टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत रविवारी कोहलीची ब्रिगेड विल्यमसनच्या न्यूझीलंडशी आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघाने पाकविरुद्धचे आपापले सामने गमावले असल्याने सेमी फायनल गाठण्याकरता दोघांसाठीही या सामन्यातला निकाल अस्तित्त्वाची लढाई ठरु शकतो. यासाठीच एक घमासान क्रिकेटयुद्ध या सामन्यात अपेक्षित आहे. पाकविरुद्धच्या पराभवाने घायाळ झालेला भारतीय संघ किवींची शिकार करणार का? हाच प्रश्न भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात आहे. ज्याचे उत्तर रविवारी रात्री अंदाजे 11 वाजताच्या सुमारास मिळेल.
ऑन पेपर टीमची वन टू वन तुलना केली तर दोन्ही टीम्स तगड्या आहेत. किवी टीम क्षेत्ररक्षणाच्या बाजूमध्ये काहीशी सरस वाटते. तरीही भारतीय संघातही यंगिस्तानचा भरणा असल्याने हा संघही फिल्डिंगमध्ये कमी निश्चित नाही. किवींचं आक्रमणही समतोल आहे. बोल्ट, साऊदीसारखे पेस बॉलर्स त्यांना सॅन्टनर, सोधीच्या फिरकीची साथ आहे. सॅन्टरच्या पाच फूट अकरा इंच उंचीमुळे त्याला या पिचवर चांगला बाऊन्स मिळू शकतो. जो दुबईच्या खेळपट्टीवर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यातच भारताची सुरुवातीची आक्रमक बॅटिंग लाईनअप पाहता त्यांना अडकवण्याकरता विल्यमसन पहिल्याच काही ओव्हर्समध्येच फिरकीचे जाळे टाकू शकतो. अर्थात भारताची फलंदाजी ही फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवरच लहानाची मोठी झाली असल्याने त्याचा फार बाऊ करण्याची गरज नाही. तरी फिरकी गोलंदाजांचा स्पेल हा मॅचवर इम्पॅक्ट करणारा असेल.
सलामीवीरांना इनिंगच्या सुरुवातीलाच ट्रेंट बोल्ट या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा पहिला स्पेल सांभाळावा लागेल. ट्रेंट बोल्टकडे स्विंग, यॉर्कर, स्लोअर वनसारखी वैविध्यपूर्ण अस्त्र आहेत. खास करुन उजव्या फलंदाजासाठी आत येणारा डावखुऱ्या गोलंदाजाचा चेंडू हा डंख करणारा असतो. हा डंख न होऊ देण्यासाठी फूटवर्क सर्वोत्तम असायला हवे. इनिशियल स्टेजमध्ये चेंडू मूव्ह झाल्यास रोहित शर्मा आणि कंपनीची ट्रेंट बोल्ट परीक्षा घेऊ शकतो. अर्थात अशा निखाऱ्यांवर बऱ्याच वेळा रोहित शर्मा चालून गेला. त्यामुळे आधी पाय भाजले तरी संयमाने खेळत रोहित शर्मा नंतर गियर बदलून प्रतिस्पर्धी संघाचे अंग भाजून काढू शकतो. तितकी दाहकता, स्फोटकता त्याच्या बॅटमध्ये आहे.
रोहित शर्मा-राहुल जोडीच्या बॅटिंगवर सामन्याचं बरचसं भवितव्य अवलंबून असेल. गेल्या वेळीही आपण ते पाहिलं. तीन बाद 31च्या केविलवाण्या स्थितीत कोहलीला आक्रमकता ऑप्शनला टाकून खेळावं लागलं. या सामन्यात जर 60-70 ची आक्रमक सलामी मिळाली तर चित्रच बदलेल. कोहली अधिक मोकळेपणाने खेळू शकेल. अर्थात हार्दिक पंड्याच्या फिटनेसवर, टीम मॅनेजमेंटच्या त्याच्यावर असलेल्या विश्वासावर टीम कॉम्बिनेशन अवलंबून आहे. म्हणजे पंड्याशिवाय तीन फास्ट बॉलर्स आणि दोन स्पिनर्स की दोन फास्ट बॉलर्स घेऊन तीन स्पिनर्स,या कोड्याचं उत्तर शोधावं लागेल तेही अचूक.
