विशाल भारद्वाजचं धुरकट असुरक्षित सिनेमॅटिक युनिव्हर्स
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2018 08:11 AM (IST)
विशालच्या सिनेमातलं जग हे धुरकट, असुरक्षित असतं. त्यात कुठलाही विनाकारण कॉमिक रिलीफ नसतो. त्याच्या सिनेमातले 'नमक इष्क का' सारखे आयटम सॉंग पण इतर आयटम साँगचे टिपिकल एलिमेंट नसणारे असतात. डीसी युनिव्हर्स जस खूप डार्क आहे किंवा मार्व्हल युनिव्हर्स जस सुपरहिरोंच्या वेदनांनी भरलेलं आहे तस विशाल भारद्वाजचं सिनेमॅटिक युनिव्हर्स एका असुरक्षिततेच्या भावनेने भरलेलं आहे. गुलजार यांचं त्यांच्या लाडक्या विशाल भारद्वाजबद्दलच एक मत फार विचार करण्यासारखं आहे.
येत्या चार ऑगस्टला विशाल भारद्वाज वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण करेल. राजकारणात आणि सिनेमात हे वय तस धोक्याचं. ना धड तुम्ही 'आशास्थान' असता ना कुणाचं 'प्रेरणास्थान'. पण विशाल याला अपवाद असावा. तो आज देशातल्या सर्वात महत्वाच्या सृजनशील लोकांपैकी एक आहे. साहित्याचं सिनेमात माध्यमांतर करणं आणि स्त्री पुरुष नात्यातल्या राजकारणाची प्रत्यक्ष राजकारणाशी सिनेमाच्या कथानकात खुबीनं सरमिसळ करणं यात त्याचा हात धरणारा दिग्दर्शक आज तरी कुणी नाही. विशालचा जन्म बिदनौरचा. पण तो वाढला मेरठमध्ये. उत्तर प्रदेशमधल्या या दोन शहरांमधल्या प्रदीर्घ वास्तव्याचा परिणाम विशालच्या कलाकार म्हणून जडणघडणीवर झाला. विशालच्या बहुतेक सिनेमातली कथानक ज्या ठिकाणी घडतात ती बिदनौर आणि मेरठसारखीच असतात. धड शहर नसणारी आणि धड गाव पण नसणारी . पुरेशी वाढ न झालेल्या अर्भकांसारखी ही शहर असतात. बॉलिवूडवरचा सिनेमात ठायी ठायी दिसणारा पंजाबी प्रभाव पुसट करून तिथे 'युपी का प्रभाव ' वाढवणारे जे अनुराग कश्यप , आनंद राय सारखे जे दिग्दर्शक आहेत , त्यांच्यात विशालचा पण समावेश करावा लागेल . प्रख्यात कवी बशीर बद्र हे विशालचे शेजारी . लहानपणापासूनच विशालच त्यांच्याकडे येणं जाण होत . त्यांच्यामुळेच विशालला उर्दू गजल आणि नज्मची ओळख झाली. विशाल त्या शब्दांच्या मनमोहक जगात हरवून गेला . विशालला बद्र यांच्या अनेक कविता तोंडपाठ होत्या. त्याचवेळेस युपीमध्ये भडकलेल्या धार्मिक दंगलींमध्ये बद्र साहेबांचं घर जाळण्यात आला . त्या जाळपोळीत बद्र साहेबांची अनेक अप्रकाशित हस्तलिखित जळून गेली . हताश होऊन हातपाय गाळण बद्र साहेबांना परवडणार नव्हतं . त्यांनी पुन्हा आठवून आठवून लिहायला सुरुवात केली . या कामी त्यांना छोट्या विशालची खूप मदत झाली .विशालने त्याला पाठ असलेल्या बद्र साहेबांच्या कविता कागदावर उतरवून दिली .विशालच्या माणूस आणि कलाकार म्हणून जडणघडणीवर बद्र साहेबांचा मोठा प्रभाव आहे . दिल्ली विश्वविद्यालयाच्या हिंदू कॉलेजमधून विशालच शिक्षण झालं . त्या कॉलेजमध्ये विशालचे सहाध्यायी कोण होते ? इम्तियाज अली ,आशिष विद्यार्थी आणि मनोज वाजपेयी . विशाल ,आशिष विद्यार्थी आणि मनोज वाजपेयी. हे सगळे तेंव्हापासूनचे जवळचे मित्र .