ताशाची तर्री.... ढोलाचा ठोका..... आणि बाप्पाच्या आगमनाची ओढ.... जवळपास बाप्पाच्या येण्याची चाहूल लागते ती एक महिन्याआधी जेव्हा ढोल ताशांचा सराव सुरू होतो तेंव्हापासून.... 


पुण्यातला गणेशोत्सव.... खरं तर या उत्सवाची तयारी पुणेकर एक महिना आधीपासूनच करायला सुरुवात करतात. गणपती आणि पुणे हे समीकरण काही वेगळंच आहे.. सांस्कृतिक वारसा जपण्यात पुणेकर माहीर आहेत. लोकमान्य टिळकांनी 1893 साली  गणेशोत्सवाची सुरुवात केली.  तेंव्हापासून ते आजपर्यंत गणेशोत्सवाची परंपरा प्रत्येकजण जपत आलाय...पुण्यातला गणेशोत्सव अनुभवण्याचं माझं पाहिलं वर्ष मी कधीच विसरू शकत नाही. अर्थात जो कोणी पुण्यातला गणेशोत्सव अनुभवतो त्याला ते वातावरण आपलसं करतं. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी त्या गजबजलेल्या बाजारपेठा, आकर्षक करणारे ते मखर चालत असताना मधूनच येणारा तो मिठाईंचा गोड सुगंध....वाह... गणपतीच्या एक दिवस आधी उद्या बाप्पा येणार या विचारात कोणी झोपतच नाही. मग तो घरचा गणपती असो किंवा मंडळातला.. सगळे जण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागलेला असतो.


पहिल्या दिवसापासून बाप्पाच्या दर्शनासाठी रीघ लागते. आपल्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टी, इच्छा, प्रयत्न करूनही सततचं मिळणारं अपयश या सगळ्यांच्या फाईल्स प्रत्येकजण बाप्पाकडे जमा करत असतात. गणपतीच्या 10 दिवसात जे काही अनुभवता येतं ना ते शब्दात मांडणं जरा कठीणच आहे.


पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची मिरवणूक निघते ती पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात..त्याला साथ तरुणाईच्या उत्साहाची असतेच. मात्र तसाच उत्साह, जोश हा ज्येष्ठ नागरिकांमध्येही असतो बरं का.. मानाचा दुसरा गणपती, तो म्हणजे तांबडी जोगेश्वरी.. या गणपतीला मिरवणुकीत मानाचं स्थान असतं. 1893 मध्ये या गणपतीला सुरुवात झाली. अतिशय पारंपारिक पद्धतीनं या गणपतीची दरवर्षी प्रतिष्ठापना होते. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम. हिंदू- मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. मिरवणुकीत रथाची ची सजावट ही प्रत्येकाला आकर्षित करते. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला 1887 मधेच सुरुवात झाली.  पुण्यात विसर्जन मिरवणुकीला गुलाला बंदी असते पण गुरुजी तालीम मंडळ असं एकमेव मंडळ आहे जे गुलालाची उधळण करतं. मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती.. मोठी मूर्ती,आणि चांदीचे दागिने ही याची खासियत. दरवर्षी हा बाप्पा निघाला की प्रत्येकाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. पुण्यात गणपती मूर्ती जरी मोठ्या नसल्या तरी जो साज असतो तो बघण्यासारखा असतो.मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरी वाडा. 1905 पासून केसरीवाड्यात या उत्सवाला सुरूवात झाली.


 दरवर्षी  पुण्याचं आराध्या दैवत असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा थाट काही औरच असतो... मंदिरातून बाहेर निघतो आणि मांडवात येऊन विराजमान होतो. नेहमी प्रमाणे त्याचा देखावा भक्तांचं लक्षवेधत असतो आणि न राहुन आपली पाऊलं त्याच्याकडे वळतात... त्यादिवशी बाप्पाचं रूप, त्याची ती आरास, त्याचा तो रथ या सगळ्या गोष्टी प्रत्येकजण आपल्या डोळ्यात साठवत असतो.


अनंत चतुर्दशीच्या दिवशी सगळे झिंग झिंग झिंगाट असतात. वेगळा अर्थ घेऊ नका, ती झिंग असते ढोलाच्या आवाजाची, ताशाच्या तर्रीची, डी जे च्या आवाजाची... अलका टॉकीज चौक, शगून चौक, टिळक रस्ता लक्ष्मी रोड सगळं पॅक असतं...प्रत्येक जण नाचण्यात दंग असतो. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असतो....


पण...... दरवर्षी गणेशोत्सवात गजबजलेलं पुणे यंदा गजबजणार नाही... सध्या कोरोना वैश्विक महामारीनं याही वर्षी विघ्न आणलंय. ना त्या मिरवणुका, ना त्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा, ना ढोल ताशांचा आवाज... काहीच अनुभवायला मिळणारं नाहीये.  जी मजा कोरोनाच्या आधीच्या काळात होती ती आता अनुभवता येणार नाही. ती रात्रीची झगमगाट आता पाहाता येणार नाही. त्यामुळे बाप्पाच्या चरणी या वर्षी हिच प्रार्थना करुया की या वर्षी तरी हे विघ्न दूर होऊ दे. पुढच्या वर्षी तुझं आगमन दणक्यात, उत्साहात आणि जल्लोषात होऊ दे हिच प्रार्थना..