याकरता शार्दूल ठाकूर, इशान किशन, अश्विन, चहर ही सारी नावं चर्चेत येऊ शकतात. शमीला गेल्या सामन्यातील एका खराब परफॉर्मन्सनंतर ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं, त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे. शमी, बुमरा दोघेही मॅचविनर आहेत. कोहलीनेही शमीला 200 टक्के पाठिंबा असल्याचं जाहीरपणे सांगितलंय. त्यामुळे शमी या सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित वाटतंय. शमीही खणखणीत परफॉर्मन्सने त्याच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देण्यास उत्सुक असणार हे निश्चित.
मैदान टी-ट्वेन्टीचं असल्याने सहावा गोलंदाज हाताशी असणं हा कॉमन सेन्स अप्रोच वाटतो. म्हणजे एखाद्या गोलंदाजांला सुरुवातीच्या काही षटकांमध्ये मार पडला तर सहावा गोलंदाज त्याला कव्हर करु शकेल. अर्थात हा सामना आपल्य़ा टीमसाठी ‘चुकीला माफी नाही’, टाईप्सचा आहे. त्यामुळे संघनिवडीचा पहिला पेपर आपण कसा सोडवतो, यावर सामन्यातील खेळाची उत्तरं अवलंबून असतील. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये पॉवर-प्लेसोबतच मधल्या ओव्हर्समध्ये धावफलक हलता ठेवणं तरीही विकेट न गमावणं ही दुहेरी कसरत करणं गरजेचं असतं.
कसोटी क्रिकेटमध्ये जसा पूर्ण दिवसाच्या खेळाचा विचार न करता सेशन बाय सेशन विचार करुन खेळावं लागतं, तसं टी-ट्वेन्टीमध्ये सहा-सहा ओव्हर्सचा प्लॅन करुनच पुढे खेळणं गरजेचं असतं. पहिला सामना गमावून ‘हुकाल तर चुकाल’ची वेळ आपणच आपल्यावर आणलीय. त्यामुळे एक्स्ट्रा एफर्ट देणं गरजेचं आहे. किवी टीमचा अप्रोच नेहमीच प्रोफेशनल असतो. त्यामुळे आपल्याला तसूभरही चुकीला स्कोप नाहीये.
मैदान दुबईचंच आहे, त्यामुळे नाणेफेकीचा कौल मोलाचा ठरणार असला तरी तो निर्णायक ठरु नये, अशी अपेक्षा आहे. भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल पुन्हा बोलायचं झाल्यास. पहिल्याच पायरीवर ठेच खाल्ल्याने अधिक दक्ष, जागरुक टीम इंडिया मैदानात उतरावी. सेमी फायनलची रेस गाठायची असेल तर हा सामना नॉक आऊट मॅचसारखा ट्रीट करावा लागेल. तितक्या इंटेंसिटीने खेळावा लागेल. प्रत्येक धाव घेण्यासाठी तसंच धाव वाचवण्यासाठी, प्रत्येक कॅच घेण्यासाठी जीवाचा आकांत करावा लागणार आहे.
सण दिवाळीचा आहे. या सामन्यातील भारतीय संघाच्या कामगिरीवर, सामन्याच्या निकालावर आपल्याला दिवाळीचा फराळ गोड लागणार का ते ठरेल. अर्थात आपल्या संघामध्ये असलेले फटाके पाहता, खास करुन पहिल्या मॅचमध्ये झालेल्या पराभवानंतर हा फराळ गोड करण्यासाठी विजयाची रेसिपी नीट जुळून यावी.