श्याम सदन, गिरगाव चर्चशेजारी, मुंबई - 4. गेली अनेक वर्षे असा पत्ता लिहित होतो. ती वास्तू अलिकडेच पुनर्विकासासाठी गेली. पाडकाम जोरात सुरु आहे. त्यात चाळीचा एकेक मजला आणि मजल्यावरच्या एकेक घराचं पाडकाम सुरु आहे. पाहता पाहता आमचा मजला आणि आमचं घरही पाडण्यात आलं. आपलं काहीतरी आपल्यापासून तुटल्याची आणि सुटल्याची जाणीव मन गलबलून गेली. त्याच वेळी गेल्या चाळीस वर्षांचा माझ्या चाळीतल्या वास्तव्याचा फ्लॅशबॅक लख्खपणे समोर आला.
अगदी अलिकडे म्हणजे जानेवारीत जड अंतकरणाने आमच्या दुसऱ्या मजल्यावरच्या घरातून आम्ही बाहेर पडलेलो. म्हणजे फक्त शरीरानेच, मनाने अजूनही तिथेच घुटमळतोय. कदाचित यापुढच्या काळातही तिथेच घुटमळत राहील. माझा जन्म वरळीचा. आईबाबा दोघंही नोकरीनिमित्ताने घराबाहेर असत. आजोबांचं (वडिलांचे वडील) वय 80 च्या घरात. त्यामुळे पहिली चार वर्षे मी वरळीत आईच्या आईबाबांकडे म्हणजे आजी-आजोबा, मामाकडे राहत होतो. नंतर थेट इयत्ता पहिलीत म्हणजे गिरगावात आलो, तेव्हापासून साधारण 40 वर्षे इथेच वास्तव्य. माणसांची सवय, ओढ लागते, तसा वास्तुबद्दलही ओलावा निर्माण होतो. आधी घराला फक्त भिंती असतात, मग त्या भिंतीही बोलक्या होतात, त्या भिंतींशी नातं जडतं. लहान वयात आयुष्यातली बाराखडी जिथे बसून गिरवली ती बाहेरच्या खोलीतली लाल चुटूक लादी. तिथे अनेकदा खडू, पेन्सिलने बिरखटलेली अक्षरं, अंक. तिथे रंगलेला कॅरम, पत्त्यांचा खेळ. म्हणजे नातेवाईकांपैकी कुणी राहायला आलं की, बदाम सत्ती, मेंढी-कोटचा डाव. इतकंच काय पुढे त्याच खोलीचं क्रिकेट स्टेडियम केलंय. टीम पाडून खेळायचो. हँडल तुटलेली बॅट आणि लॉन टेनिसचा बॉल. घरातल्या घरात दोन-तीन फिल्डर आणि एक बॉलर. आरशाची दोन कपाटं, शिलाई मशीन अशा तटबंदीत क्रिकेटचा खेळ चालत असे. ते सगळं लख्ख आठवतंय. आतल्या खोलीत, म्हणजे उंबरठ्याबाजूला बसून आई-बाबांशीच रंगलेल्या गप्पांचीही मजाच न्यारी. म्हणजे तो उंबरठा सतत आपला वाटायचा, वाटतो.
आज या चाळीतल्या खोलीचा उंबरठा कायमचा ओलांडावा लागला, तेव्हा त्या दोन खोल्यांमधल्या उंबरठ्याची सोबत आठवतेय आणि आपलेपणाची घट्ट वीणही जाणवतेय. छोट्याशा बाथरुममध्ये म्हणजे (आता टॉवरमधील आलिशान घरं पाहिल्यावर तो छोटा वाटतो, तेव्हा असं काहीही मनात यायचंही नाही) आंघोळ करणं, आधी गॅसवर गरम केलेल्या पाण्याने, नंतर त्याची जागा गिझरने घेतली. पाणी गरम करण्याची साधनं बदलली, पण त्या जागेतली ऊब तशीच राहिली, राहील. दोन खोल्या असल्याने पुढचं आणि मागचं अशी दोन दारं. साहजिकच दोन गॅलऱ्या. आमच्याकडे येणारी बच्चे कंपनी याच कारणामुळे खूप आनंदात असायची. दोन्ही दारांमधून सुसाट धावायला मिळतं म्हणून. घरातूनच अगदी चौथ्या मजल्यापासून तळ मजल्यापर्यंत नजर जाईल तिथल्यांशी मारलेल्या गप्पा. हे सारं सारं कालपरवा घडल्यासारखं वाटतंय. घरात दोन खोल्यांच्या मध्यभागी माझा छोटा झोपाळाही होता. त्याचे हूक तसेच ठेवले होते. आज ते सारे क्षण हुकल्याची जाणीव होतेय. आता फक्त आठवणींच्या झुल्यावरच झुलणं हातात आहे.