नाटक (विशेषतः तेंडुलकरांची नाटक ) हा या सगळ्यांना जोडणारा समान दुवा. हिंदू कॉलेजमध्येच विशाल भेटला रेखाला. या दोघांना जोडणारा जिव्हाळ्याचा धागा अर्थातच संगीताचा. नंतर दोघांनी लग्न केलं. नंतर विशाल मुंबईला आला आणि बॉलिवूडमध्ये त्याने संगीतदिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. पण विशालला सिनेमाचं दिग्दर्शन खुणावत होत. विशालला दिग्दर्शनाची पहिली संधी मिळाली ती बाल चित्र समिती (NFDC ) कडून. त्यांनी 'मकडी ' फिल्म विशालला दिग्दर्शित करायला दिली. पण चित्रपट बराचसा पूर्ण झाला आणि एक अनपेक्षित समस्या उभी राहिली. NFDC विशालने जे काही शूट केलं होत त्यावर समाधानी नव्हती . त्यांच्या मते विशालचं शूट समाधानकारक नव्हतं . विशालने आपला मित्र शिवम नायर , गुलजार आणि अभिषेक चौबेला शूट केलेलं फुटेज दाखवलं . शूट अतिशय उत्कृष्ट झालं आहे , असं त्यांचं म्हणणं पडलं . मग विशालने मोठं धाडस करून NFDC ला ऑफर दिली की, मीच ही फिल्म विकत घेतो आणि माझ्या पद्धतीने बनवतो. NFDC तयार झाली. उधार उसनवारी करून विशालने 'मकडी' पूर्ण केला. फिल्म प्रदर्शित झाली. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांच्याही पसंदीस उतरली. सिनेमा अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवण्यात आला. सिनेमाला आणि मुख्य भूमिकेत असलेल्या श्वेता बसू प्रसादला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. NFDC ने विशालला विशेष पत्र लिहून त्याचं कौतुक केलं. आज पण ते पत्र विशालच्या दिवाणखान्यात फ्रेम करून लावण्यात आलं आहे. 'मकबूल' हा विशाल भारद्वाजच्या कारकिर्दीतला आणि एकूणच भारतीय चित्रपटांच्या इतिहासातला एक फार महत्वाचा सिनेमा आहे. मला व्यक्तिशः असं वाटत की निम्मी, मकबूल, अब्बाजी ही पात्र मूळ कलाकृतीपेक्षा पण या सिनेमात सरस उतरली आहेत. आयुष्याच्या काही शेवटच्या क्षणांमध्ये निम्मी मकबूलला आवेगाने विचारते, 'हमारा इश्क तो पाक था ना मिया ? पाक था ना हमारा इश्क ? बोलो ना ' तेंव्हा प्रेक्षकांनाच त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असत . मकबूल हा पॉवर गेम आहे . प्रेमातला आणि वर्चस्वाचा . मकबूल मध्ये दोन्ही गोष्टी परस्परसंबंधित असल्याने गुंतागुंत प्रचंड वाढली आहे. मकबूलचं अब्बाजींच्या बायकोवर पण प्रेम आहे आणि त्याला अंडरवर्ल्डवर वर्चस्व पण आहे. दोन्ही गोष्टी प्राप्त करण्यात एकच अडथळा आहे .वृद्धत्वाने विकल झालेला पण अजूनही अंडरवर्ल्डवर कणखर पकड असलेला अब्बाजी. आपला कोणी वारसदार नसल्यामुळे इतिहासातून आपली पाळंमुळं नष्ट होतील अशी अमूर्त भीती मकबूलच्या मनात आहे .पंडित आणि पुरोहित हे पोलीस अधिकारी त्याच्या मनातली ही भीती अजून पक्की करतात. 