भारताच्या २१ राज्यांमध्ये फिरुन नेहमीच्या रेस्टॉरन्टच्या मेन्यूला फाटा देत विविध राज्यांच्या पण केवळ भारतीय असलेल्या पदार्थांची एकत्र मोट बांधणारी मुंबईतली रेस्टॉरन्टची चेन म्हणजे २९.
आम्हाला आजकाल मेक्सिकन जेवण माहितीय, परदेशी प्रसिद्ध पदार्थांची नावं, चवी सगळं काही पाठ आहे..लेबनिज, चायनिज रेसिपीज तर आता घरी करण्याच्या पदार्थांमध्ये समाविष्ट झालेत..आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो की आजकाल आमच्या घरीच आम्ही शेजवान राईस बनवतो वगैरे, पण किती लोक तितक्याच उत्साहाने भारतातल्या विविध भागात दडलेले पदार्थ शोधतात, मेघालयमध्ये किंवा सिक्कीममध्ये लोक काय खातात हे आपण कधी जाणून घेतलंय का, राजस्थानात दालबाटी सोडूनही कितीतरी चवदार पदार्थ असतात त्यांची चव इतर राज्यातले लोक कधी चाखून पाहतात का ?? हे प्रश्न विचारतोय मुंबईत सध्या चर्चैचा विषय ठरलेल्या एका रेस्टॉरन्ट चेनचा मालक निशेक जैन.. . नावच किती समर्पक आहे.. भारतात २९ राज्य म्हणून या रेस्टॉरन्टचं नावही २९..दोन वर्षापूर्वी या २९ नावाच्या खास भारतीय रेस्टॉरन्टची पहिली शाखा थेट केम्पस कॉर्नरला सुरु झाली.. आता तर मालाड, ठाणे अशा तीन चार ब्रॅन्चेस निघाल्यात २९ च्या. याची खासियत एकच डेकोरेशन, बैठक व्यवस्था आणि स्टार्टर्सपासून डेझर्टपर्यंत सगळीकडे भारताच्या विविधतेचं सेलिब्रेशन आपल्याला दिसणार... दक्षिण भारतीय पदार्थ म्हणून आपण नाही म्हणायला आपण इडली, डोसे खातो, पण त्याही पुढं जाऊन दक्षिणेतल्या चार राज्यांमध्येही कितीतरी पदार्थ आणि विविध खाद्यसंस्कृती दडलेल्या आहेत, त्या आपल्यापर्यंत फारशा पोहोचतच नाहीत...राजस्थानी, गुजराती आणि मराठी स्पेशालिटी रेस्टॉरन्ट आहेत आता मुंबईसारख्या शहरात, पण सगळ्या राज्यांमधले फारसे माहिती नसलेले पण अतिशय चविष्ट असलेले पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तो ही अगदी स्टाईलिश पद्धतीने केला जात असेल तर खवय्यांना आवडेल यात शंका नाही.. बाहेर प्रवेशद्वारावर भारताचा मोठा नकाशा आणि आत गेल्यावर देशातल्या सगळ्या राज्यांची त्यांच्या त्यांच्या लिपीत कोरलेली नावं..यातूनच २९मध्ये शिरल्यावर आपल्याला चवींचंहीकिती वैविध्य मिळणार याची कल्पना येते...बरं, या रेस्टॉरन्टच्या मालकानेच जी कल्पना दिलीय त्यानुसार त्यांनी देशभर फिरुन चांगले ७०० पदार्थ एकत्र केलेत, काही ठिकाणहून तर चक्क पैसे देऊन स्वयंपाकघरातला तो सिक्रेट खजिना विकत घेतलाय, पण एखाद्या रेस्टॉरन्टला ७०० पदार्थांचा मेन्यू ठेवणं आणि त्यातलं जे मागवलं जाईल ते तयार करुन खवय्यांना वाढणं प्रॅक्टीकली शक्य नसल्यानं या हॉटेलनं एक अनोखी संकल्पना राबवलीय.. दर सहा महिन्यांनी सगळ्या २९ नावाच्या रेस्टॉरन्टसचा मेन्यू पूर्णपणे बदलला जातो. म्हणजे सहा महिन्यानी एखादा आवडलेला पदार्थ परत खायला गेलात, तर तो नक्कीच मिळणार नाही, पण नविन काहीतरी नक्की मिळेल. आपण कधीही नावदेखील ऐकलं नाही असे मात्र अनेक पदार्थ चाखायला मिळतील याची खात्री..रेस्टॉरन्टच्या मालकानी तर आणखी रंजक माहिती दिली की सहा महिन्यानी मेन्यू बदलला की आधीच्या मेन्यूतल्या सगळ्या पदार्थांच्या पाककृतींच्या प्रिंटआऊट्स रेस्टरन्टच्या बाहेर ठेवल्या जातात..