जगभरातल्या पदार्थांची चव आपल्याच शहरात चाखायची चैन आपण करत असलो तरी युरोपातले अनेक देश मात्र याबाबतीत आपण भारतीयांकडून दुर्लक्षितच राहिले आहेत.
आम्हाला मॉडर्न क्युझिन किंवा प्रमुख्याने परदेशी पदार्थ खूप आवडतात असं अभिमानाने सांगणारे खूप जण असतात. पण अशांनाही आपल्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले चायनिज, कॉन्टीनेंटल, इटालियन असे पदार्थच माहितीचे असतात आणि त्या चवींची सवयही झालेली असते. नाही म्हणायला आज चायनिजच्या पुढे जाऊन एशियन पदार्थ सर्व्ह करणारी बरीच स्पेशालिटी रेस्टॉरन्टस उघडली आहेत. या एशियन क्युझिनमध्ये थायलंडचं थाय पद्धतीचं जेवण, सुशीसारखे जपानी पदार्थ, अगदी ब्रम्हदेशातले बर्मिज पदार्थ यांचा समावेश असतो. त्यात चायनिजपेक्षा जरा वेगळे नूडल्स, ओल्या खोबऱ्याचा वापर करुन तयार केलेल्या ग्रेव्हीज लोकांना चांगल्याच आवडू लागल्या आहेत. तोच प्रकार कॉन्टीनेन्टल पदार्थांचा केवळ पिझ्झा, बर्गर, पास्ताच्या पुढे जाऊन आता लोकांचा पहिला चॉईस लेबनिज किंवा मोरोक्कन पदार्थ ठरु लागले आहेत. फलाफल आणि हुम्मस असे आपले काबुली चणे किंवा छोले ज्याला आंतरराष्टीय स्तरावर चिकपीज असं संबोधलं जातं, त्यापासून तयार केलेले वैदर्भिय डाळींच्या वड्यांशी साध्यर्म असलेला फलाफल नावाचा पदार्थ तर आपल्या देशात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. पण जगभरातल्या पदार्थांची चव आपल्याच शहरात चाखायची चैन आपण करत असलो तरी युरोपातले अनेक देश मात्र याबाबतीत आपण भारतीयांकडून दुर्लक्षितच राहिले आहेत. नाही म्हणायला ब्रिटीश फिश आणि चिप्ससारखे पदार्थ मिळतात आपल्याकडे, स्विस फॉन्द्युपण आता तरुणाईच्या फेवरेट लिस्टमधला पदार्थ झाला आहे. पण स्पेन, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस या युरोपियन देशांच्या खाद्यसंस्कृतीबद्दल इथे बसून फारच कमी माहिती मिळते आपल्याला आणि त्यांचे पदार्थ चाखायची संधी मुंबईसारख्या शहरात तरी फार दिसत नाही. मात्र, याही देशांमधले काही पदार्थ अतिशय लोकप्रिय आहेत त्यांच्या स्वत:च्या देशाबरोबरच जगभरातल्या इतर देशात आणि परदेशात जाऊन आलेले किंवा राहून आलेले लोक आवर्जून याबद्दल सांगतात, त्यामुळे अगदी मोजकेच का होईना पण असे पदार्थ विकणारी ठिकाणंही हळूहळू मुंबईत अवतरायला लागली आहे. नुकतेच असे दोन नविन पदार्थ आणि ती सर्व्ह करणारी ठिकाणं मुंबईत सापडली आहेत. त्यातलाच महत्त्वाचा आणि लोकप्रिय होऊ लागलेला पदार्थ म्हणजे ‘च्युरोज’ हा पदार्थ प्रामुख्याने स्पॅनिश आहे असं मानलं जातं. स्पेनचा राष्ट्रीय पदार्थ असं त्याला संबोधलं तरी वावगं ठरणार नाही इतका हा च्युरोज नावाचा गोड पदार्थ स्पेनमध्ये लोकप्रिय आहे. पण प्रत्येक पदार्थाच्या बाबतीत जे भांडण असतं. ते या च्युरोजच्या बाबतीतही आहे. पोर्तुगाल आणि स्पेन या दोन्ही देशांचा दावा आहे की च्युरोज या