BLOG : बसमध्ये, लोकलमध्ये अगदी पाणी भरण्याच्या कॉमन नळावरही सध्या एकच विषय कानावर पडतोय तो म्हणजे हे युक्रेन आणि रशिया दोघांमध्ये होणारं युद्ध. युक्रेन या देशाबद्दल या पूर्वी कधी ऐकलेलं नसणारेही सध्या या युद्धाबद्दल तत्वज्ञान देताना दिसत आहेत. टीव्हीवर हे युद्ध आणि त्याचे वेगवेगळे अँगल पाहताना आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्याबद्दलची उत्तरंही आम्ही आमचीच शोधून घेतोय खरं पण प्रश्न खरंच जाणून घेण्यासारखे आहेत आणि विचार करायला लावण्यासारखेही आहेत..


जवळपास गेले पंधरा दिवस युध्दाबद्दलच्या अनेक गोष्टी आपण ऐकतोय, मागच्या सात दिवसांपासून आपण ते प्रत्यक्ष अनुभवतोय.. इथे भारतात एवढ्या लांब बसूनही आपल्याला त्याची भीषणता जाणवतीये, तिथल्या लोकांचे काय हाल होत असतील हे सांगणं कठीणच..  
तिथल्या लोकांची अवस्था सांगणं जरी कठीण असलं तरी काही गोष्टी सारख्या समोर येत आहेत, हीच परिस्थिती जर आपल्यावर आली असती तर? अर्थात भारताने या आधीही युद्धाचा सामना केलाय पण तरीही हा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात सहज येणारा आहे.. आपण टेलिव्हिजनवर सतत पाहतोय युक्रेनमध्ये अनेक नागरिक, विद्यार्थी हे बंकरमध्ये बसलेत ज्या मध्ये ते सुरक्षित आहेत. या नागरिकांना बंकरमध्ये राहण्याची सोय आहे पण जर हीच परिस्थिती आपल्यावर आली तर आपण कुठे लपू? आपल्याकडे कुठेत बंकर? नाहीचं ना, मग अश्या वेळी आपण कुठे जायचं? बॉम्ब आणि स्पोटकांचा वर्षाव होत असताना आपण नक्की करायचं काय? या सगळ्याचं ट्रेनिंग किंवा वरवरची माहितीही आपण कधी घेतली नाहीये. अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते ते ही कोणतीही पूर्व कल्पना नसताना, देशाची तयारी आहे की नाही या सगळ्याला सामोरं जायची ही खूप पुढची गोष्ट झाली पण आपली स्वतःची तयारी आहे या अश्या युद्धाला सामोरं जायची? आपल्या नातेवाईकांना तर सोडाच पण आपण स्वतः यातून किमान स्वतःला तरी सुरक्षित करू शकू का यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं.. 


भारत आणि पाकिस्तान बद्दलच्या चर्चा आपण चौकाचौकात करतो, साधा क्रिकेटचा सामना जरी एकमेकांसोबत खेळायचा असला तरी आपण त्याला युध्दाचं स्वरूप देतो. दहशतवादी हल्ला झाला की आपल्यासारख्या प्रत्येकाच्या मनात युद्ध करून पाकिस्तानला बेचिराख करावं असा विचार पटकन येऊन जातो अर्थात तो भावनात्मक विचार असतो, नीट विचार केला तर युद्ध नकोच ही भावनाही लगेच जागी होते. पण जर झालंच जे युद्ध तर आहोत का तयार आपण त्याच्याशी दोन हात करायला? त्याचे परिणाम झेलायला? 


एकंदर युद्धाने काय परिस्थिती होऊ शकते याचा एक डेमो आपण सगळे युक्रेन आणि रशियाच्या युद्धामधून घेतोय. या दोघांनी केलेल्या या कृती मुळे फक्त त्यांच्यावर नाही तर जगावर परिणाम होणार आहे आणि अर्थात आपणही त्याचा महागाईच्या मार्फत मोठा मोबदला चुकवणार आहोत. बातम्यांच्या मार्फत येणाऱ्या माहितीनुसार युद्धाची भीषणता जशी वाढतीये तशी तिथल्या लोकांची परिस्थिती खालावत चाललीये हे पाहून सुद्धा सर्वसामान्य माणूस म्हणून आपण काहीच करू शकत नाही हेच खरं! कोण चुकीचं कोण बरोबर यापेक्षा माणसाचा जीव जास्त महत्त्वाचा मानणारी आपण सर्वसामान्य माणसं यावर फक्त चर्चाच करू शकतो.


पर्यावरण वाचवा, झाडे लावा असे नारे देणारे आपण अश्या युद्धामुळे खराब होणाऱ्या पर्यावरणाचाही विचार करून जातो पण जिथे माणसाचा जीव महत्त्वाचा नाही तिथे झाडाची काय किंमत असणार? 


या युद्धाचा परिणाम काहीही होवो, कोणाचीही बाजू जिंकली तरी परिणाम हे वाईटचं होणार ना? मग का हा अट्टहास? याची खूप मोठी मोठी उत्तरं अभ्यासकांकडे असतीलही पण त्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागतोय हे नक्की.


घरातल्या छोट्या मोठ्या भांडणाने घहीवरून जाणारे आपण किती सहजपणे बोलतोय ना या दोन देशांच्या भांडणाबद्दल, कोणालाही आवडत नसलं तरी हे घडतंय हे नक्की. सध्या देवाकडे एकच प्रार्थना ही वेळ कोणावरही न येवो.. जग पुन्हा सुख शांतीने नांदो!