संवादाची माध्यमं विकसित होत गेल्याचा प्रवास आपल्या साऱ्यांनाच अवगत आहे. आज माणसागणिक दोन तर कधी तीन मोबाईल असतात. पूर्वी लँडलाईन फोन ही चैन होती. म्हणजे आमच्या चाळीतही मी शाळेत असण्याच्या काळात म्हणजे 80-90 च्या दशकात पहिल्या मजल्यावर एका घरी लँडलाईन फोन होता. तिथे आमचा फोन येत असे, मग ते आम्हाला चाळीच्या गॅलरीत येऊन हाक मारुन फोन आल्याची वर्दी देत. पुढे आमच्याकडेही लँडलाईन आला. नंतर प्रत्येकाकडे मोबाईल. आज फाईव्ह जीच्या युगात त्या लँडलाईनची बेल अजूनही कानात रुंजी घालतेय. गुणगुणतेय म्हणा ना. या घराने पाहिलेली अशी अनेक स्थित्यंतरं आज आठवणींच्या पडद्यावर उमटतायत. प्रत्येक क्षणासकट. फोनशिवाय टीव्ही ही त्या काळी चैनीची वस्तू होती. चाळीत किंवा मजल्यावर एखादा टीव्ही असायचा. सर्व शेजारी मिळून एका किंवा दोन घरांमध्ये मालिका पाहत असत. तर कधी घराचं थिएटर तर कधी स्टेडियम करणारी मॅच एकत्र पाहण्याचा आनंदही वेगळाच. मी शेजाऱ्यांकडे जाऊन ‘ही मॅन’ आणि ‘जायंट रॉबर्ट’सारख्या मालिका, अनेक क्रिकेट सामने पाहिल्याचं आठवतंय. पुढे काही काळाने आमच्या घरात टीव्ही आला ओनिडाचा. दोन शिंगवालं कॅरेक्टर होतं ती जाहिरात तुम्हालाही आठवत असेल. त्याची कॅचलाईनही लक्षात आहे. ‘नेबर्स एन्व्ही ओनर्स प्राईड’. ब्लॅक अँड व्हाईट आणि नंतर कलर टीव्ही आला आणि आयुष्यही रंगीत करुन गेला.
फ्रीज नामक वस्तूशीही पहिली भेट याच घरातली. म्हणजे आता डबल किंवा ट्रीपल डोअर फ्रीज अनेक घरांमध्ये असतात. तेव्हा फ्रीज ही देखील कुतुहलाची, अप्रूप वाटणारी बाब होती. पहिला गोदरेजचा फ्रीज आला पांढऱ्या रंगाचा. तेव्हा अन्नपदार्थांना थंडावा देणाऱ्या त्या फ्रीजची ही आठवण मनालाही सुखद गारवा देऊन जाणारी.
हे सगळे क्षण एखाद्या पुस्तकाच्या शेल्फमध्ये पुस्तक कशी ओळीने लावून ठेवलेली असतात, तसे मनाच्या शेल्फमध्ये ओळीने रचून ठेवलेत. बांधून ठेवलेत म्हणा ना. आज ती वास्तू पाडण्यात आली असताना एखाद्या धरणाचे दरवाजे उघडून पाणी जसं ओव्हर फ्लो होतं ना, तसे मनाचा बांध ओलांडून हे सगळे क्षण भरभरून बाहेर आले. काही वर्षात नव्या वास्तु जाऊ. तेव्हाही या क्षणांची दौलत घेऊनच. ते घर या क्षणांच्या आठवणींचं तोरण घेऊनच आणखी सजेल. कारण, हे फक्त क्षण नाहीत. तर, आमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा सण करणाऱ्या या मोहरा आहेत. ज्याने आयुष्य, जगणं श्रीमंत केलंय. हे क्षण कापरासारखे आरोग्य निकोप ठेवणारे आणि अत्तरासारखे सुगंधित करणारेही