भाजपा नेते तथा बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे नगरपालिका निवडणुकीतून कमबॅक निश्चितच त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देणारे, आणि कौतुकास्पद आहे. विधानसभेला राज्यात महायुतीला मिळालेल्या ग्रँड व्हिक्टरीत स्वतः पराभवाला सामोरे जाणे, तो पचवणे आणि पुन्हा उभारणे हे सहज शक्य होत नसतं. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सत्तेतील पक्ष, वरिष्ठांकडून मिळणारी ताकद, लोकांशी ढळू न दिलेला संवाद आणि धडपड्या वृत्ती हेच त्यांच्या नगरपालिका विजयाचे गमक म्हणता येईल. नगरपालिका निवडणुकांचा विचार केल्यास बार्शीच्या जातीय समीकरणाचा गाढा अभ्यास राऊत यांनी केल्याचं स्पष्ट दिसून आलं. त्यामुळेच, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला तगड्या संख्येने सोबत घेऊन त्यांनी केलेली विजयाची रणनीती, सत्तावापसीत यशस्वी झाली. बार्शीत राजेंद्र राऊतांचे सक्सेसफुल सोशल इंजिनिअरींग पाहायला मिळालं. 

Continues below advertisement

नगराध्यक्षपदी तेजस्विनी कथलेंना उमेदवारी देत राऊत यांनी यॉर्कर टाकला. त्यानंतर, जवळपास लिंगायत समाजाला 8 प्रभागात उमेदवारी देऊन नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी मतांची गोळाबेरीज केली. त्यात, गत निवडणुकीत कथलेंचा झालेला पराभव, त्यांना यंदाच्या संधीचं सोनं करण्यात महत्वाचा ठरला. कारण, लिंगायत समाजाने कथलेंचा तोच पराभव पुसून टाकण्याचं काम लिलया केल्याचं दिसून आलं. ना जात पर ना पात पर, दिलीप सोपल की बात पर ह्या डायलॉगला लिंगायत समाजाने संमिश्र प्रतिसाद दिला. त्यामुळे, मतदानानंतर बारबोले यांची हवा दिसली पण मतांमध्ये त्याचे रूपांतर झालं नाही असंच म्हणावं लागेल.

याशिवाय, 7 मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवत, भाजपला मुस्लिम समाज मतदान करत नाही हा समज दूर करण्याचं पहिलं पाऊल टाकलं. भाजपला मुस्लिम समाज मत देत नाही हे बहुतांश खरं जरी असलं तरी, ते फक्त लोकसभा आणि विधानसभेपुरतंच. कारण, तिथून देशाची, राज्याची सत्ता ठरते. मात्र, स्थानिक निवडणुकांमध्ये नेत्याचे वर्तन आणि मुस्लिम समाजाशी त्यांची असलेली वागणूकच महत्वाची ठरते. त्यात, राजेंद्र राऊत यांनी सर्वधर्म समभाव जपला. हिंदुत्ववादी पक्षाचे नेते असतानाही कट्टर हिंदुत्ववादी भूमिका त्यांची कुठेच दिसून आली नाही. याशिवाय माजी नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी यांच्यासह अनेक मुस्लिम युवकांना कायमच सोबत घेतलं. तुम्ही माझेच आहात हे मुस्लिम बांधवाना कायम आश्वस्त केलं. त्यामुळे, मुस्लिम समाजाने बार्शीत भाजपला भरभरून मतदान केलं, हेच दिसून येतं. 

Continues below advertisement

यंदाच्या प्रचारात राऊत यांचा बदललेला स्वभाव, विकासाच्या मुद्द्यावर केलेली भाषणे, जाहीरनाम्यातून पाणीपुरवठ्याबाबत दिलेलं ठोस आश्वासन, घराणेशाहीला फाटा, गत आमदारकीतून आणलेल्या विकासनिधीचा नियमित प्रचार, प्रसार आणि सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्याने दिलेली आश्वासने बार्शीकरांना भावली. तुलनेत, गेल्या 11 महिन्यात विरोधकांनी किती निधी आणला? या प्रश्नावर सोपल गटाकडे कुठलेही ठोस उत्तर नव्हते. या प्रचारनितीचा निश्चितच राऊत यांना फायदा मिळाला. तर, शिवसेना पक्षाच्या वरिष्ठांकडून कुठलीही ताकद देण्याचा प्रयत्न दिसून आला नाही. 

राजेंद्र राऊत यांच्याकडे घरातूनच असलेलं संघटन हेही महत्वाचं ठरलं. भाऊ विजय नाना राऊत, पुत्र रणवीर आणि रणजित, पुतण्या अभिजित आणि सगे सोयऱ्यांनी जबाबदारी घेत विविध स्तरावर नेतृत्व सांभाळलं. त्यामुळेच, सोपल गटाच्या तुलनेत राऊत यांच्याकडे नव युवकांचे आकर्षण वाढले. फर्स्ट टाईम वोटर बऱ्यापैकी राऊत यांच्याकडे झुकल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय सोपल गटातून एखादा लहान कार्यकर्ता आपल्याकडे येतोय तरी त्याच्या स्वागताला तयार असणं, आणि आपल्याकडून कुणीही जाणार नाही याची खबरदारी घेणं हे बेरजेचं गणितही त्यांच्या विजयात महत्वाचं ठरलं.

भाजपच्या विजयाचं श्रेय जसं राजेंद्र राऊत यांना देता येईल, तसंच चुरशीच्या ठरलेल्या प्रभाग 6 मध्ये सर्वस्वी ताकद लावूनही सोपल गटाचे माजी गटनेता नागेश अक्कलकोटे यांचा पराभव करण्यात त्यांना यश मिळालं नाही. वर्षाताई झाडबुकेंच्या गळ्यात पहिल्यांदाच भाजपचा गमछा घालत आणि स्थानिकांना सोबत घेऊन याच प्रभागातून प्रचाराचा श्रीगणेशा केला. मात्र, अक्कलकोटे यांनी सुक्ष्मपणे रणनीती आखत दुसऱ्यांदा विरोधकांचा डाव हाणून पाडण्यात यश मिळवलं.  

नगरपालिका निवडणुकीत राऊत गटाच्या सर्वच नगरसेवकांना मिळून 64,714 तर सोपल गटाला 60,582 एवढी मतं मिळाली. तर, 23-19 असे नगरसेवक निवडून आले आहेत. म्हणजेच, दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वातील ही लढाई तुल्यबळ, घासूनच झाल्याचं दिसून येतं. मात्र, आधी बाजार समिती आणि आता नगरपालिका निवडणूक जिंकल्याने राऊत गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर, सोपल-बारबोले गटाने हे दोन्ही पराभव पचवून नव्याने जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हायला हवं. शेवटी लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही कणखर असायलाच लागतात.