जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना
एबीपी माझा वेब टीम | 17 Nov 2017 09:01 AM (IST)
चायनीज आणि एशियन पदार्थांच्या या वेगळ्या थोडयाशा तिखट आणि चमचमीत चवींची आता भारतीयांनाही चटक लागली आहे, म्हणून तर मेनलॅण्ड चायना नावाच्या खास चायनीज रेस्टॉरन्टची आणि त्यांच्याच एशिया किचन नावाच्या रेस्टॉरन्ट चेनच्या थोड्याथोडक्या नाही तर १२ ब्रांचेस मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आहेत.
काही वर्षापूर्वी आपल्या देशातल्याच नाही तर जगभरातल्या सर्व खवय्यांना अचानक भुरळ घातली होती ती इटलीचं राष्ट्रीय खाद्य असलेल्या पिझ्झा या अत्यंत लोकप्रिय झालेल्या पदार्थानी. वीसेक वर्षापूर्वी इटलीमध्ये जन्मलेल्या पिझ्झाचे इटालीयन पिझ्झा, अमेरिकन पिझ्झा, युरोपियन पिझ्झा असे वेगवेगळे व्हर्जन्स जन्माला आले. पिझ्झा इतका लोकप्रिय झाला की डॉमिनोज आणि पिझ्झा हटसारखे ब्रॅंण्ड जगातल्या सगळ्या छोट्या मोठ्या शहरांमध्ये चांगलेच स्थिरावले. या पिझ्झाच्या आसपासच भारतात चायनिजचा प्रवेश झाला आणि भेळ पाणीपुरीच्या गाड्यांबरोबर जिकडे तिकडे चायनिजच्या गाड्या दिसू लागल्या. अगदी उडप्याच्या रेस्टॉरन्टमध्येही मेन्यूकार्डात चायनिज नूडल्स आणि मंचुरियनसारखे पदार्थ हमखास दिसू लागले. आपलं चायनिज पदार्थांबद्दलचं ज्ञान कितीतरी वर्ष नूडल्स, मंचुरियन, अमेरिकन चॉप्सी असे काही पदार्थ आणि शेझवान सारखे शब्द इतकंच होतं. पण गेल्या काही वर्षात मात्र ऑथेंटीक चायनिज आणि पर्यायने एशियन क्युझिनच्या वेगळ्या वैविध्यपूर्ण आणि एकदम फ्रेश चवींनी आपल्या भारतीयांनाच नाही तर अगदी जगभरातल्या लोकांना वेड लावलं आहे. अमेरिका, युरोपपासून छोट्या देशांमधल्या लहान शहरांपर्यंत आता केवळ चायनीजची नाही तर एशियन क्युझिनची रेस्टॉरन्ट्स दिसतात. एखादा मास्टर शेफसारखा फूड शो बघितला की चटकन लक्षात येतं की कुठल्याही देशातली पाककलेची स्पर्धा असली तरी स्पर्धकांचा पदार्थ तयार करताना पहिला चॉईस असतो एशियन क्युझिन. इतकं आता हे क्युझिन लोकप्रिय झालं आहे. खरं तर एशियन क्युझिन म्हणजे चीन, जपान, थायलंड, कोरिया, मंगोलिया, तायवान अशा आशियाई देशांमधल्या खाद्यसंस्कृतीतले पदार्थ, आशियाई देश असूनही भारतीय पदार्थांचा एशियन क्युझिन या संकल्पनेत समावेश नसतो, कारण इंडियन क्युझिन म्हणून पूर्णपणे वेगळी खाद्यसंस्कृती जगभरातील लोकांना परिचयाची आहे. एशियन क्युझिनमध्ये नूडल्सचा वापर हे जरी साम्य असलं तरी प्रत्येक देशातल्या खाद्यपदार्थांच्या चवी, ते तयार कऱण्याची पद्धत यात प्रचंड वेगळेपण आहे. एकट्या चायनिजचा विचार केला तरी लहानपणापासून आपल्याला माहिती असलेल्या