आपल्या अभिनय आणि गायनाने संगीत रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने नाट्य, संगीतसृष्टीचं मोठं नुकसान झालंय. ज्ञानेश पेंढारकर आणि श्रीरंग भावे या त्यांच्या दोन शिष्यांनी आपल्या गुरुंना वाहिलेली ही शब्दांजली.


ख्यातनाम अभिनेते, गायक ज्ञानेश पेंढारकरांना रामदास कामत यांच्याबद्दल विचारलं असता ते थेट नव्वदच्या दशकात पोहोचले. ते म्हणाले, तसा मी रामदासकाकांना लहानपणापासूनच पाहतोय. ते अण्णांकडे गाणी बसवायला येत असत. रेडिओवर नाट्यपराग कार्यक्रमात ते गायचे. त्यातील गाणी ऐकून एचएमव्हीने मग त्यांच्या गाण्यांच्या रेकॉर्डस काढल्या. पुढे 1995 नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान नाट्यपरिषदेचा पार्ल्यात कार्यक्रम होता. 'पंडितराज जगन्नाथ'चा प्रवेश होता. तेव्हा त्यांनी मला त्यामध्ये भूमिका साकारताना पाहिलं आणि तू माझ्याकडे ये, मी तुला संगीतातले बारकावे सांगतो, असं आपणहून सांगितलं. मी त्यांना काही वेळा ऑर्गनची साथही केलीय. तेव्हापासून म्हणजे जवळपास 27 वर्षांचा आमचा स्वरसहवास होता. 


अगदी महिन्याभरापूर्वी  मी भेटायला गेलो होतो. मागे मला त्यांनी जेव्हा शिकायला बोलावलं, तेव्हा मी फीबद्दल विचारलं असता ते म्हणाले, अण्णांकडे मी इतकी गाणी शिकलोय, त्यांनी मला एकदाही फीचं विचारलं नाही. आमचं कौटुंबिक नातं आहे, त्यामुळे तुझ्याकडून फी घेण्याचा प्रश्नच नाही. गाणं शिकवताना त्यांचं एक सांगणं आवर्जून असायचं. तुमच्या गळ्याप्रमाणे गा. मी तुला माझी गाणी शिकवतो. तू ती गाणी तुझ्या पद्धतीने गा. मुरक्या, ताना त्यामध्ये आणल्या, तर ते अधिक आकर्षक होईल. पण, त्यात तुझी अशी छाप असू दे.


हे बंध रेशमाचे..नाटकाची एक आठवण त्यांनी मला सांगितली. ते म्हणाले, त्या नाटकात वसंतराव देशपांडे होते. तालमीत वसंतरावांचं गाणं ऐकून मी थक्क व्हायचो. हळूहळू मी त्यांच्यासारखा गायला लागलो. एका तालमीच्या वेळी मी गात होतो. तेव्हा तालीम सुरु असतानाच अभिषेकी बुवा आले. माझं गाणं झाल्यावर बुवांनी बाजूला नेलं आणि मला म्हणाले, तू आगीशी का खेळतोस? त्यांची कॉपी करु नकोस, तुझ्यातला रामदास कामत निघून जाईल.  तुझी ओरिजिनलिटी सोडू नको. नेमका हाच संस्कार त्यांनी आमच्यातही रुजवला. ते एकदा शिकवू लागले की, 4-5 तास शिकवत राहत. तहानभूक हरपून शिकवत राहत. 1996 ते 2014 या काळामध्ये मी सातत्याने मी त्यांच्याकडून संगीताचं शिक्षण घेतलंय.


त्यांनी माझं काम पाहून दिलेली एक कॉम्प्लिमेंट मला आजही लक्षात आहे. ययाती-देवयानी नाटकातला प्रवेश गाताना माझ्या गाण्यातील एक जागा त्यांना अपेक्षित असल्याप्रमाणे आली. ते विंगेतून ऐकत होते. त्यांनी तिथूनच वाहवा असं म्हणत माझं कौतुक केलं आणि मी विंगेत आल्यावर मला कडकडून मिठी मारली. त्यांच्या त्या मिठीचा स्पर्श आजही मला जाणवतो. इतकं, आमचं नातं घट्ट होतं.


