केवळ बटाटा तळला तरी जगातला सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ बनतो, तो म्हणजे फ्रेंच फ्राईज.
‘बटाटे’ हा खरं भारतीयच नाही तर ग्लोबल जेवणातला सर्वात लाडका जिन्नस असला पाहिजे. जगातली कोणतीही खाद्यसंस्कृती घ्या बटाट्याचा मुबलक वापर आढळतो. आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीतला बटाट्याचा वापर तर विचारायलाच नको. हिंदी चित्रपटांनी प्रसिद्ध केलेल्या उत्तरेकडल्या आलु के पराठेपासून तर साऊथ इंडियन डोशातल्या मसाल्यापर्यंत सगळीकडे या बटाट्याचा वापर पदार्थाची चव वाढवतो. पण या बटाच्याचं काम केवळ चव वाढवण्याचं नाही. केवळ हा बटाटा तळला तरी जगातला सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ बनतो, तो म्हणजे फ्रेंच फ्राईज. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, फ्रेंच फ्राईज मिळणार नाहीत असं नक्कीच होणार नाही. तळलेले बटाटे लागतातही किती टेस्टी, पण नाव उच्चारल्यावर मनात पहिली प्रतिक्रिया येते ती म्हणजे हा फ्रेंच फ्राईज ज्याच्या नावातच फ्रान्सचा उल्लेख हा तो पदार्थ फ्रेंचच असणार. पण इथेच खरी गंमत आहे. बंगाल आणि ओरिसामध्ये रसगुल्ला कुणाचा यावरुन जितके मतभेद होते, त्याहीपेक्षा अधिक मतमतांतरं आहेत. फ्रेंच फ्राईजच्या मूळ जन्मस्थानाबद्दल. बेल्जियम आणि फ्रान्स हे युरोपातले दोन्ही देश या पदार्थावर दावा सांगतात. फ्रेंच लोक म्हणतात की फ्रान्स राज्यक्रांतीच्या थोडं पूर्वी पॅरिसच्या काही महत्त्वाच्या रस्त्यांच्या कडेला हे तळलेले बटाटे मिळू लागले. तर बेल्जियन लोकांचा दावा आहे की हिवाळ्यात मासे मिळेनासे झाले की त्यांचे पूर्वज माशांऐवजी बटाटे तळून खायचे. अर्थात फ्रेंच फ्राईजला त्याचं नावंही बेल्जियममधून पडलं म्हणे, पहिल्या महायुद्धात अमेरिकन सैनिकाने असे तळलेले बटाटे पहिल्यांदा बेल्जियममध्येच खाल्लेत पण ते विकणारे फ्रेंच बोलत म्हणून त्यांना फ्रेंच फ्राईज म्हटलं जाऊ लागलं. बरं फ्रेंच फ्राईजवरुन एवढा वाद असताना बटाटे हे मात्र पोलंडचं राष्ट्रीय खाद्य आहे, म्हणजे एकूणच बटाटे सगळीकडेच फार लाडके आणि प्रसिद्ध आहेत. असा हा जगप्रसिद्ध फ्रेंच फ्राईजचा इतिहास सांगण्याचं कारण मुंबईत सध्या प्रसिद्ध झालेलं ‘द जे’ नावाचं एक युनिक खाऊ स्टेशन. याला खाऊ स्टेशन म्हणण्याचं कारण हे रेस्टॉरन्ट नक्कीच नाही. कारण इथे बसण्याची सोयच नाही. प्लेट्स नाही किंवा वेटरही नाही आणि पदार्थ म्हणजेही फक्त फ्रेंच फ्राईज आणि त्याचे विविध प्रकार, नाही म्हणायला काही मिल्कशेक्सचे प्रकार आणि रॅप्सही मिळतात इथे पण ‘द जे’ चा खरा हिरो फ्रेंच फ्राईज नावाचा पदार्थच. अर्थात त्याचे हवे तेवढे विविध प्रकार मात्र चाखायचे तर मुंबईतल्या कुठलं तरी द जे चं आऊटलेट गाठायलाच हवं. हे फ्रेंच फ्राईज एरव्ही मॅक्डोनल्ड वगैरेमधून घेतल्यावर आपण कसं खातो, साधारणपणे तळून मिठ लावलेला हा पदार्थ टोमॅटो सॉसशी खातो आपण. पण द जे मध्ये मात्र फ्रेंच फ्राईजचे एकापेक्षा एक ‘द’ प्रकार मिळतात. बरं मिळतात कसे तर पुठ्ठ्याच्या भल्यामोठ्या कोनमध्ये. मॉलमध्ये पॉपकॉर्न ज्या पद्धतीच्या कागदी कोनमध्ये मिळतात, त्याचप्रकारच्या कोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, चवींचे आणि व्हेज नॉनव्हेज टॉपिंग्ज असलेले फ्रेंच फ्राईज आणि ते फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी प्लॅस्टीकचा चमचा अशी ही आपण मागवलेली ‘द जे’ मधली