Bison: Kaalamaadan Movie Review: आता त्यांनी तुझ्या छातीचा भाता जरी फोडला तरी तू धावत राहा. तुला पुढे जावंच लागेल, सगळ्यात वरती राहावं लागेल, तरच आपण ही आहोत, याची त्यांना जाणिव होईल. आपला मुलगा कित्तनला वेलुस्वामीनं दिलेला हा सल्ला. एव्हढी मेहनत मी करतो मग जेव्हा सर्व काही हातात आलंय वाटतं अस तेव्हाच ते आपल्याला खाली खेचतात. मी ना-उमेद झालोय हे जेव्हा कित्तन आपल्या वडिलांना सांगतो, तेव्हा वेलुस्वामी त्याला हा सल्ला देतो. गावातला दलित-सवर्ण संघर्ष नवीन नाही. तो पिढ्यानंपिढ्यांचा आहे. समाज ही संकल्पना अत्तित्वात आली तेव्हापासूनचा. अशा या गावात दोन जातीतला संघर्ष नेहमी ठरलेला. दोन्ही बाजूनं आपआपलं राजकारण रेटणं सुरु असतं. त्यातून संघर्ष होतो, डोकी फुटतात, मुडदे पडतात, नेते भडकवतात, कायकर्ते भिडतात आणि मग रक्तपात होतो. हे चित्र कॉमन आहे. अश्यावेळी वेळ असते ती आपल्याकडे जे चांगलं आहे ते जपण्याची. ज्यात आपण पारंगत आहोत ते अधिकाधिक चांगलं करण्याची. पुढे जाण्याची. मग त्यांना आपली दखल घ्यावीच लागेल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी शिक्षण आणि त्यानंतर संविधानाच्या माध्यमातून हाच संदेश दिला. समाजाच्या एका घटकासाठी संघर्षात ही बाबासाहेब सोबत असतात आणि विजय सोहळ्यात ही. बायसन या सिनेमात हे असंच दिसतं.
We Are Bound To Struggle. दिग्दर्शक मारी सेल्वराजचा बायसन (2025) हा सिनेमा या संघर्षाची गोष्ट सांगतो. एका विशिष्ट जातीत किंवा समाजात जन्माला आल्यावर स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर ही हेळसांड होते. सतत स्वत: ला प्रुव्ह करुन दाखवावं लागते. ते पुढे येऊ देत नाहीत. पण आपण हटायचं नाही. प्रचंड मेहनत करायची म्हणजे एक दिवस जगाला आपली दखल घ्यावीच लागणार ही आंबेडकरी शिकवण बाइसन सिनेमातून मिळते. तामीळनाडूच्या एका छोट्या गावातली ही गोष्ट. राष्ट्रीय खेल अर्जुन अवार्ड पटकवणारे कबड्डीपटू मनाथी गणेशन यांच्या कारकिर्दीवर आधारीत आहे. मारी सेल्वराजचा हा त्याच्या आत्तापर्यंतच्या सिनेमांपैकी सर्वोत्तम नक्कीच नाही. या आधी पेरुयेरम पेरुमल बीए बीएल (2018), कर्णन (2021), मामन्नन (2023) आणि वझाई (2024) असे एकापाठोपाठ एक हिट सिनेमे मारी सेल्वराजने दिले आहेत. त्यातले कर्णन आणि पेरुयेरम पेलुमल या दोन्ही सिनेमांनी मारीला ओळख दिली. पा रणजीत, मारी सेल्वराज, वेर्टी मारण सारख्या दिग्दर्शकांनी तामीळनाडूतली जाती व्यवस्था स्टार सकट पडद्यावर आणली आणि तिकीट खिडकी गाजवली. बाइसनमध्ये ही तिकिट खिडकी गाजवण्याचा सर्व मसाला ठासून भरलाय.
गावातली एक साधी गोष्ट, तिथलं स्थानिक जातीचं राजकारण, त्यांच्यातल्या मारामाऱ्या, मिथकांचा वापर या गोष्टी मारीच्या सिनेमाची खासियत असतात. जाती व्यवस्था, त्यासंदर्भातल्या रुपकांचा प्रभावी वापर पेरुयेरम पेरुमल बीए बीएल पासून त्यानं केला आहे. कर्णन मिथकांच्या जोरावर चालला. मामन्न मधलं दलित राजकारण त्यानं प्रभावीपणे मांडलं. प्रेक्षकांना स्टार्ससोबत नक्की काय हवंय हे त्याने बरोबर हेरलंय. टिपिकल साऊथच्या सिनेमात कथानकांना गाण्यांमध्ये बसवून मारीनं जातीव्यवस्थेचा नवीन इमोशनल मसाला तयार केला आहे. तो तिकीट खिडकी गाजवत आहे.
मारीच्या सिनेमाचं कथानक प्रचंड फ़ास्ट असतं. तो प्रेक्षकांना उसंत देत नाही. एका पाठोपाठा उत्कंठावर्धक घटना घडतात. प्रेक्षक कथेमध्ये अडकून राहतात. त्यामुळं शेवटाकडे जाण्याचा प्रवास चांगला होतो. आणि प्रेक्षक त्या पात्रांना घेऊन सिनेमाबाहेर पडतो. त्यावर विचार करायला लागतो आणि त्यातून मग पुन्हा थिएटरकडे येतो.
बायसन सिनेमाचा फॉर्मुलाही असाच आहे. खऱ्याखुख्या कब्बडीपटूची ही गोष्ट जास्तच सिनेमॅटीक आहे. त्यातलं नाट्य, त्यात घडणारा संघर्ष आणि सुखद शेवट हा असा थ्री एक्ट फॉर्मुला बायसनची खासियत आहे. बायसन जेव्हढा कबड्डीपटू कित्तनचा त्यापेक्षा जास्त त्याचे वडील वेलुस्वानीचा. वेलुस्वामीची भूमिका करणारा पसुपती हा बायसनचा खरा हिरो आहे. मुलावर कुठलं आरीष्ठ येऊ नये म्हणून त्याला सतत जपणारा बाप पसुपतीनं वठवला आहे. त्याला तोड नाही.
बायसन सिनमात आणखी गोष्ट आहे. तो तामीळनाडूतल्या हिंदी भाषेविरोधातल्या संघर्षावरही कमेंट करतो. 'दिल से बोल रहाँ हुँ इसलिए मैं हिंदी में ट्रान्सलेट नहीं करुंगा' या डायलॉगवर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. त्यात सर्व आलं. केंद्र सरकारात कुणीही असला तरी तामीळनाडूत तामिळचा आग्रह राहिलाय. तिथलं राजकारण जेव्हढं जातीपातीचं तेव्हढंच ते तामीळ भाषेचं. तिथले फिल्मवाले या भाषेच्या राजकारणात भूमिका घेतात हे विशेष. बायसन हा पूर्णपणे कमर्शिल सिनेमा आहे. व्यक्तिकेंद्री आहे. शेवटी काय गोष्ट महत्त्वाची. तुम्ही ती कशी सांगता हे महत्त्वाचं. मारीला आपली गोष्ट जशी सांगायची आहेत तशी त्याने सांगितलीय. आणि ती चांगली ही झालीय.