'मकबूल' मधले मुलं असणारी काकाजी सारखी पात्र आनंदी आहेत . स्वतःच्या मुलांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत . याउलट मकबूल हा सतत असुरक्षिततेने ग्रासलेला आहे . काकाजींचा मुलगा बहुतेक अब्बाजींचा वारस बनेल अशी सार्थ भीती त्याला वाटायला लागते आणि तिथूनच एका अटळ शोकांतिकेला सुरुवात होते . सिनेमाच्या शेवटी निम्मीच्या मुलाला अब्बाजींची मुलगी आणि नवरा दत्तक घेतात तेंव्हा काचेच्या खिडकीतून मकबूल असहाय्यपणे बघण्यापेक्षा अजून काही करू शकत नाही . मकबूलच्या आयुष्यात निरर्थकपणाची कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण होते . विशालने मकबूलच्या या शेवटातून शेक्सपियरन ट्रॅजेडीला सुंदर न्याय दिला आहे . 'ओंकारा ' हा विशालचा अधोविश्वावरचा दुसरा टेक . पण हे अधोविश्व यावेळेस मुंबईत नाही . हिंदी हार्टलँड मध्ये आहे .त्याला उत्तरेत घट्ट रुजलेल्या जातिव्यवस्थेचे कंगोरे आहेत .मकबूलमधल्या निम्मीप्रमाणेच डॉली पण छोट्या शहरातली मुलगी आहे जी प्रेमासाठी बंड करून उठते .ती ओंकारापेक्षा जास्त शिकलेली आहे .'ओंकारा' मधले तिन्ही पात्र डॉली , बिल्लो चमनबहार आणि इंदू या अतिशय कणखर स्त्रिया आहेत ,ज्या त्यांच्या आयुष्यातल्या पुरुषांसमोर दबून राहत नाही . सैफचा लंगडा त्यागी पॉवर गेममध्ये डावलला जात नसल्यामुळे मकबूलप्रमाणेच अस्वस्थ आहे .लंगडा त्यागी हा ब्राह्मण आहे . एका अर्ध्या ब्राह्मणाकडून (ओंकारा ) डावलला गेल्यामुळे तो अजूनच अस्वस्थ आहे . मकबूलमध्ये वर्चस्व कुणाचं असावं हा कॉन्फ्लिक्टचा मुद्दा आहे . ओंकारा मध्ये नात्यांमधला संशय कल्लोळ केंद्रस्थानी आहे . ज्याची बीज लंगडा त्यागीने बोवली आहेत .ओंकाराला आपल्या काळया रंगामुळे न्यूनगंड आहे . डॉलीच सुंदर गोरेपण यामुळे त्याचा कॉम्प्लेक्स अजूनच वाढला आहे .जातव्यवस्थेच्या आणि वर्णगंडाच्या संदर्भामुळे 'ओंकारा' च्या कथानकातली अस्वस्थता वेगळ्याच उंचीवर जाते .लंगडा त्यागीच पात्र विशालने त्याच्या एका ओळखीच्या माणसावर बेतलेलं होत .विशालच्या मेरठमधल्या शाळेमध्ये एक सिनियर मुलगा होता .लंगडा असून पण तो एक नामचीन गुंड होता . आता विशालचा सिनियर मित्र चक्क प्राध्यापक आहे . ओंकाराचं पात्र पण एका प्रत्यक्ष आयुष्यातल्या बाहुबलीवर बेतलेलं आहे . 'हैदर ' चं कथानक काश्मीरमध्ये नेऊन विशालने वेगळाच मास्टरस्ट्रोक खेळला आहे . या सिनेमात विशालने काश्मीरचा सिनेमाच्या सेटसारखा वापर केल्याचं दिसत .'हॅम्लेट ' मध्ये डेन्मार्कचे 'rotten state of denmark ' चे उल्लेख आहेत . भारतीय परिप्रेक्ष्यात काश्मिरशिवाय अजून कुठलं राज्य याच्याशी साधर्म्य साधणार नसेल . हॅम्लेट मध्ये पात्रांच्या संवादात 'state of emergency ' चे उल्लेख येतात . 'हैदर ' मध्ये Armed forces special powers act आहे .