हव्या त्या उचला आणि घरी जाऊन करुन बघा असा हा प्रकार.. इथलं २९ चं मेन्यूकार्ड उघडल्याबरोबरच काही ओळखीच्या आणि काही अत्यंत अनोळखी पदार्थांची नावं वाचणंही खूप रंजक ठरतं..स्टार्टर्सच्या यादीत ‘मरोई नकुप्पी बोरा’ नावाचा एक मणिपुरी पदार्थ दिसतो, अर्थातच हे नाव आपल्यापैकी कुणी ऐकलं असण्याचीही शक्यता नाही.. किंवा काश्मिरी हरिसा रोलही सगळीकडे न मिळणारा पदार्थ, पानकी चटणी नावाचा गुजराती पदार्थ यांच्याकडे मिळतो, एरव्ही गुजराती थाली आपण मोठ्या चवीनं खातो पण पानकीसारखा करायला किचकट पदार्थ क्वचितच रेस्टॉरन्टच्या मेन्यूत आढळतो. पुंगलु नावाचं आंध्रप्रदेशातलं स्नॅक्स या चित्रविचित्र नावांच्या पदार्थांबरोबर दिल्ली टोकरी चाट, सिक्कीमचे व्हेज डम्पलिंग्ज,उत्तरप्रदेशचे सिख कबाब, प्याज कचोरी असेही माहितीतले आणि विविध राज्यांचं प्रतिनिधित्व करणारे पदार्थ दिसतात.. म्हणजे नविन कधीही न ऐकलेल्या पदार्थाबरोबर माहितीतला एखादा पदार्थ अशी ऑर्डर देण्याची खवय्यांची सोय होते.. गंमत म्हणजे पुणेरी मिसळ पाव बरोबर चंद्रपुरी बोंडाही या मेन्यूकार्डमध्ये पाहून आणखीच मजा वाटते..खरं तर नाव २९ असलं तरी प्रत्येक राज्यातही कितीतरी वेगवेगळ्या खाण्याच्या सवयी आण पदार्थ आहेत, त्याचा धावता समावेश २९ च्या मेन्यूत केलेला दिसतो. मेनकोर्सच्या बाबतीतही तेच खास मराठी डाळिंबी उसळ, बिहारी लिट्टी चोखा, इंदोरी पालक पुऱ्या, धनबादी सालन काश्मिरी श्रीमालपासून गुजराती शेवसब्जीपर्यंत हवा त्या भागातला पदार्थ एकाचवेळी इथे चाखता येतो.. गंमत म्हणजे काश्मिरी श्रीमाल आणि केरळी पराठा एकाचवेळी खाता येईल अशी कदाचित इकमेव जागा म्हणजे २९ नावाचं हे रेस्टॉरन्ट... झारखंड, मणिपूर, उत्तराखंड अशा फुडमॅपवर फेवरेटच्या यादीत नसलेल्या राज्यातले कितीतरी पदार्थ इथे चाखता येतात.. झारखंडचा घुगनी विथ धुसका..उत्तराखंडच्या कुमाऊ भागातील मांडवे की रोटी, गोव्याचा ड़ोली थॉय असे किती किती नविन पदार्थांची तोंडओळख होते या रेस्टॉरन्टच्या निमित्ताने...अर्थात सगळे पदार्थ अगदी पारंपरिक पद्धतीने सर्व करण्यापेक्षा ते सर्व मात्र अतिशय आकर्षक आणि मॉडर्न पद्धतीने सादर केले जातात, त्यामुळेच ते खायला आणखीच मजा येते.. अगदी डेझर्टसमध्येही आईस्क्रीम,केक असलं काहीही इथे २९ मध्ये मिळणार नाही, त्याऐवजी फिरनी, कुल्फी, बंगाली मिष्टी दोही, रबडी जिलेबी असे खास भारतीय मिष्ठान्न आपलं तोंड गोड करायला सर्व केले जातात. चायनिज, मेक्सिकन, इटालियन, थाय अशा विविध देशातल्या खाद्यसंस्कृतीतील पदार्थांचा आपण मोठमोठ्या रेस्टॉरन्टसमध्ये जाऊन कायम फडशा पाडत असतो..आपल्या संस्कृतीचा कधीही भाग नसलेले सोया सॉस,चिजसारख्या पदार्थांना आपण आपल्या खाद्यसंस्कृतीत आता सामावूनही घेतलंय.. मग आपले खऱ्या अर्थाने शेजारी असलेल्या राज्यांच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला हरकतच नाही..प्रत्येक राज्यात भटकंती करत फिरताना वेगवेगळ्या पदार्थांशी ओळख नक्कीच होईल पण वेळेअभावी जर भटकंती करणं लगेच शक्य नसेल तर मुंबईतल्या एखद्या २९ च्या शाखेला भट देऊन खाद्यभ्रमंतीचा आनंद घेता येणं शक्य आहे.