ठराविक पदार्थांपेक्षा कितीतरी वेगळे पदार्थ मिळून चायनिज खाद्यसंस्कृती तयार होते.. चायनीज आणि एशियन पदार्थांच्या या वेगळ्या थोडयाशा तिखट आणि चमचमीत चवींची आता भारतीयांनाही चटक लागली आहे, म्हणून तर मेनलॅण्ड चायना नावाच्या खास चायनीज रेस्टॉरन्टची आणि त्यांच्याच एशिया किचन नावाच्या रेस्टॉरन्ट चेनच्या थोड्याथोडक्या नाही तर १२ ब्रांचेस मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आहेत. खरं तर ऑथेंटीक चायनिज सर्व्ह करणारे मुंबईतच कितीतरी रेस्टॉरन्टस आहेत. अनेक प्रसिद्धही आहेत, पण मेनलॅण्ड चायना आणि एशिया किचन मात्र त्यांच्या चवींमुळे आणि खास चायनिज डेकोरेशन आणि रंगसंगतीमुळे चांगलंच लोकप्रिय झालं आहे. नूडल्स आणि मंचुरियनशिवाय चायनिज खाद्यसंस्कृतीतला आपल्या खास परिचयाचा शब्द म्हणजे शेजवान. शेजवान चटणी, शेजवान राईस, शेजवान नूडल्स यांची आंबट तिखट चवच खरं तर लोकांना चायनीजप्रेमी बनवते. पण शेजवान किंवा स्पेलिंगनुसार उच्चार केल्यास सिचुआन हे चीनमधल्या एका प्रांताचं नाव आहे किंवा मंचुरियन हे नावही मंचुरिया या प्रांतावरुन पडलं आहे. हे फार कमी लोकांना माहिती असतं आणि त्या प्रांतातल्या चवींनुसार केलेले खाद्यपदार्थ शेजवान म्हणवले जातात हे अशा स्पेशालिटी चायनीज रेस्टॉरन्टमध्ये गेल्यावर कळतं. शेजवान चटणी जशी लालसर तिखट आंबट चवीची म्हणून प्रसिद्ध आहे. तसे मेनलॅण्ड चायनाच्या मेन्यूकार्डात आणखी एक शब्द प्रामुख्याने दिसतो तो म्हणजे हुनान. आता हुनान हेदेखील चीनमधल्या एका प्रांताचं नाव. त्या भागातल खास चवींनुसार तयार केलेले पदार्थ त्या भागाच्या नावाबरोबर जोडले जातात. म्हणजे हुनान टॉस्ट व्हेजीटेबल्स किंवा हुनान स्टाईल चिकन किंवा टोफू असे पदार्थ काळसर ग्रेवीमध्ये केले जातात. हुनान भागाची ही स्पेशालिटी यात हिरव्या मिरच्या आणि सोया सॉस अशी गोड तिखट चव जिभेला लागली की समजावं हे हुनानी चायनिज आहे. अशा हुनान स्टाईल चायनीज रेसीपीज खायच्या तर मेनलॅण्ड चायनाला पर्यायच नाही. त्याशिवाय चायनीज ग्रेवी वेगवेगळे प्रकार आणि त्याबरोबर साधे नुडल्स किंवा राईसचे विविध पर्याय चाखण्यासाठी सर्वोत्तम जागा हीच आहे. मेनलॅण्ड चायनाला गेल्यावर अगदी मिस करुच नये असा स्टार्टरचा पर्याय म्हणजे तिथले डिमसम किंवा डम्पलिंग्स. खरं तर या पदार्थाला आपण मोमो म्हणून जास्त चांगलं ओळखतो, मोमोज आता गल्लोगल्ली थेट गाड्यावरही मिळू लागले आहेत आणि स्वस्तात मस्त पर्याय असल्याने तरुणाईच्या फेवरेट लिस्टमध्येही आले आहेत, आपण रस्त्यावर जे मोमोज खातो ते तिबेटी लोकांकडून तिबेटी स्टाईलने केलेले असतात, पण त्याचंच चायनिज किंवा एशियन व्हर्जन