पदार्थाचं मूळ त्यांच्याच देशात आहे. अर्थात स्पॅनिश लोकांची च्युरोज कसा पहिल्यांदा तयार झाला याची कथाही रोचक आहे. खरं तर हा च्युरोज नावाचा पदार्थ पाहिला की आपल्या चकलीची आठवण येते. ’चकलीसारखे काटे असलेला पोकळ पण बऱयापैकी मोठा कुरकुरीत वेटोळा पदार्थ म्हणजे च्युरोज’. हा चवीला गोड असतो आणि तळलेला असतो. चॉकलेट सॉस किंवा तत्सम गोड सॉसला लावून लावून खाल्ला जातो. या च्युरोजला आणखी गोड करण्यासाठी तळल्यानंतर वरुन त्यावर बारीक साखरही पेरली जाते. आपली चकली कशी आकाराने बऱ्यापैकी छोटी असते, पण हे च्युरोज मात्र, भलेमोठे असतात आकारानी. पण खायला सुरुवात केल्यावर मात्र अतिशय चवदार असतात आणि अगदी चटकन जिभेवर विरघळतात. स्पेन आणि पोर्तुगाल या दोन्ही देशात तर पंचतारांकित हॉटेलांपासून थेट रस्त्यापर्यंत सगळीकडे च्युरोज मिळतात. स्पेनमधला अतिशय लाडका स्ट्रीटफूड पदार्थही च्युपोज आहे. हे च्युरोज गेल्या काही दिवसात मुंबईतही मिळायला लागलेआहेत. बा्द्र्याला कार्टर रोडवर द बॉम्बे च्युरोज, नावाचं खास च्युरोजचं एक छोटसं आऊटलेट निघालं आहे. तिथे वेगवेगळ्या फ्लेवरचे च्युरोज मिळतात. तसंच ज्या गोड सॉसमध्ये बुडवून च्युरोज खायचे असतात त्याचाही जबरदस्त व्हरायटी या बॉम्बे च्युरोजला मिळते. व्हाईट चॉकलेट, डार्क चॉकलेट, कॅरॅमल, कोकोनट सॉस असे कितीतरी फ्लेवर मिळतात च्युरोजच्या सॉसचे, तसंच एखादं आऊटलेट काढायचं तर भरपूर व्हेरायटी आवश्यकच ठरते. मग त्यातूनच पारंपरिक पदार्थाचे शेफने तयार केलेले नवनवीन व्हर्जन्स मेन्यूत समाविष्ट होतात. द बॉम्बे च्युरोजमध्येही चॉकलेट सॉससारखे वेगवेगळ सॉस थेट च्युरोजला लावून तसे च्युरोजही सर्व्ह केले जातात. म्हणजे आईस्क्रीमसारखे थेट तोंडात टाकता येतात हे च्युरोज. ठाण्यातही पाचपाखाडीच्या खाऊगल्लीत नुकतंच एक अमोर च्युरोज नावाचं केवळ आणि केवळ च्युरोज या एकमेव पदार्थाचे विविध प्रकार सर्व्ह करणारं छोटंसं आऊटलेट निघालं आहे. इथे तर पारंपारिक पद्धतीने गोड असलेल्या या पदार्थाचं सेवरी म्हणजे खारं रुपही मिळतं. खाऱ्या च्युरोजसाठी चिजचा सॉस किंवा आलंलसूण असलेला तिखट सॉसही अमोर च्युरोजला मिळतो. बांद्र्याचं द बॉम्बे च्युरोज आणि ठाण्याचं अमोर च्युरोज या दोन्ही ठिकाणी आईस्क्रीम च्युरोज नावाचा लहान मोठ्या सगळ्यांना आवडणारा पदार्थ मिळतो. आईस्क्रीमच्या जोडीनं हे तळलेले कुरकुरीत च्युरोज खूप चविष्ट लागतात. त्यामुळे केकसारख्या डेझर्टला एक चांगला पर्याय म्हणून आजकाल सगळ्या खवय्यांना च्युरोजचा पर्याय आवडू लागला आहे. आपल्याच शहरात थेट स्पेनचा राष्ट्रीय पदार्थ मिळत असेल तर एखाद्या दिवशी जेवणानंतर तोंड गोड करायला हा च्युरोजचा आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही. लहानग्यांना तर चटकन आवडेल असा हा स्पॅनिश च्युरो. संबंधित ब्लॉग :जिभेचे चोचले : ताज्या पदार्थांसाठी – दादरचं ओव्हनफ्रेश