्र प्रवास करतांना दीदींशी मोकळा संवाद होत होता. त्यावेळी मी एकदा दीदींचा मुड बघून मी 'प्रेम स्वरुन आई - वात्सल्य सिंधू आई' या गाण्याचा विषय काढला त्या वेळी दीदींनी देखील ते गाणे त्यांच्याही आवडींचे असल्याचे सांगितले. माझ्या आईचे नाव 'सिंधू' आहे हे जेव्हा मी दीदींना सांगितले त्यावेळी दीदी दिल खुलास हसल्या.


दीदींच्या संगितातील कारकिर्दीस 50 वर्षे पूर्ण होत असताना, माहारााष्ट्र शासनाने दीदीचा सार्वजनिक सत्कार दादरच्या शिवतीर्थावर ठेवला होता. शिवतीर्थावर जनसागर लोटला होता. संध्याकाळी सहाची वेळ ठरली होती परंतू असंख्य संगित प्रेमी त्या आधीच जागा आडवून बसले होते. विषेश सुरक्षा विभागाचे पथक दीदींना घेउन प्रभु कुंजवारून निघाले त्यावेळी नियंत्रण कक्षा कडून एक बिनतारी संदेश आला- " मोठ्या प्रमाणावार वादळी पावसाची शक्यता आसल्याने सर्व खबरदारी घेउनच निघावे. त्यावेळी दीदींचा ताफा सायरन वाजवत हाजिअलीपर्यंत पोहचला होता आणि त्याचवेळी रिम झिम पावसाला सुरुवात झाली होती. शिव तीर्थावार दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त श्री श्रिकांत बापट हे मोर्चा सांभाळून होते. वरळी नाक्यापर्यंत ताफा आला त्यावेळी गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. ढगांच्या गडगडाटा मध्येच सायरनचा आवाज फिका पडत होता. दीदींच्या गाडीत आम्ही काळजीत बसलो होतो. तणावपूर्ण शांततेचा भंग करीत मी नियंत्रण कक्षाला बिनतारी यंत्रणेद्वारे शिवतीर्थावरील परिस्थिती विषयी विचारणा केली. खरतर पाउस आहे किंवा नाही याची माहिती अपेक्षित होती परंतू आमचा संवाद पूर्ण होण्यापूर्वीच नियंत्रण कक्षेकडून संदेश मिळाला की मुखमंत्री श्री सुधाकर नाईक कार्यक्रम स्थळी पोहोचले आहेत. आमची उत्सुकता वाढली होती परंतू दीदी मात्र शांत होत्या. त्यानंतर मात्र आमचा ताफा भरधाव वेगाने  शिवतीर्थावरच्या दिशेने निघाला आणि काही वेळातच आम्ही स्वातंत्र्य वीर सावरकर स्मारकाच्या समोरील खास प्रवेश दाराने शिव तीर्थावर पोहोचलो. नियंत्रण कक्षावरील संदेशावरुन प्रत्यक्ष होत असलेली घाव पळ समजून येत होती. स्वत: मुख्यमंत्री श्री सुधाकर नाईक व पोलीस आयुक्त श्री श्रिकांत बापट दिदिच्या स्वागताला हजर होते. चाहत्यांनी दिर्दीना गराडा घातला. आम्ही सर्वांनी आमचे मोर्चे सांभाळीत दिदीना व्यासपीठावर नेले आणि प्रचंड टाळ्यांच्या गडगडाटात दीदींचे स्वागत झाले आणि औपचारिक कार्यक्रम सुरु झाला. स्वतः श्रीमती कविता कृष्णमूर्ती कार्यक्रमाची सुत्रे सांभाळून होत्या. हवामानाचा ईशारा विचारात घेता सर्वच औपचारिक कार्यक्रम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे सगळ्यांचा कल होता. त्यवेळी हा सर्व कार्यक्रम मुंबई दूरदर्शनाद्वारे देशभर प्रक्षेपित होत होता. दीदींना देण्यात येणारा प्रत्येक पुष्पगुच्छ आणि शाल- श्रीफळ त्यांच्या नंतर त्या माझ्या कडे देत होत्या. मुख्य मंत्री श्री सुधाकर नाईक यांनी स्व व शासनाच्या वतीने भुमिका मांडून दीदींचा शासकीय सत्कार केला. दिर्दीनी माईक सांभाळला, दीदींचे सर्व चाहते कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करीत होते कारण त्यावेळी समजले की ध्वनी यंत्रणा सोसाट्याच्या वारयाने कोलमडली होती. त्याच वेळी एक मोठी वीज शिवतीर्थावर कडाडली. काही ठीकाणी विजेच्या ठिणग्याही पडल्या. परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेउन पोलीस आयुक्त व्यासपीठावर आले.