म्हणजे हे डिमसम. त्याचे विविध आकाराचे आणि विविध चवीचे नाना प्रकार मेनलँड चायना इतके इतर कुठेच मिळत नसणार. म्हणजे कॉर्न आणि पालक घातलेले व्हेज डिमसम किंवा प्रॉन्स घातलेले नॉनव्हेज डिमसम. बेसिलची चव असलेलं आवरण असलेला एक प्रकार तर मोदकासारखे तोंड बंद न करता वरुन उघडे असलेले डिमसम असे कितीतरी प्रकार आहेत इथे. सगळ्यांचीच थोडीथोडी चव घ्यायची असेल तर डिमसम प्लॅटरचाही पर्याय आहेच जो या चायनिज हेवनला भेट देणारे खवय्ये नेहमीच निवडतात. इथे तर डेझर्टच्या सेक्शनमध्येही गोड डम्पलिंग्ज मिळतात. खोबऱ्याचं सारण भरलेले मोमोज, हनी सॉसबरोबर सर्व्ह केले जातात. पण मेन्यूकार्डात त्या पदार्थाची माहिती वाचल्यावर उकडीचे मोदकच समोर येणार असं वाटून जातं. अर्थात चव पूर्णपणे वेगळी असल्याने एकदा ट्राय करायला हरकत नाही. त्याशिवाय चायनीजच्या बरोबरीनी आजकाल आवडीने खाल्ले जाणारे थायलंडचे थाय पदार्थही एशिया किचन आणि मेनलॅण्ड चायनाच्या मेन्यूतला लोकांच्या आवडीचा भाग. लाल किंवा हिरव्या रंगाची भरपूर भाज्या घातलेली आणि ओल्या खोबऱ्याचा वापर असलेली थाय करी आणि त्याबरोबर सुगंधी राईस हे कॉम्बिनेशन तर एकदम हिट कॉम्बिनेशन आहे. अर्थात ही थाय करी मग व्हेज असो किंवा नॉनव्हेज कोकोनटच्या चवीमुळे भारतीयांना आवडते. साधारणपणे आपल्या चायनीज पदार्थांच्या संकल्पनेत न बसणारे पण या स्पेशालिटी चायनीज किंवा एशियन रेस्टॉरन्टमुळे लोकांच्या सवयीचे झालेले पदार्थ म्हणजे बर्न्ट गार्लिकच्या कॉम्बिनेशनचे पदार्थ. इथे मेनलॅण्ड चायनाला बर्न्ट गार्लिक राईस, बर्न्ट गार्लिक नूडल्स अगदी बर्न्ट गार्लिक फिशही मिळतो. या पदार्थांमध्ये खरोखर अख्खा खरपूस भाजलेला लसूण असतो आणि इतर सगळ्यापेक्षा राईस असो की नूडल्स लसूण त्या पदार्थाच्या बरोबरीने तोंडात येतो त्यामुळे लसणाची चव आवडणाऱ्यांनी तर हे बर्न्ट गार्लिक प्रकऱण चुकवूच नये.एक खास चायनीज डेझर्टही आहे ज्यात रुंदीला थोडे मोठे आणि जाडसर असे तळलेले गोडसर नूडल्स आईस्क्रीमच्या कपात घालून त्यावर मध, ड्रायफ्रुट्स आणि आईस्क्रीम टाकून सर्व्ह केले जातात. एरव्ही आपण जे गोड पदार्थ खातो त्यांच्यापेक्षा खूप वेगळी असते ही चव आणि मध असं डेझर्टमध्ये खायची आपल्याला सवयच नसल्याने आणखीच वेगळं आणि मस्त लागतं. त्यामुळे सूपपासून डेझर्टपर्यंत नेहमीच्या चायनीजला फाटा देत खऱ्या चायनीजच्या किंचित जवळ जाणारं काही खायचं असेल तर मेनलॅण्ड चायनासारख्या स्पेशालिटी रेस्टॉरन्टला जायला पाहिजे आणि एकदा अशा चायनीजचा किंवा आशियाई पदार्थांचा आस्वाद घेतला की त्या फ्रेश आणि चमचमीत चवींमुळे त्याची चटक लागते हेही तितकंच खरं आहे. संबंधित ब्लॉग :