बुधवारची संध्याकाळ. मोबाईल वाजतो आणि समोरुन ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनील लवाटे सांगतात, अरे अश्विन, सॅड न्यूज आहे. आपला भय्या कर्णिक गेला. वाक्य ऐकून ते मेंदूपर्यंत पोहोचेपर्यंत काही कळलंच नाही. हृदयविकाराच्या झटक्याने गेला तो. लवाटेंनी पुढे आणखी माहिती दिली आणि मी सुन्न झालो. त्याच वेळी मनाने खूप मागे गेलो आणि पत्रकारितेतील करिअरची सुरुवात ज्या दैनिक नवशक्तितून केली, ते दिवस आठवू लागलो.

मी दै. नवशक्तित असताना लवाटे क्रीडा विभागात मला वरिष्ठ. त्यावेळी माझी क्रीडा पत्रकारितेत किंवा एकूणातच पत्रकारितेत ती पाळण्यातली पावलं होती. या पावलांना बळ देणारी जी मंडळी होती, त्यात जसे लवाटे होते, तशी अनेक मंडळी होती, त्यापैकी एक मुकुंद कर्णिक होते. म्हणजे मी ज्यावेळी क्रीडा विभागात नवशक्तिमध्ये सुरुवात केली, तेव्हा क्रीडा पत्रकारितेत दिग्गज कार्यरत होते. क्रीडाविषयक लिखाण करत होते. व्ही.व्ही.करमरकर, चंद्रशेखर संत, विनायक दळवी, मुकुंद कर्णिक, शरद कद्रेकर, सुभाष हरचेकर, अनिल जोशी, सुहास जोशी, नाखवा, संजय परब किती नावं घेऊ. लिखाणाची, विश्लेषणाची खास शैली असलेले द्वारकानाथ संझगिरी सरही क्रिकेट मॅचला हमखास असायचे. ( हे लिहितानाही मनात भावनांचा प्रचंड कल्लोळ आहे, त्यामुळे काही नावं अनवधानाने राहिली असल्यास क्षमस्व.)

आमच्या पिढीचं भाग्य हे की, क्रीडा पत्रकारिता खास करुन फिल्ड वर्क कोळून प्यायलेली ही मंडळी आमच्या आजूबाजूला वावरत होती, या मंडळींचा ग्रेटनेस मला हा वाटतो की, आमच्या पिढीला त्यांनी वयाची भिंत कधी जाणवूच दिली नाही किंवा त्यांच्या इतक्या प्रचंड अनुभवाचं आम्हाला कधीही दडपण आलं नाही. हे त्यांचं मोठेपण. या मंडळींपैकी आपल्या स्टाईलमध्ये हजेरी घेत कान टोचणारे मुकुंद कर्णिक. मला त्यांनी सुरुवातीच्याच दिवसात एकदा अधिकारवाणीने पण, आपुलकीने सांगितलं होतं, फिल्डवर उतर. नुसतं ऑफिसमध्ये बसून तुझे कॉन्टॅक्ट्स डेव्हलप होणार नाहीत. तुझा खेळाडूंशी, आयोजकांशी रॅपो होणार नाही जर मैदानात उतरला नाहीस तर. वीज चमकावी, तसं हे वाक्य माझे डोळे खाडकन उघडून गेलं. मग मी ठरवलेलं, जमेल तेव्हा, जमेल तसं प्रत्यक्ष मैदानात जाऊन रिपोर्टिंग करायचं. खेळाडूंना, आयोजकांना भेटायचं. कर्णिक मुंबईच्या स्थानिक खेळविश्वाशी खास करुन क्रिकेटशी अगदी शालेय क्रिकेटशीही जोडलेले होते. वयाच्या पन्नाशी, साठीतही जमेल तेव्हा ते प्रत्यक्ष मैदानात उतरुन ते सामना पाहत. त्याची खडान् खडा माहिती ठेवत. फुटबॉल आणि टेनिसवर देखील त्यांचं अपार प्रेम. या खेळांचे सामने रात्र-रात्र जागून ते पाहत आणि त्यातले बारकावे, आठवणी आम्हाला सांगत.

अनेक क्रीडाविषयक पत्रकार परिषदा, कार्यक्रम यानिमित्ताने या दिग्गज पत्रकारांसोबत राहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. अगदी वानखेडे स्टेडियमच्या प्रेस बॉक्समध्येही या सर्व मंडळींसोबत अनेक सामने पाहिलेत. ज्यात कर्णिकही असायचे. बोलायला एकदम रोखठोक. दिलखुलास. ठाम मतं मांडणारे. पुढे मी न्यूजपेपरमधून न्यूजचॅनलमध्ये पाऊल ठेवलं, तेव्हाच्या प्रवासापासूनही मी त्यांच्या संपर्कात असायचो. एखादा कार्यक्रम, मुलाखत पाहिल्यावर हक्काने मला फोन करायचे, प्रतिक्रिया द्यायचे. कधी पाठ थोपटायचे, कधी सूचनाही करायचे.

मोजक्याच वेळा पण, मी, कर्णिक, शरद कद्रेकर आणि सुनील लवाटे एकत्र भेटलोय. तेव्हा अनुभवाचं एकेक पान माझ्यासमोर यायचं, या तिघांकडून. या तिघांच्याही गप्पा नुसतं ऐकणं ही पर्वणी असायची. त्यात कर्णिक, कद्रेकर, लवाटेंची दोस्ती खूप जुनी. साहजिकच त्यांच्यातली जुगलबंदी काही औरच असायची. म्हणजे हे तिघेही अरे-तुरेमधले मित्र. त्यामुळे एकमेकांची खरडपट्टी काढतानाच एकमेकांवर प्रेमही तितकंच पराकोटीचं. त्यात कर्णिकांचा दरारा काही वेगळाच. क्रीडा पत्रकारांमध्ये ते भय्या नावाने लोकप्रिय होते. मी मात्र त्यांना कर्णिकच म्हणायचो. त्यांच्या अंत्यदर्शनाला गेलो, तेव्हा इतक्या हॅपनिंग माणसाला असं शांत, निश्चल झालेलं पाहून दाटून आलं सारं.  लवाटे आणि कद्रेकरांच्या डोळ्यातही आपला माणूस गमावल्याची ओल जाणवत होती.

आज मुकुंद कर्णिक यांच्या अचानक एक्झिटने आमच्या पिढीची हक्काने कान उघडणी करणारा, त्याच वेळी आमच्यावर आपल्या कुटुंबातल्या सदस्यासारखं प्रेम करणारा मार्गदर्शक गमावल्याची भावना मनात आहे. त्यांचं आमच्यात नसणं अजूनही मन स्वीकारत नाहीये. मात्र वास्तवाला सामोरं जावंच लागेल. त्यांची एक जागा मनात आजन्म राहील.

त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि आदरांजली.