प्रथम ते मुख्य मंत्री श्री सुधाकर नाईक यांच्या जवळ जाउन काही बोलले आणि लगेचच त्या नंतर श्री बापट दीदींकडे गेले त्यांनी परिस्थितीची जाणीव करून देत दीदींना कार्यक्रम आटोपता घेण्याची विनंती केली. क्षणभर व्यासपिठावर शांतता पसरली. मुख्य मंत्री तर दीदींच्या कडे वळून पाहत होते. दीदीची प्रतिक्रिया काय असेल या कडे सर्वांच लक्ष लागून होते. पोलीस आयुक्त दीदींच्या उत्तुंग व्यक्तीमत्वा समोर गणवेषात उभे होते तर मुर्ती लहान पण किर्ती महान अशी श्री बापट यांची ख्याती होती. त्यानंतर दीदींनी शांतता भंग केला आणि कोणतेही आढेवेढे न घेता दीदींनी माईक श्री बापट यांच्या हातात सोपविला आणि दोन्ही हात जोडून म्हणाल्या 'मी तुमच्या आझे बाहेर नाही. आम्ही पुढे सरसावलो आणि दीदींनी जिन्याच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली मुख्यमंत्री देखील दीदींबरोबर प्रवेश द्वारा जवळ आले आम्ही दीदींना सुरक्षित पणे त्यांच्या गाडीत बसविले, नमस्कार आणि शुभेच्छा स्विकारित असतांनाच ध्वनी क्षेपणावरुन एक सुचना देण्यात आली. 'मी पोलीस आयुक्त बोलतोय, आपण सर्व विदीच्या प्रेमा पोटी येथे आलात त्या बद्दल धन्यवाद. हा कार्यक्रम संपल्याचे मी घोषित करतो


आमचा ताफा शिवतीर्थावरुन प्रभू कुंज च्या दिशेन पावसाच्या सरी कापत निघाला. संपूर्ण प्रवासात दीदी शांत होत्या. आम्ही दीदींना सुरक्षित त्यांच्या घरी पोहचविले. दरवाजा बंद करण्यापूर्वी दीदींची हात जोडलेली मूर्ती सर्व काही सांगुन गेली ती आजही डोळ्यासमोर आहे. हा क्षण अविस्मरणीय ठरला. घरी जाण्यापूर्वी नियंत्रण कक्षास सर्व संदेश पाठवेले. दीदी सुरक्षित घरी पोहचल्याची खात्री नियंत्रण कक्षाने करुन घेतली आणि बिनतारी यंत्रणा विसावली. घरी पोहचण्यास उशीरच झाला होता. सर्व जण जागे होते. मी घरात येताच मोठा मुलगा आविष्कारने मला टी व्ही वर पाहिल्याचे सांगितले पण छोटा मुलगा अभिषेक मला विचारत होता दीदींनी तुमचा सत्कार का केला? का त्यांनी पुष्प गुच्छ तुम्हाला दिले? त्याच्या बाल मनातील प्रश्नांना माझ्या जवळ उत्तर नव्हते परंतू दिदींच्या सहवासातील प्रत्येक क्षण हा सत्कारच होता. त्यांच्या सहवासातील आशिर्वाद, संवाद हे आणि एक छाया चित्र नेहमीच स्मरणात राहतील. तसेच 'प्रेम स्वरूप आई- वात्सल्य सिंधू आई गाण्याच्या माध्यमाने दीदींची आई स्वरूपी प्रतिमा कायम हुदयात राहील.


धन्यवाद


अविनाश मोकाशी


माजी पोलीस अधीकारी,


महाराष्ट्र पोलीस.