फ्रेंच फ्राईजची डिश. भरपूर चिज ओतलेले फ्राईज, बार्बैक्यू सॉस आणि चिजचं कॉम्बिनेशनचं टॉपिंग असेलेले फ्राईज, मेक्सिकन चिपोटले फ्राईज, सालसा सॉस आणि फ्राईज किंवा या सगळ्यापेक्षा आणखीही एकदम भारी म्हणजे भारतीय चवींचे तंदूरी मसाला आणि तंदूरी सॉस ओतलेले फ्रेंच फ्राईज. बटाटे पण आवडतात आणि नॉनव्हेजही आवडतात अशांसाठी तर फारच निराळे आणि चविष्ट फ्राईजचे पर्याय ‘द जे’ मध्ये मिळतात. या नॉनव्हेजमधला जगभरात सगळ्यात लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे फिश एन चिप्स. फ्रेंच फ्राईज आणि तळलेला मासा..लंडनच्या रस्त्यावरचं सर्वाधिक खपाचं स्ट्रीट फूड इथेही मिळतं. बार्बैक्यू किंवा अन्य कोणता तरी चटपटीत सॉस घातलेले फ्रेंच फ्राईज आणि त्यावर छोटे छोटे तुकडे केलेले चिकन सॉसेजेस, किंवा किसून फ्राईजवर टाकलेलं चिकन अशा कितीतरी पद्धतीनं मांसाहार करणाऱ्या फ्राईजप्रेमींसाठी इथे मेजवानी असते. मॅगी फ्रेंच फ्राईज हा तर सर्व टिनेजर्सना आवडणारा एक भन्नाट पदार्थ – तळलेले मॅगी नूडल्स, मॅगीचा मसाला, चिकन आणि या सगळ्याच्या जोडीला मेयो आणि भरपूर चीज. आणखी काय हवं चमचमीत चवीसाठी. अशा जे च्या मेन्यूकार्डातल्या फ्राईजबरोबर आजकाल खूप लोकप्रिय झालेली मेक युवर ओन ची पद्धतही इथे आहे. म्हणजे आपण हवे तसे आपले फ्राईज सजवायचे. साधे सॉल्टेड किंवा मसाला फ्राईजमधला एक पर्याय निवडायचा, मग चिकनचे तुकडे किंवा तत्सम पदार्थांचा पर्याय निवडायचा आणि सगळ्यात शेवटी आवडते सॉस मग चिज सॉस किंवा एखादा तिथट सॉस अशा कॉम्बिनेशनचा पर्याय निवडून आपल्याला हव्या त्या चवीचे भन्नाट फ्राईज बनवून घ्यायचे. मुंबई आणि परिसरात आता ‘द जे’ चे २० तरी आऊटलेट्स आहेत, सगळ्या ब्रांचेस कायम तरुणाईच्या गर्दीने फुललेल्या असतात. पण इथे बसण्याची सोय मात्र नाही. उंच टेबलं आणि त्या टेबलांना ते कागदी कोन ठेवण्यासाठी केलेल्या त्याच आकाराच्या खाचा एवढीच काय ती खवय्यांसाठीची सोय. अर्थात जंक फूड सदरात मोडणाऱ्या फ्रेंच फ्राईजसारखे पदार्थ खात खात गप्पा मारणाऱ्यांना तरी कुठे आलिशान बैठक व्यवस्था हवी असेत, जिथे चार पाच मित्र मंडळी जमतील तिथे फ्रेंच फ्राईज असल्यावर आणखी काय हवं. अर्थात चमचमीत तिखट फ्राईजच्या जोडीला आजकाल तरुणाईचे फेवरेट झालेले मिल्कशेकही मिळतात जोडीला. ओरिओ मिल्कशेक, चॉकलेट मिल्कशेक, रेड व्हेलवेट केक शेक असे जबरदस्त फेवरेट मिल्कशेक ते ही फ्रेंच फ्राईजच्या जोडीला. अर्थात ‘द जे’ मधल्या मेन्यूला डाएटचा विचार करणाऱ्यांनी हातही लावू नये किंवा त्याचा विचारही करु नये कारण चिज, बटाटे, चॉकलेट, केक अशा वजन वाढवणाऱ्या पण चवदार खाद्यपदार्थांचाच पर्याय द जे आपल्याला देतं. केवळ एकाच पदार्थांचे वेगवेगळे व्हर्जन्स फक्त एखाद्या ठिकाणी मिळतात आणि तरीही तो ब्रॅण्ड लोकप्रिय होतो हे आपल्यासाठी खरंतर नवं नाही. जुन्या काळापासून केवळ मिसळ मिळणारं ठिकाण, किंवा केवळ वडापाव मिळणारं ठिकाण अशा ठिकाणांची आपल्याला सवय आहे. पण फ्रेंच फ्राईज हा आपण तरी आपल्या एखाद्या मुख्य पदार्थाबरोबर साईड डिश म्हणून खाण्याचा पदार्थ मानतो. बर्गर किंवा पिझ्झाची डिश मागवली तर त्याच्याबरोबर तोंडी लावणं म्हणून बऱ्याच ठिकाणी फ्राईज देतात. म्हणूनच तर केवळ फ्राईज विकणारं एखादं ठिकाण इतकं लोकप्रिय होऊ शकतं हे पाहूनच आश्चर्य वाटतं, अर्थात तरुणाईच्या लाडक्या या पदार्थाची चव चाखली की त्याचं रहस्य कळेल यात शंका नाही.