शब्द मात्रेवर करेक्ट पडले पाहिजेत. दोन मिनिटं गा, पण जे गाणं म्हणाल ते डौलदार वाटलं पाहिजे. गाताना कंजुषी नको. जीव ओतून गा. हा त्यांचा संगीतमंत्र असे.
काही जण आपली गाणी चुकीच्या पद्धतीने गातात याबद्दल त्यांनी माझ्याकडे काही वेळा खंतही व्यक्त केली, तसंच अधिक अभ्यासपूर्ण गायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ते पक्के मासेप्रेमी होते.ठरलेल्या ठिकाणाहून मासे खरेदी करून घेऊन येत. खाणं आणि गाणं या दोन्हीवर निस्सीम प्रेम असलेला व्रतस्थ कलाकार, गुरु आपल्या सगळ्यांना सोडून गेलाय. हे कधीही न भरुन येणारं नुकसान आहे.


आजच्या पिढीचा गायक श्रीरंग भावेनेही त्यांच्याकडून घेतलेल्या संगीत शिक्षणाबद्दल त्यांचं ऋण व्यक्त केलं. श्रीरंग म्हणाला, मी 2003 साली सह्याद्री महाराष्ट्र संगीत रत्न स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेच्या मेगा फायनलला पं.रामदास कामत, फैयाज, अशोक पत्की, अनिल मोहिले अशी दिग्गज मंडळी परीक्षक होती. त्या कार्यक्रमात त्यांचं 'तम निशेचा सरला'... हे गीत त्यांनी ऐकलं, आणि गाणं झाल्यावर माझ्याकडे येऊन म्हणाले, तू माझ्याकडे ये, मी तुला नक्की मार्गदर्शन करेन.  तो माझ्या संगीत कारकीर्दीतील टर्निंग पॉईंट आहे.


 नाट्यपदाची आऊटलाईन नीट गा. मग नक्षीकाम तुमचं तुम्ही करा. बेसिक शिस्त हवी,  असं त्यांचं आग्रही सांगणं असे. देवाघरचे ज्ञात कुणाला, गुंतता हृदय हे, हे आदिमा हे अंतिमा, प्रथम तुज पाहता यासारखी गाणी त्यांनी मला वन टू वन शिकवली. ती गाणी मी त्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकल्याने त्याची गोडी, खोली कळली. त्यांची बलस्थानं कळली. ज्याचा फायदा मला पुढे ती सादर करताना नेहमी होतोय.


मी त्यांच्याकडे 2004  ते 2010 जवळपास सलग जात असे. नंतरही गेल्या 10-12 वर्षांत जसं जमेल तसं मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून टिप्स घेत असे. दोन-तीन कार्यक्रमात ते खास पाहुणे होते. त्यावेळीही मी त्यांची गाणी गायलोय. त्यांच्या मुलाखतींच्या कार्यक्रमातही मी गायलोय. स्वच्छ आणि मोकळं गाण्याची सवय लावून घ्या, हे सांगतानाच आपला फिटनेस उत्तम राहावा, खाण्यापिण्याच्या सवयी नीट सांभाळाव्यात, श्वासाच्या कंट्रोलसाठी सूर्यनमस्कारच घालावेत, अशाही मौलिक बाबी त्यांनी मला आवर्जून सांगितल्यात. नाटकात उभं राहून गायचं असतं. तर तो स्टॅमिना कठीण गाणी सादर करताना टिकवण्यासाठी फिटनेस फार महत्त्वाचा आहे, हे त्यांनी नेहमी अधोरेखित केलं.


ते एअर इंडियात  वरिष्ठ पदावर होते. फ्लाईटच्या शेड्युलिंगपासून बारीकसारीक गोष्टींवर त्यांचा कंट्रोल असायचा. म्हणजे विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंगप्रमाणेच सुरांचा टेकऑफ आणि लँडिंग यावरही त्यांचं बारकाईने लक्ष असे आणि परफेक्शनही. दौरे, प्रयोग, करतानाची त्यांची शिस्त, सिन्सिअरिटी फार मोठी होती.


त्यांचा एक अनुभव सांगतो, 'धन्य ते गायनी कळा' या नाटकातील गीतं शिकण्यासाठी त्यांनी मुंबई-पुणे प्रवास सात दिवस सलग केला होता. म्हणजे सकाळी नोकरी, मग संध्याकाळी पाचच्या सुमारास पुण्याकडे प्रयाण, नऊच्या सुमारास पुणे गाठून पं.भीमसेन जोशींकडून गाण्यांचं शिक्षण. मग परत पहाटेच्या सुमारास मुंबई. तिथून दुसऱ्या दिवशी पुन्हा ड्युटी जॉईन करणे, असं वेळापत्रक त्यांनी सलग सात दिवस केलं. त्यांच्या या समर्पित वृत्तीला आपण वंदन करुया, अशा शब्दात श्रीरंगने आपल्या भावना व्यक्त केल्या.