गजाला या असुरक्षित वातावरणात टिकाव धरण्यासाठी स्वतःच्या नवऱ्याला बाजूला करून त्याच्या भावाशीच लग्न करते. स्वतःच्या काकाचा काटा काढण्यास आणि वडिलांचा शोध घेण्यास अपयशी ठरलेल्या हैदरची असहाय्य्यता अंगावर यायला लागते . त्याला 'rotten state of Kashmir ' कारणीभूत आहेच .'मटरु की बिजली का मन डोला ' मध्ये त्यावेळेस धगधगत असणारा विशेष आर्थिक क्षेत्रांचा (SEZ ) मुद्दा केंद्रस्थानी होता . या सिनेमातून विशालवर असणारा साम्यवादाचा पगडा स्पष्ट दिसून येतो . साम्यवादाची कथा सांगणारा भांडवलशाही व्यवस्थेने निर्मिती (फॉक्स स्टार ) सिनेमा असं त्याचा एकोळी review मी त्याकाळी लिहिल्याचं आठवत . त्यातलं गुलाबी म्हशीचं रूपक भन्नाट होत . पण 'मटरु की बिजली का मन डोला ' हा बहुतेक विशालचा सर्वाधिक फसलेला सिनेमा असावा . 'कमीने ' हा पुन्हा एका धुरकट , अस्वस्थ असुरक्षित मुंबईत घडतो .'कमीने' मुळे शाहिद कपूर हा किती चांगला अभिनेता आहे हे लोकांना कळलं. विशालच रस्किन बॉण्ड प्रेम सर्वश्रुत आहेच . विशाल रस्किनकडे फ्रेंड -फिलॉसॉफर -गाईड म्हणून बघतो . मसुरीला जिथे रस्किन बॉण्ड वास्तव्यास आहे , त्याच्या बाजूलाच विशालने घर विकत घेतलं आहे . विशाल जेंव्हा जेंव्हा मसुरीमध्ये असतो तेंव्हा तेंव्हा आपल्या मित्राच्याच घरी पडीक असतो . रस्किन बॉण्डच्या दोन लघुकथानकांवर आधारित 'द ब्ल्यू अम्ब्रेला ' आणि 'सात खून माफ ' असे दोन भन्नाट सिनेमे विशालने बनवले . पण 'द ब्ल्यू अम्ब्रेला ' च्या मूळ कथानकात विशालने एक मोठा बदल केला होता .मूळ कथानकात छत्री चोरीला जाण्याचा अयशस्वी प्रयत्न होतो . पण विशालच्या सिनेमात छत्री चोरीला जाते आणि कॉन्फ्लिक्ट तयार होतो. विशालच्या सिनेमातलं जग हे धुरकट, असुरक्षित असतं. त्यात कुठलाही विनाकारण कॉमिक रिलीफ नसतो. त्याच्या सिनेमातले 'नमक इष्क का' सारखे आयटम सॉंग पण इतर आयटम साँगचे टिपिकल एलिमेंट नसणारे असतात. डीसी युनिव्हर्स जस खूप डार्क आहे किंवा मार्व्हल युनिव्हर्स जस सुपरहिरोंच्या वेदनांनी भरलेलं आहे तस विशाल भारद्वाजचं सिनेमॅटिक युनिव्हर्स एका असुरक्षिततेच्या भावनेने भरलेलं आहे. गुलजार यांचं त्यांच्या लाडक्या विशाल भारद्वाजबद्दलच एक मत फार विचार करण्यासारखं आहे. गुलजार म्हणतात ," विशालच्या सिनेमातल्या गोष्टी शेक्सपियरच्या गोष्टींपासून प्रेरित असतात ही मी ऐकलेली सगळ्यात मोठी अफवा आहे , जिचा उपयोग फक्त सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी होतो . पण विशालच्या गोष्टी त्याच्या स्वतःच्या असतात . " विशालच्या कारकिर्दीचे एवढं चांगलं विश्लेषण गुलजारच करू जाणे . मकबूल , ओंकारा , हैदर हे विशालचे सिनेमे शेक्सपियरच्या कलाकृतींवर आधारित आहेत . 'द ब्ल्यू अंब्रेला' आणि 'सात खून माफ ' हे सिनेमे रस्किन बॉंड यांच्या कथांवर आधारित आहेत . पण तरी पण या कथांवर विशालचा स्वतःचा स्टॅम्प आहे . त्याचं स्वतःच असं काही तरी योगदान आहे . अमोल उदगीरकर