गेल्याच आठवड्यात 29 तारखेला मन पिळवटून टाकणाऱ्या अपघाताने टेलिव्हिजनचा स्क्रीन, पेपरचा कोपरा अन् कोपरा आणि तुमचं आमचं मनही व्यापून टाकलं होतं. एल्फिन्स्टनची चेंगराचेंगरी... त्यात गुदमरुन, जखमी होऊन, जीव गमावलेले 23 मुंबईकर आणि जखमी झालेले बरेच जण.


ती बातमी आली तेव्हा मीच ऑन एअर होतो, सुरुवातीला चेंगराचेंगरीत 6 जखमी, नंतर तीन मृत्यू... एकेक तपशील येत गेला... तसतसा अँकरच्या भूमिकेसोबतच मुंबईकराच्या भूमिकेतूनही या घटनेत डोकावलं. मनात चर्रर्र झालं. त्यात मृत्यू पावलेल्यांच्या कहाण्या पुढे दोन-तीन दिवस येत होत्या.

कुणा घरातला दोन-तीन वर्षांच्या, दोन महिन्यांच्या बाळाचा बाबा गेला तर कुणाची वंशवेल...  लाडकी कन्या.... करिअरची एकेक पायरी चढून पुढे जाण्यासाठी रोज तिकडून प्रवास करताना त्या ब्रिजवरुन चढउतार करणाऱ्या काहींचा तो अखेरचा प्रवास ठरला. मन विस्कटून, गलबलून टाकणारी ती घटना. अजूनही डोळ्यासमोरुन जात नाहीये.

मला एका गोष्टीचं नवल वाटतं किंबहुना चीडही येते ती याची की, प्रत्येक वेळी काहीतरी दुर्दैवी घडल्यावरच आपल्याला जाग येते. सावित्री नदीचा पूल कोसळला, आपल्याकडे घोषणा झाली, धोकादायक पुलांचं ऑडिट होईल, आताही तसंच... एल्फिन्स्टनला चेंगराचेंगरी झाली, परत घोषणा.. सात दिवसात मुंबईतल्या ब्रिजचं ऑडिट होईल..

हे ऑडिट होण्यासाठी पुल कोसळायची किंवा दुर्घटना व्हायची वाट का पाहिली जाते? मुंबईत उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा, वाढणारी माणसांची गर्दी याचं प्रमाण लक्षात घेऊन वेळीच पावलं टाकली का जात नाहीत? काही कोटींचा टॅक्स भरणाऱ्या मुंबईकरांना मिळणाऱ्या सोयीसुविधा त्या दर्जाच्या आहेत का?  देशाची आर्थिक राजधानी असं बिरुद मिळवणाऱ्या मुंबईच्या, इथल्या मुंबईकरांच्या या अवस्थेला जबाबदार कोण? कधी आमचे मुंबईकर दहशतवादी हल्ल्यात मरणार तर कधी खड्ड्यात बाईक उलटून जीव गमावणार, तर कधी अशा घटनांमध्ये.

का होतंय असं? आपला जीव इतका स्वस्त का झालाय? आज मुंबईत विशेषत: प्रवास करताना इतकी जोखीम वाढलीय की, सकाळी बाहेर पडलेला माणूस हातीपायी सुखरुप घरी येईपर्यंत घरच्यांच्या मनात धाकधूक असते... बरं मुंबईत अंतरं इतकी जास्त आहेत की, त्यातही नोकरी-व्यवसायाची ठिकाणं ही काही घराजवळचीच असतात असं नाही. त्यामुळे प्रवास अनएवॉईडेबल आहे. पर्यायाने मुंबईकर अगतिक आहे.. या फ्रंटवर तो असहाय्य आहे. आज जे 23 जण गेलेत, त्यात उद्या तुमचा माझा कोणाचाही नंबर लागू शकेल अशी स्थिती आहे.

दिवसेंदिवस उभे राहणारे टोलेजंग टॉवर्स, चकाचक काचांची कॉर्पोरेट एसी ऑफिसेस, मॉल्स, दुकानं. मुंबई कात टाकतेय म्हणून तुम्ही आम्ही मिरवणार, पण त्याच वेळी या बदलाला अनुरुप अशा सोयीसुविधा, सुरक्षेचे उपाय लक्षात घेऊन हे सगळं होतंय का? ज्या घटना घडतायत, ते पाहता दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे. या मुंबईतल्या विशिष्ट सुविधेचं फक्त ऑडिट करण्याबरोबरच मला वाटतं की, मुंबईचं एरिया वाईज ऑडिट व्हावं. म्हणजे अगदी मुंबईचे लोकसभा मतदारसंघ लक्षात घेऊन तसं ऑडिट केलं तरी चालेल. जिथे लोकसंख्या, तिथे असणारे उद्योग व्यवसाय, तिथे असलेली पाण्याची, हॉस्पिटल्सची, आपत्कालीन यंत्रणांची उपलब्धता. असं एरियावाईज केलं तर अनेक गोष्टी समोर येतील, त्यातूनच अनेक दुर्दैवी घटनाही टाळता येतील.

याच वेळी आणखी काही मुद्यांकडे लक्ष द्यायला हवं. त्यातली पहिली म्हणजे अफवा पसरवणारे विकृत. छताचा भाग कोसळला, ब्रिज कोसळला.. एक ना दोन.. अशा अडचणीच्या स्थितीत अशा अफवा पसरवणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येतानाच माणूस म्हणवून घेण्याचीही लाज वाटते. परिस्थिती काय? आपण करतोय काय? याचं इतकंही भान असू नये? संतापजनक त्याच वेळी मान खाली घालायला लावणारं. हे एक चित्र अन् दुसरं मुंबई स्पिरीट जिवंत असल्याची साक्ष देणारं. ते म्हणजे त्याही स्थितीत अनेक जणांनी पोलिसांना, यंत्रणांना केलेली मदत. मग ती जखमींना बाहेर काढायला केलेली असो वा अन्य काही. त्याच वेळी रक्तदात्यांना आवाहन केल्यावर त्यांनी दिलेला प्रतिसाद खरंच थक्क करणारा होता.