रविवारचा दिवस टेनिसरसिकांसाठी मनात कोरून ठेवण्याजोगा होता. टेनिसच्या मंचावरचे दोन सम्राट एकमेकांना भिडले होते. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल. अमिताभ आणि नसिरुद्दीन स्क्रीन शेअर करत असतील तर चित्रपटप्रेमी जितके सुखावतील तसंच या जोडीबद्दल म्हणावं लागेल. एक डावखुरा लाल मातीच्या कोर्टचा बादशहा तर दुसरा हिरवळीच्या कोर्टचा अर्थात विम्बल्डनचा सिंहासनाधीश्वर.


(असं असलं तरीही दोघांकडेही चारही ग्रँड स्लॅमचं कलेक्शन आहे, सो सॅल्यूट टू बोथ) या सामन्याआधी फेडरर 17 ग्रँडस्लॅमचा मानकरी आणि आता 18 वा मुकुटही शिरपेचात मानाने मिरवणारा. मात्र आधीच्या 17 पेक्षा हे विजेतेपद फेडररला आणि त्याच्या चाहत्यांनाही आनंदाची वेगळी झुळूक देऊन गेलं हे निश्चित. 2012 च्या विम्बल्डननंतर त्याला या विजेतेपदाच्या ट्रॉफीने हुलकावणी दिली होती. बहुतेक वेळी त्याच्या वाटेतल्या स्पीडब्रेकरचं नाव नदाल होतं.

यावेळीही पाचव्या सेटमध्ये फेडरर 1-3 असा डाऊन असताना तो झळाळता चषक आता नदालच्याच हाती विसावणार असं वाटत होतं, पण 35 वर्षीय फेडररने खेळाचा दर्जा उंचावताना 5 गेम्स सलग जिंकत बाजी पलटवली, असं म्हटल्यास वावगं वाटू नये. किंबहुना या पूर्ण मॅचमध्ये फेडररची बॉडी लँग्वेज जास्त पॉझिटिव्ह वाटत होती, ज्या रुबाबात तो कोर्टवर चालत होता, वावरत होता, त्यावरून 'आय विल बी द बॉस' हेच त्याला सांगायचं होतं. झालंही तसंच. शिवाय त्यादिवशी एक गोष्ट आणखी जाणवली ती फेडररची झंझावाती सर्व्हिस. दोनशे किलोमीटर प्लस वेगाने तो अगदी लीलया सर्व्हिस करत होता, 60 सेकंद, 90 सेकंदांमध्ये गेम जिंकत होता, तेही नदालसमोर.

नदालचा कोर्ट कव्हरेज, त्यात डावखुरा असल्याने त्याला मिळणारा अँगल या साऱ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर फेडररची सहजता जास्त नजरेत भरते आणि मनातही. किंबहुना काही वेळा नदाल फेडररला कोर्टभर अक्षरश: पळवत होता, तरीही फेडरर त्याला पुरुन उरला. टेनिसमध्ये वयाच्या पस्तीशीत इतक्या चपळाईने कोर्टभर वावरणारा खेळाडू विरळाच असावा. त्याचा वेग, त्याचं कोर्ट कव्हर करण्याचं कौशल्य केवळ थक्क करणारं होतं. नदालच्या प्रत्येक अस्त्राला नेस्तनाबूत करण्याचं तितकंच ताकदवान शस्त्र घेऊन तो मैदानात उतरला होता. फेडररची फ्लुएन्सी, त्याच्या बॅकहॅण्ड स्ट्रोक्सचं सौंदर्य पाहून कोणत्याही टेनिस बॉलने त्याच्या रॅकेटला आय लव्ह यू म्हणत प्रपोज केलं असतं. तेही वयाच्या तब्बल 35 व्या वर्षी.....

पुन्हा पुन्हा वयाचा मुद्दा येण्याचं कारण. टेनिस या खेळाचं नेचरच तसं आहे. हा व्यक्तिगत क्रीडा प्रकार असल्यानं मॅचची सारी सूत्र तुमच्याच हातात. सोनं झालं तरी तुम्हीच करणार आणि मातीही तुमच्याचमुळे होणार. त्यात रेप्युटेशन प्रेशर, 2012 पासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ, त्यात फायनलमध्ये पुन्हा एकदा नदालच त्याच्या समोर. या साऱ्या गोष्टी त्याच्या मनाच्या कोर्टवर इकडून तिकडे भिरभिरत असणारच. या मॅचमध्ये फेडररने बाजी का मारली, तर मनातलं हे द्वंद्व तो आधी जिंकला आणि मग कोर्टवरचं. त्यात फेडरर कोणत्या स्थितीतून कमबॅक करत होता तेही पाहिलं पाहिजे, तो गुडघ्याच्या दुखापतीतून परत येत होता, म्हणजे क्रिकेटमध्ये फास्ट बॉलरसाठी ही दुखापत जितकी छळणारी असते, तितकीच ती टेनिसमध्ये किंबहुना कुठल्याही आऊटडोर स्पोर्टसाठी गुडघ्याची दुखापत ही मेक ऑर ब्रेक सिच्युएशन असते, गुडघ्याच्या दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या फेडररसाठी म्हणूनच हे विजेतेपदाचं अत्तर त्याची करिअर जास्त सुगंधित करणारं आहे.

जाता जाता फेडरर म्हणाला, आय मे नॉट बी हिअर नेक्स्ट इयर. मन गलबलून गेलं. टेनिसच्या कॅनव्हासवर अनेक दिग्गजांनी आपल्या स्टाईलने मनमोहक चित्र रेखाटलीयेत. नव्हे आपल्या मनात ती उमटलीयेत. अगदी रॉड लेव्हर, जॉन मॅकेन्रो, बियॉन बोर्ग, पीट सॅम्प्रस अशी अनेक.... मी यामध्ये आंद्रे आगासीचंही नाव घेईन. कारण चारही ग्रँड स्लॅम नावावर करणारी मंडळी हाताच्या बोटावर आहेत. त्यात आगासीही आहे म्हणून. या साऱ्यांच्या पंक्तीत ग्रँड स्लॅमच्या संख्येचा विचार केला तर फेडरर 18 विजेतेपदांसह शिखरावर आहे. त्या फेडरर नावाच्या टेनिसच्या कॅनव्हासवरच्या चित्रकाराची अदाकारी आम्हाला अजूही पाहायचीय. त्याच्या रंगात आम्हाला न्हाऊन निघायचंय. तेव्हा फेडरर तू खेळत राहा.....