ट्वेन्टी-20 च्या मैदानात टीम इंडियाला सलग दुसऱ्या रविवारी लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली. आधीच 110 चा तुटपुंजा स्कोर, त्यात धार नसलेली किंवा धार न दिसलेली म्हणूया पण, बोथट गोलंदाजी यामुळे किवींचा विजय सुकर झाला आणि भारताची सेमी फायनलची वाट बिकट झालीय. किंबहुना एखादा चमत्कारच आता भारताला सेमी फायनल गाठून देऊ शकतो.


सामन्याची स्क्रिप्ट पाकच्या मॅचच्या सुरुवातीसारखीच लिहिली गेली. म्हणजे आधी टॉस हरणं, मग आघाडीची फळी कोसळणं. हा सीक्वेन्स परफेक्ट तसाच. गेल्या मॅचमध्ये तीन बाद 31 तर आता चार बाद 48. त्यात यावेळी दुष्काळात तेरावा महिना म्हणून चौथी विकेट कोहलीची. इथून पुढे मॅचचा कंट्रोल न्यूझीलंडने हातातून निसटू दिला नाही. त्याला आपणही खराब फटके खेळून मोलाचा हातभार लावला. म्हणजे राहुल आणि काही प्रमाणात रोहितचा फटकाही मन निराश कऱणारा होता. जवळपास नॉकआऊट सिच्युएशनसारखी मॅच असताना एक मोठी इनिंग ही काळाची गरज होती. असं असतानाही कागदावर दिमाखदार असणारी, स्फोटक असणारी आपली फलंदाजी फुसका बार निघाली. जिथे आपण रोहित, राहुल, कोहली, हार्दिक, पंतच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीची वाट पाहत होतो. तिथे चौकार-षटकार जणू अमावास्या-पौर्णिमेसारख्या अंतराने येत होते. या मॅचच्या आकेडवारीवर नजर टाकलीत तर ही बाब स्पष्ट होते. पूर्ण 20 ओव्हर्समध्ये अवघे आठ चौकार आणि दोन षटकार. तर एकूण 54 डॉट बॉल म्हणजे निर्धाव चेंडू. ट्वेन्टी-20 च्या मैदानात त्यातही रोहित, राहुल, कोहली हे तुमचे पहिले तीन फलंदाज असतील तर ये बहुत नाइन्साफी है..


टॉसचं दान जरी पुन्हा प्रतिस्पर्ध्यांच्या पारड्यात गेलं, तरी आव्हानात्मक म्हणजे कमीत कमी 160 च्या घरातला स्कोर करणं आपल्या हातात होतं. जे आपण करु शकलो नाही. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा या दोघांनीही कमकुवत झालेल्या फलंदाजीच्या अंगात थोडा प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. पण, तो अपुराच होता. वाईट याचं वाटतं की, सलग दुसऱ्यांदा फारशा भेदक नसलेल्या खेळपट्टीवर आपण कोसळलो. नुसते कोसळलो नाही, तर जमीनदोस्त झालो. आणि आता स्पर्धेतली आपली स्थिती अशी आहे की, आपला एक पाय भारतात आहे. अफगाणिस्तानला न्यूझीलंडने पराभूत केलं, की बॅगा भराव्या लागतील.


वाईट याचं वाटतंय की, खेळाच्या दोन्ही आघाड्यांवर आपण चीत झालो. म्हणजे आधी फलंदाज कुचकामी ठरले आणि नंतर 111 चं माफक टार्गेट असताना आपल्या गोलंदाजीनेही गुडघे टेकले. बुमरा वगळता एकही गोलंदाज विकेट टेकिंग वाटला नाही. वरुण चक्रवर्तीचा गाजावाजा बराच झाला होता. त्यामानाने त्याला परफॉर्म करता आलं नाही. अर्थात पहिल्याच मालिकेत त्याला फ्ल़ॉप ठरवता येणार नाही, असं असलं तरीही सामन्यात काहीतरी रंगत येण्यासाठी सुरुवातीच्या काही विकेट्स घेणं गरजेचं होतं. पण, गप्टिल बाद झाल्यानंतर विल्यमसनने जी फलंदाजी केली, त्याला अँकर रोल प्ले करणं असं म्हणतात. म्हणजे मैदानात ठाम राहून मॅच कंट्रोल करणं. दुसरीकडून डॅरी मिशेलने ऑपरेशन धुलाई हाती घेतलं होतं. विल्यमसनला फक्त या धुलाई मशीनच्या बटनकडे मिशेलला न्यायचं होतं. त्याने एकेरी-दुहेरी धावा काढत हे काम चोख केलं. मिशेलने चार चौकार तीन षटकारांसह भारतीय गोलंदाजीची जितकी गरज होती तितकीच धुलाई करुन तिला वाळत घातलं.


इथून पुढचा सेमी फायनलचा रस्ता फारच कठीण आहे. म्हणजे जवळपास अशक्यच म्हणा ना. तरीही तीन सामने आपल्या हातात आहेत. आता प्रयोग करायला स्कोप असला तरी एक वेडी आशा म्हणून तिन्ही मॅच अशा सोडता नाही येणार. कुणी सांगावं अफगाणिस्तान एखादा अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवेलही. पण, दुसऱ्याच्या चमत्काराला नमस्कार करुन आपल्याला पुढे जाता येणार नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत कमालीची सुधारणा गरजेची आहे. तर आणि तरच आपण पुढे वाटचाल करण्याची अंधुकशी आशा आहे.


दिवाळी येऊ घातलीये. त्याआधी आपण सारे भारतीय क्रिकेटरसिक वेडी आस लावून बसलो होतो की, दुबईच्या मैदानात फटाकेबाजी आधी फटकेबाजी पाहायला मिळेल. पण, फटाके फुटलेच नाहीत. मोठमोठे फलंदाजीचे बॉम्ब भात्यात असताना लागोपाठ दोनदा साधा सुरसुरीसारखाही आवाज झाला नाही. यामुळे मन खातंय. तरीही भारतीय क्रिकेटरसिक असल्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे उम्मीद पे दुनिया कायम है...